Total Pageviews

Sunday 21 August 2011

WHAT ALL OF US CAN DO ABOUT CORRUPTION

धन्य होत त्या बालकाचे मातापिता आणि आजी-आजोबा ज्यांनी आपल्या बालकाला जगाची ओळख होण्यापूर्वीच भ्रष्टाचाराची आणि त्यातून उभ्या राहिलेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची ओळख करून दिली! त्याहूनही धन्य आहे तो युवक ज्याला या बालकापासूनच अण्णांच्या आंदोलनात उतरण्याची उपरती झाली आणि त्याने फटफटीवर टांग मारून ‘आगे बढो’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली!

छान आहे. बर्फासारख्या थंडगार पडलेल्या समाजापेक्षा असा एकाचवेळी फसफसणारा, धगधगणारा, फुरफुरणारा आणि प्रसंगी फुत्कारणारा आणि चित्कारणाराही समाज अस्तित्वात असणे लोकशाही संवर्धनाच्या दृष्टीने बरे असते म्हणतात. एरव्ही अनेक सामाजिक संकटे आणि आपत्ती येऊन गेल्या. समाजातल्या काही मूठभर चळवळ्यांनी अस्वस्थ होऊन लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला; पण लोकांचा प्रतिसाद शून्य.

अण्णा हजारे यांनी हाती घेतलेल्या भ्रष्टाचार उन्मूलनाच्या ध्यासाबाबत मात्र अनेक तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार ‘आशादायी’ चित्र निर्माण झाले आहे. लोक जागे झाले आहेत. अण्णांच्या पाठीशी त्यांनी आपली सारी शक्ती उभी केली आहे. या शक्तीच्या जोरावर अण्णांनी म्हणे सिंहासन हादरविले आहे. कदाचित आता हे सिंहासन कोलमडूनदेखील पडेल. कारण अण्णांच्या स्वप्नातील ‘जन-लोकपाल’ भारतभूवर अवतरला रे अवतरला की सारे कसे स्वच्छ स्वच्छ होऊन जाणार आहे !

पंतप्रधान जेलात जातील, सारे मंत्री जेरबंद होतील, बड्या सरकारी अधिकार्‍यांच्या मुसक्या आवळल्या जातील, लोकप्रतिनिधींच्या हातात बेड्या पडतील, या सार्‍यांच्या रस्त्यारस्त्यावरून धिंडी काढल्या जातील आणि बापू गांधींच्या कल्पनेतले रामराज्य दुसर्‍या गांधींच्या माध्यमातून का होईना हिन्दुस्थानात एकदाचे अवतरेल. पण हे अगदी सहजासहजी होईल असे समजण्याचे कारण नाही. त्याकरिता अण्णांचे हात आणखी मजबूत करावे लागतील. ते कोणी करायचे? अर्थात या देशातल्या शंभर आणि वीस कोटी नागरिकांचेच ते उत्तरदायित्व आहे. लहान-थोर, स्त्री-पुरुष, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, अशा प्रत्येकाचेच ते कर्तव्य असेल. त्या सार्‍यांनी आपले कर्तव्य बजावलेच पाहिजे. बर्‍याच वर्षांनंतर देशाचा नेता कसा असावा याची साक्ष त्यांना म्हणे पटली आहे. एक पणती का कायसे म्हणतात ती पेटली आहे. या पणतीच्या ज्योतीवर अनेक मेणबत्त्या धडाडून पेटत आहेत. त्यापैकी एकही आता विझता कामा नये. भले कितीही सोसाट्याचा वारा येऊ दे की वादळ येऊ दे!

हे आता होणारच आहे. ते अटळ आहे. पण ते होण्यापूर्वी जरा सार्‍याच संबंधितांनी येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील ती जगप्रसिद्ध गोष्ट आठवून पहायला हरकत नाही. हातात मेणबत्ती आणि मुखी अण्णानाम घेण्यापूर्वी आपले अंतर्मन खरवडून पहायला आणि काही मोजके प्रश्न स्वत:लाच विचारायला हरकत नाही. कोणी कोणी आणि काय प्रश्न विचारायचे याचा अंदाज बांधणे फार सोपे आहे.

मी गुरुजनांचा, मातापित्यांचा, वडीलधार्‍यांचा मनापासून आदर करतो का? शाळेत वा कॉलेजात नियमितपणे जाऊन केवळ अध्ययनच करतो का? बापापाशी अमाप पैसा असला तरी मोटारी उडविण्यासाठी आणि मुलीबाळींची टिंगल करण्यासाठी कॉलेजात जाणे जाणीवपूर्वक टाळून ‘जोवर मी माझ्या पायावर उभा राहत नाही तोवर चैनीच्या एकाही वस्तूला हात लावणार नाही’, असे सांगतो का, असे प्रश्न विद्यार्थी स्वत:लाच विचारू शकतील.

‘गुरुशिवाय ज्ञानप्राप्ती असंभव’ या सार्वत्रिक सत्याला स्मरून मी केवळ अध्यापनाचेच काम प्रमाणिकपणे करतो का? लठ्ठ पगार मिळत असताना तो खिशात घालून कॉमन-रूममध्ये चकाट्या पिटत राहून नंतर तितकीच लठ्ठ फी आकारून त्याच विद्यार्थ्यांना घरी खासगीत शिकवतो का? आवडत्या शिष्यांना र्मयादेबाहेर जाऊन मदत करतानाच नावडत्या विद्यार्थ्यावर डूख धरतो का? असे प्रश्न शिक्षक विचारू शकतील.

मुलाच्या शिक्षणासाठी भरमसाठ पैसे मोजणे, त्यांचे सर्व वाजवी-गैरवाजवी हट्ट पुरविणे, त्यांच्या आडदांडपणावर सतत पांघरुण घालीत राहून उलट कौतुकाच्या मिटक्या मारीत राहणे हेच पालक म्हणून आपले खरे कर्तव्य आहे का? असा प्रश्न अर्थातच पालक विचारू शकतील.

आपण जे काम करतो त्यासाठी सरकार आपल्याला पोटापेक्षा आणि प्रसंगी अकलेपेक्षाही जास्त पगार देत असल्याने लोकांची कामे अडवून ठेवणे आपणाकडून अपेक्षित नसले तरी आपण तसे वागतो का आणि का वागतो हा प्रश्न सरकारी नोकर विचारू शकतील.

उत्पादकाकडून मिळालेल्या जिनसा जशाच्या तशा ग्राहकांना पुरविणे आणि त्या बदल्यात वाजवी मोबदला घेणे ही समाजाची अत्यंत रास्त अपेक्षा असताना आपण भेसळ करणे, मापात दांडी मारणे, सरकारी कायदेकानू धाब्यावर बसविणे, बिनालिखापढीचे व्यवहार करून विक्रीकराची चोरी करणे असे काही करीत नाही ना, असा प्रश्न व्यापारी विचारू शकतील.

एखादा उद्योग सुरू केला म्हणजे आपण सार्‍या जगावर जणू उपकारच केले आहेत हा अहंभाव न बाळगता, जकात, उत्पादन शुल्क, आयकर, विक्रीकर आदिंबाबत करबुडवेगिरी करण्याचे कटाक्षाने टाळून आपल्या कामगारांना आपण गेला बाजार किमान वेतनाचा तरी लाभ मिळवून देत असतो का, हा प्रश्न उद्योजक विचारू शकतील.

आपणाकडे येणारा रुग्ण आपणास परमेश्‍वर मानीत असतो. अशा वेळी त्याच्या मनातील परमेश्‍वराप्रतीच्या आदरभावाला तडा जाईल असे वागताना आपण या रुग्णाला भरमसाठ औषधे लिहून देऊन त्याला अकारण अनेक चाचण्या करण्यास बाध्य करीत नाही ना, असा प्रश्न डॉक्टर मंडळी स्वत:ला विचारू शकतील.

गांजलेला, त्रासलेला आणि चकरा मारून मारून दमलेला पक्षकार ज्या आशेने आपल्याकडे येतो त्याला तारखावर तारखा घेत राहून आणि बर्‍याचदा सामनेवाल्याच्या वकिलाशी संगनमत करून आपण आपल्या पक्षकाराला आणखीनच त्रस्त करून सोडीत नाही ना, या प्रश्नाचे उत्तर अर्थातच वकील मंडळी आपल्या मनात शोधू शकतील.

आपण लोकप्रतिनिधी वा नेते म्हणून वावरतो तेव्हा समाजातल्या अनेकाना आपल्याविषयी आधार वाटत असतो. आपण त्यांच्या भल्यासाठी निश्‍चितच काही करू शकतो आणि करू अशी त्यांची अपेक्षा आणि आशा असते. आपण ही अपेक्षा प्रमाणिकपणाने पूर्ण करतो की त्याच्या असहाय्यतेचा लाभ उठवून त्यालाच आयुष्यातून उठवून मोकळे होतो, हा सवाल नेते आणि पुढारी स्वत:ला विचारू शकतील.

कामगारांचे भले व्हावे या उद्देशासाठीच आपण कामगार पुढारी झालो असलो तरी आपल्या युनियनमधला तो कामगार आणि प्रतिस्पर्धी युनियनमधला तो आपली शिकार असे मानतानाच आपण प्रसंगी व्यवस्थापनाशी साटेलोटे करून आपल्यावर विश्‍वास दाखविणार्‍या कामगारांचा विश्‍वासघात करीत नाही ना हा सवाल कामगार पुढारी स्वत:ला विचारू शकतील.

या सर्व प्रश्नांची उत्तरे ज्याने त्याने प्रमाणिकपणे शोधली आणि ही प्रामाणिक उत्तरे नकारार्थी असली तर मग प्रश्नच नाही. सारीकडे कसा लख्ख प्रकाश पसरून जाईल. पण दुर्दैवाने आज तशी स्थिती नाही.

याचा अर्थ काय? याचा अर्थ इतकाच की भ्रष्टाचाराची व्याख्या लाच देणे आणि लाच स्वीकारणे इतक्यापुरतीच र्मयादित नाही. उलट भ्रष्ट आचाराच्या व्यापक संकल्पनेतील तो महत्त्वाचा असला तरी केवळ एक मुद्दा आहे. नैतिक अध:पतन हाच खरा आजच्या तमाम समाजाला ग्रासून राहिलेला सर्वाधिक मोठा भ्रष्टाचार आहे व दुर्दैवाने त्याच्यापासून अगदी फार थोडेच महाभाग काही अंशी का होईना स्वत:चा बचाव करण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येते. नैतिक अध:पतनाच्या या भ्रष्ट आचारापासून कुणी एक दुसर्‍याला वाचवू शकत नसतो तर प्रत्येकाला स्वत:च स्वत:चा बचाव करायचा असतो व त्यासाठी ना गरज कुणा बापूंचे असते ना कुणा अण्णांची.

कुणा एकाला प्रेषित समजणे, त्याचे नारे देणे, मेणबत्त्या पेटविणे, जुलूस काढणे आणि हळूचकन त्याचाही विसर पाडून घेणे म्हणजेच एखाद्या उन्मादात न्हाऊन घेणे फार सोपे असते; पण या सोपेपणातून निष्पन्न मात्र काहीही होत नसते.

-हेमंत कुलकर्णी

(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीचे संपादक आहेत.)

No comments:

Post a Comment