Total Pageviews

Wednesday 31 August 2011

CORRUPTION INGRAINED INTO EVERY INDIAN

नसानसात भिनलेला भ्रष्टाचारलोकपाल विधेयकात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या तीन मागण्यांचा समावेश करण्याचे सरकारने संसदेत मान्य केल्यानंतर म्हणजे १२ दिवसानंतर (१६ ते २८ ऑगस्ट) अण्णांनी आपले उपोषण सोडले आणि सार्‍या देशवासीयांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. अण्णांनी सरकारला नमविले, संसदेला झुंजविले या समाधानात दिल्लीच्या रामलीला व इंडिया गेटवर अण्णा टीमने जल्लोषही साजरा केला. अण्णांनी बारा दिवस देशवासीयांसाठी प्रामाणिकपणे संघर्ष केला. परंतु त्यांच्या या अभूतपूर्व संघर्षाचे फलित काय हे काळच ठरविणार आहे. कारण आपल्या देशात कायदे मानणार्‍यांपेक्षा कायदे मोडणारे लोक अधिक आहेत. देणारे आहेत म्हणून घेणार्‍यांचीही संख्या वाढत चालली आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाने मनापासून ठरविले की मी कुणाला आपले काम सुलभ होण्यासाठी लाच देणार नाही, तर कसा काय भ्रष्टाचार वाढेल? लाच मागण्याची कुणाची हिंमत होईल? सरकारी खात्यात दाखल होताना किंवा मंत्री पदाची शपथ घेताना सर्वच प्रामाणिकपणाचे वचन देतात, परंतु त्यातील कितीजण आपल्या वचनाला जागतात? एक टक्काही नाही. म्हणजे जशी त्या व्यक्तीची वृत्ती, मानसिकता असेल तसाच तो वागणार? आपल्याकडे येणार्‍या व्यक्तीच्या खिशातून काहीतरी काढण्याची कुणाची प्रवृत्ती असेल तर ती तुम्ही कशी बदलणार? फाटलेल्या आकाशाला ढिगळं किती लावणार? एकदा कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी ऍण्टीकरप्शनकडून ट्रॅप झाला, लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला आणि त्याची जर वरपर्यंत ओळख नसेल किंवा त्याला कुणी गॉडफादर नसेल तर तो आयुष्यातून उठतो. इतका ऍण्टीकरप्शनकडून टोकाचा तपास केला जातो. तपास अधिकारी नि:पक्षपाती असेल तर ट्रॅप झालेल्या व्यक्तीच्या कमरेतील करगोट्याचाही तो हिशोब घेतो. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा फार कडक आहे. परंतु आपल्याकडे त्याची नीटपणे अंमलबजावणी होत नाही. आपल्याकडे आहे त्या कायद्याची जर काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर आपल्या देशात लोकपाल किंवा अण्णांच्या जनलोकपालाची गरजच नाही.
सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना आपल्याच लोकांनी भ्रष्ट केले आहे. ट्रॅफिक पोलिसांना वाहतूक नियमांची खिल्ली उडविणार्‍यांनी आणि दारू पिऊन वाहने चालविणार्‍यांनी भ्रष्ट केले आहे. वाहतूक शाखेत प्रत्येक पोलिसाला बदली हवी असते. याला जबाबदार कोण आहेत? वाहतूक नियम तोडणारेच ना! आज मुंबईत प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या बाहेर फेरीवाल्यांची अतिक्रमणे का वाढली आहेत? झोपड्यांनी उग्र रूप का धारण केले आहे? कारण कायद्याची कुणाला भीतीच राहिलेली नाही. आज वनवास फक्त करदाते नागरिक भोगत आहेत. त्यांना कुणी वाली राहिलेला नाही. त्यांच्या पैशातूनच देशात सर्वत्र लूट सुरू आहे. फूटपाथवर पथारी मांडणार्‍या, वीज, पाणी चोरणार्‍यांना, कर डुबविणार्‍यांना आज कोणताच दंड नाही. दंड फक्त करदात्यांना आहे. या देशाचे कायदे व शिस्तपालन करीत आहेत त्यांनाच आज सजा आहे. आता तर तृतीय पंथीयांनी मुंबईकरांना जेरीस आणले आहे. रस्त्यावर, जकातनाक्यावर टाळ्या फिटणारे हे हिजडे रोज कोणत्या ना कोणत्या रेल्वे आणि लोकलमध्ये सर्वांसमोर हात पसरताना दिसू लागले आहेत. कुणाचे कुठेच नियंत्रणच राहिलेले नाही. रेल्वे फलाटाचा ताबा गर्दुल्यांनी आणि भिकार्‍यांनी घेतला आहे. भीक मागणे हा गुन्हा आहे, परंतु तो आता हिजड्यांचा, भिकार्‍यांचा, गर्दुल्यांचा व्यवसाय झाला आहे. जगात तुम्ही कुठेही जा तेथे कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. पण आपल्या देशातील कायद्याची बूज न राखणारे, वाहतुकीचे नियम तोडणारे, रस्त्यावर खुलेआम थुंकणारे परदेशात गेल्यावर मात्र तेथील सर्व कायदे पाळतात. न पाळून सांगणार कोणाला? आपल्या देशात मात्र सत्तेच्या मस्तीमुळे कायदे पायदळी तुडवले जातात. विचारात, आचारात, संस्कारात जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत नसानसांत भिनलेला भ्रष्टाचार संपणार नाही

No comments:

Post a Comment