Total Pageviews

Tuesday, 16 August 2011

ANNA HAZARE AGAINST CORRUPT GOVERNMENT

THIS GOVERNMENT DID NOT ARREST ALI SHAH GILANI & ARUNDHATI ROY WHEN THEY HELD A SEMINAR IN DELHI "AZADI ONLY WAY AHEAD IN KASHMIR.GOVT HAS YET NOT FILED AGAINST THESE ANTI NATIONALS . WHILE A PATRIOT IS ARRESTED
अण्णांचा गुन्हा काय?
ऐक्य समूह
Wednesday, August 17, 2011 AT 12:32 AM (IST)
Tags: editorial

भ्रष्टाचाराच्या विळख्यातून भारतीय लोकशाहीची मुक्तता व्हावी यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलनाचा इशारा देणे हाच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा गुन्हा ठरला. 16 ऑगस्टपासून स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईचा प्रारंभ आपण काहीही झाले तरी करणारच, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला, तेव्हापासूनच त्यांचे आंदोलन दडपून टाकायची व्यूहरचना केंद्र सरकारने सुरु केलेली होतीच. अपेक्षेप्रमाणेच त्यांनी कोणताही कायदेभंग केलेला नसतानाही त्यांना राजधानी दिल्लीत, काहीही कारण न सांगता दिल्ली पोलिसांकरवी अटक करून केंद्र सरकारने दिवसाढवळ्या लोकशाहीचा-संकेतांचा-परंपरांचाही बेशरमपणे गळा घोटला आहे. काहीही झाले तरी, अण्णांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना, समर्थकांना उपोषण-आंदोलन करू द्यायचे नाही, असा निर्धार सरकारने केला होताच. सत्तेचा आणि पैशाचा माज चढलेले हे सरकार जुलूमशाही करील, पण परिवर्तनाची ही लढाई मला अटक केल्यामुळे थांबणार नाही, असे अण्णांनी आंदोलनाच्या आधी बारा तास जाहीरपणे देशवासियांशी संवाद साधताना सांगितले होतेच. निर्लज्ज सरकारने तशी कृती करून, सार्वभौम जनतेचा, घटनेचाही अवमान करायचे धाडस अखेर केलेच. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता अण्णांनी रस्त्यावर पाऊल टाकायच्या आधीच दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेचे कारण मात्र पोलीस सांगू शकले नाहीत. राजघाटावर  किरण बेदींनी अटकेचे कारण विचारले तेव्हा सरकारच्या आदेशावरून आम्ही आपल्याला अटक करीत आहोत, एवढेच पोलिसांनी सांगितले. अण्णांच्या आंदोलनासाठी राजधानी दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेल्या हजारो कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अटक केली. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली अण्णांना अटक  केल्याचे सरकारने दिलेले कारण म्हणजे खोटारडेपणाचा कळस तर आहे. 4 जूनला योगगुरु बाबा रामदेव यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन याच सरकारने पोलिसी बळाचा वापर करून, योग शिबिरार्थींना बेदम झोडपून उधळून लावले होते. अण्णांशी तशीच कृती केल्यास देशभर त्याचे प्रचंड पडसाद उमटतील, याची खात्री असल्यानेच सरकारने त्यांना उपोषणच करू द्यायचे नाही, असा कट रचला. लोकनायक जयप्रकाश नारायण उद्यानात बेमुदत उपोषण करायला त्यांना परवानगी नाकारली गेली. परवानगी द्यायसाठी 22 अटी त्यांच्यावर लादल्या गेल्या. तीन दिवसातच उपोषण संपवा अशी तंबीची अटही त्यात होती. अण्णांनी त्या साऱ्या अटी फेटाळून लावल्यामुळे सरकार विरुध्द अण्णा या अंतिम संघर्षाला तोंड फुटणार याची खात्री देशवासियांनाही झाली होतीच. बाबा रामदेवांचे उपोषण सरकारने रात्रीच्या अंधारात मोडून काढले तर, अण्णांना सकाळी कोणताही गुन्हा न करताच, कायदेभंग न करताच त्यांचे उपोषण मोडून काढायचा प्रयत्न झाला. सरकारच्या या असल्या चिथावणीखोर-लोकशाही-विरोधी-दडपशाहीच्या कृतीला देशातल्या लाखो युवकांनी रस्त्यावर उतरून "वंदे मातरम्‌' चा जयघोष करीत, अण्णा एकटे नाहीत, याचे दर्शन घडवले आहेच. लोकशाही आणि संसदेच्या सार्वभौमत्वाच्या नावाखाली, सार्वभौम असलेल्या जनतेवर सरकार जेव्हा अत्याचाराचा बुलडोझर फिरवायला लागते, तेव्हा अशा सरकारच्या सत्तेचा शेवटचा तो प्रारंभ असतो, हे लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या "संपूर्ण क्रांती' च्या वेळी त्या सरकारने केलेल्या दडपशाहीने सिध्दही झाले. आता अण्णांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या-परिवर्तनाच्या लढाईचा शेवटही तसाच होईल, हे सांगायला राजकीय तज्ञांचीही गरज नाही. "विनाश काले विपरित बुध्दी', अशी या सरकारची अवस्था झाली. ज्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला, ते परवा परवा पर्यंत उजळ माथ्याने फिरत होते आणि भ्रष्टाचाराच्या विरोधी आंदोलन सुरु करायच्या आधीच अण्णांना मात्र पोलीसांनी ताब्यात घेतले. आता त्यांनी जामीन नाकारल्यामुळे तिहारच्या तुरुंगात सात दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत त्यांना डांबले गेले असले तरी, तेथेही त्यांचे उपोषण सुरुच आहे. 
लोकशक्तीचा हुंकार
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांनी अण्णांच्या भ्रष्टाचारी विरोधी आंदोलनाचा उल्लेख न करता संसदेला आव्हान द्यायचा प्रयत्न कुणी करू नये, असा इशारा दिला. तर, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी लाल किल्ल्याच्या सदरेवरून स्वातंत्र्यदिनी देशवासियांशी संवाद साधताना, केलेल्या चाळीस मिनिटांच्या भाषणात, जनतेला उपदेशाचे डोस पाजण्यापलिकडे काहीही केले नाही. आधी महागाई कमी करायसाठी आपल्याकडे काही जादूची कांडी नाही, असे रडगाणे ते गात होतेच. आता भ्रष्टाचार संपवायसाठीही माझ्याकडे जादूची कांडी नाही, असे त्यांनी सांगून टाकले. उपोषणाने भ्रष्टाचार मिटणार नाही, संपणार नाही. संसदीय अधिकारांचा वापर करून, त्यासाठी विविध आघाड्यांवर नियोजनबध्द लढाई करायसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सरकारला सहकार्य करावे, असे मिळमिळत आवाहन तेवढे त्यांनी केले. लोककल्याणकारी योजनांचा पैसा भ्रष्ट प्रशासनात झिरपला जातो. भ्रष्टाचार ही विकासाच्या मार्गातली सर्वात मोठी धोंड आहे, ती बाजूला सारायला हवी, असे भाषण त्यांनी ठोकले. पण त्यात लोकभावनांचा काहीही अविष्कार नव्हता आणि तो देशवासियांना अपेक्षितही नव्हताच! डॉ. सिंग यांचे हे शब्द जंजाळाचे औपचारिक भाषण ऐकून जनतेला कसलाही  दिलासा मिळाला नाही. संध्याकाळी अण्णांनी मात्र देशवासियांशी संवाद साधताना, भ्रष्टाचाराच्या शत्रूविरुध्द लोकशक्तीच्या बळावरच आपण लढणार आहोत, लढत राहू, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपला हा संघर्ष सुरु राहील, असे सांगत कोट्यवधी देशवासियांच्या भावनांचे प्रकटीकरण केले. आपला लढा पूर्णपणे अहिंसक-महात्मा गांधीजींच्या मार्गानेच सुरु होईल, तुरुंगात डांबल्यास तेथूनही आपण तो सुरु ठेवू अशी ग्वाही त्यांनी दिली. रात्री आठ ते नऊ या वेळेत संपूर्ण देशभरातील शहराशहरातले-खेड्या खेड्यातले विजेचे दिवे लोकांनी मालवले. संघटित लोकशक्तीचा अविष्कार सरकारला दाखवला. तरीही या सरकारला अण्णांच्या-जनतेच्या अफाट शक्तीची अद्यापही जाणीव झालेली नाही. अण्णांनी पोलीस कोठडीतच बेमुदत उपोषणाला प्रारंभ करताच, राज्या-राज्यातल्या शहरात, खेड्यात रस्त्यावर उतरून हजारो युवकांनी इनक्लाब झिंदाबादचे नारे देत,  अटकही करून घेतली. सनदशीर सत्याग्रहाचे हे सत्र थांबलेले नाही, थांबणारही नाही. भ्रष्टाचार विरोधी बेमुदत उपोषण करणे, तसे जाहीर करणे हा या झोटिंग सरकारला गुन्हा वाटतो आहे. लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार मात्र गुन्हा वाटत नाही. संसदेत अण्णांच्या अटकेचे पडसाद उमटताच, सत्तेच्या दलालांनी प्रचंड आरडाओरडा आणि गोंधळ घालून विरोधकांना बोलूही दिले नाही. संसदेत-संसदेबाहेर भ्रष्टाचाराच्या विरोधात काहीही बोलायचे नाही, तसे कराल तर ठोकून टाकू, तुरुंगात डांबू, तुमचा आवाज बंद पाडू अशा सत्तेने मग्रूर झालेल्या केंद्र सरकारची ही जुलूमशाही कोट्यवधी जनताच संघटितपणे मोडून काढील. सार्वभौम जनताच सत्तेच्या या दलालांना धडा शिकविलच!  महात्मा गांधीजींच्या उपोषणालाही ब्रिटिशांनी कधी अटी लादल्या नाहीत. त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती केली नाही. पण महात्मा गांधीजीचा वारसा सांगणाऱ्या या केंद्र सरकारने मात्र अण्णांच्या-बरोबरच सामान्य जनतेचा आवाजही दडपून टाकायसाठी सुरु केलेली कट कारस्थाने संघटित जनताच उधळून लावील, हे नक्की

No comments:

Post a Comment