Total Pageviews

Monday, 2 January 2012

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=202918:2012-01-01-17-09-42&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10
वाचायचं इथं काय नि तिथं काय..मराठीत वाचकांची पिढीच उरली नसल्याची तक्रार सहसा जुन्या पिढीकडून होते. याउलट, फेसबुकवर दहा मित्रमैत्रिणींची स्टेटस अपडेट्स आणि त्यावर जर हुषार मित्रमैत्रिणींनी प्रतिक्रिया दिल्या असतील, तर त्या वाचून एखादा लेख वाचल्याचं पुण्य तरी सहजच मिळतं, असं मानणारी आमची पिढी आहे! पिढय़ांपैकी कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवणं अशक्य आहे; पण संगणकावरून वाचन वाढतंय, एवढं खरं. दहा वर्षांपूर्वी ‘ब्लॉगिंग’ची मोफत आणि सार्वत्रिक सोय उपलब्ध झाली. एकेकटय़ानं किंवा समविचारी सहकाऱ्यांनी मिळून लिहिलेले ब्लॉग आधी इंग्रजीत, मग हिंदीत आणि मराठीतही वाढल्याचं मराठीच्या वाचकांनी पाहिलं आणि त्यापैकी काहीजण ‘लेखक’ झाले!  इंग्रजीत तर जगभरचं ताजं लिखाण, कुणाच्याही काटछाटीविना वाचायची संधी मिळाली. ब्लॉग्जबद्दल इंटरनेटवरच चर्चा झडू लागल्या. चर्चा व्हावी, म्हणून आपलं लिखाण खास चर्चा-स्थळांवर अपलोड करणारे लेखक वाढले.. ‘संख्या वाढली, गुणवत्ता नव्हे’ ही कुठल्याही क्षेत्राबद्दल होणारी तक्रार आता ब्लॉग्जबद्दल होऊ लागली.. म्हणजे गुणवत्ता वाढावी, अशी इच्छा अनेकांची आहे. पण कदाचित ही गुणवत्ता कुठेतरी असेलच, ती आपल्यापर्यंत पोहोचली नसेल, हे इंटरनेटच्या जंजाळात सहज शक्य आहे. अनेक ब्लॉग्जबद्दल सांगणाऱ्या साइट आहेत, पण तिथंही ‘कुणीही यावे अपलोड करावे’ अशी लोकशाहीच असल्यानं निवडक, वेचकच ब्लॉग आपल्यापर्यंत पोहोचतील, अशी खात्री नाही!
इथं, ‘वाचावे नेट-के’ या सदरातून हा प्रयत्न आपण सर्वानीच करून पाहूया..
हे ‘आपण सर्वानीच करून पाहण्या’ची पद्धत सोपी आहे. तुम्हाला मराठीतला वा इंग्रजीतला एखादा ब्लॉग किंवा नियतकालिकांच्या वाचनाला पर्याय ठरू शकेल, असं वारंवार अपलोड होणारं समकालीन लिखाण देणारं संकेतस्थळ पसंत असेल, तर त्यावरला ताजा लेख आम्हाला आठवडाभरात ईमेलनं कळवायचा. लगेच सोमवारी त्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न इथं केला जाइैल. अशा शिफारशी बऱ्याच येऊ शकतात आणि त्यातून निवडही करावी लागेल.. ते करण्यासाठीचे निकष असे :
- आपण शिफारस केलेला लेख ताजाच असावा,
- आपण शिफारस केलेलं संकेतस्थळ वा ब्लॉग नेहमीच वाचनीय आणि ‘ओरिजिनल’ किंवा स्वलिखित मजकूर देतं, असा विश्वास तुम्हाला हवा. अनेक ब्लॉग्ज मजकूरदेखील ‘कटपेस्ट’ करतात, म्हणून ही अट!
- हे संकेतस्थळ वा हाच ब्लॉग का आवडतो, याबद्दल आपलं जे म्हणणं असेल, तेही निवडीसाठी गृहीत धरलं जाईल.
ही पथ्यं पाळून केलेल्या शिफारशींची दखल इथं घेतली जाणार नाही, असं सहसा होणारच नाही. पण झालं तर, ईमेलनं पाठपुरावा करण्याचा हक्क आहेच तुमचा!
उत्तमतेचा हा शोध कुणा एकटय़ाला घ्यायचा नाहिये, असं ठरवूनच हा सामूहिक प्रयत्न.
नमुन्यादाखल, ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचा एक ताजा (२४ डिसेंबररोजी अपलोड झालेला)  लेख इथं दिला आहे. ब्रिगेडिअर महाजन हे एरवीही वृत्तपत्रांतून लेखन करत असतात किंवा अनेक वृत्तपत्रं त्यांच्या लिखाणाची दखल घेतच असतात. लोकपाल विधेयक आणि अण्णा हजारेंचं आंदोलनही ‘लटकल्या’नंतर लिहिला गेलेला हा लेख वाचनीय झाला आहे, तो एच. एल. मेन्केन तसंच घनश्यामदास बिर्ला आदींच्या संदर्भामुळे. या दीर्घ लेखातला संपादित उतारा इथं आहे, पण ‘तिथं’- इंटरनेटवर हा अख्खा लेख आणि ब्रिगेडिअर महाजन यांचं अन्य लिखाण वाचण्यासाठी ब्लॉगचा पत्ताही आहेच..
शीर्षक मात्र, संपादित उताऱ्यासाठी निराळं देण्यात आलं आहे.
सूचना- प्रतिक्रिया आणि सहभागासाठी  :
wachawe.netake@expressindia.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

राजकारण आणि व्यापार..
http://brighemantmahajan.blogspot.com
कळपशाही
लोकशाही म्हणजे काय याचे उत्तम वर्णन एच. एल. मेन्केन यांनी केले आहे. लोकशाहीचे वर्णन त्यांनी ‘कळपशाही’ असे केले आहे. निर्बुद्ध मानवांचा प्रचंड कळप हे राज्य चालवीत असतो. शहाणपणाने राज्य करावे एवढी त्यांच्यापाशी बौद्धिक क्षमता नसते. तसा जबाबदार राज्यकारभार करण्यात त्यांना स्वारस्यही नसते. हे झाले राज्यकर्त्यां जमातीविषयी. याचा अर्थ असा नव्हे की, जे सत्तेबाहेर बसले आहेत व राज्यकर्त्यांना शहाणपणाचे उपदेश पाजत आहेत, ते सर्व लोक शहाणे व राज्य करण्याच्या लायकीचे आहेत. देश रसातळाला गेला याचे भ्रष्टाचार हेच एकमेव कारण नाही. सामाजिक, धार्मिक, भौगोलिक, सांस्कृतिक कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत.
सगळाच व्यापार
आज उद्योगपतीच राजकारणी बनले व देश चालवू लागले. िहदुस्थानातील अस्थिरता व संभाव्य अराजकतेचे हे मुख्य कारण आहे. कै. घनश्यामदास बिर्ला एकदा म्हणाले होते, ‘अधिक संपत्ती, अधिक रोजगार ज्याच्यामुळे निर्माण होतील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मला रस आहे. मी भांडवलदार आहे हे खरे, परंतु सर्वाना समान संधी देणाऱ्या अधिक रोजगार निर्माण करणाऱ्या आणि लोकांचे राहणीमान उंचावणाऱ्या समाजवादावर माझी श्रद्धा आहे. गरिबीचे वाटप म्हणजे समाजवाद नव्हे. प्रत्येकाच्या आणि सर्वाच्या जीवनाची गुणवत्ता वाढविणे खर्याखुर्या समाजवादाला अभिप्रेत असते.’’ देश उभारण्याची व समाजाला धुळीतून वर नेण्याची जबाबदारी आपल्यावरही आहे याचे भान सध्याच्या उद्योगपतींना नाही.टू-जी स्पेक्ट्रमचे वाटप होताना देशातले मोठे उद्योग समूह स्पध्रेत उतरले. ही स्पर्धा निकोप नव्हती. ही स्पर्धा ज्यांना जिंकता आली नाही त्या उद्योगपतींनी ‘लोकपाल’ आंदोलनात पाण्यासारखा पसा ओतला हे सत्य आता लपून राहिले नाही. पण सत्य सांगणे हा एकदा गुन्हा ठरल्यावर दुसरे काय व्हायचे!
आर्थिक हुकूमशहा
राजकारण हा व्यापार व सत्ता हा उद्योग झाला आणि उद्योग म्हणजे ‘माफिया’ झाला. हे सर्व लोकपाल कसे थांबवणार? मुळात लोकपालाचा निर्थक उदो उदो आणि पाठिंबा हासुद्धा राजकीय व्यापारच आहे. स्वस्तात मिळणाऱ्या लोकप्रियतेची भुरळ पडल्याने ‘सत्यमेव जयते’चा अर्थ हरवून गेला.लोकपाल आला की सर्व भ्रष्टाचार चुटकीसारखे संपून जातील, हा भ्रम निर्माण करणे म्हणजे ‘गरिबी हटाओ’ नाऱ्यासारखेच आहे. 

No comments:

Post a Comment