आपल्या पुण्याच्या वृद्धाश्रमात निराधार वृद्धांचा आधार बनलेल्या कल्याणी पाटीलचा प्रवास सेवाभाव आणि समर्पणवृत्तीचा एक आदर्शच म्हणावा लागेल. तिच्या या प्रवासाविषयी थोडक्यात...
पिकलेल्या पानांची
कुणाला असते गरज,
आज आहे तर उद्या नाही
असे त्यांचे जीवन
या ओळी सर्व पिकलेल्या पानांसाठी अर्थात आपल्या उतारवयात आयुष्याच्या काही अखेरच्या घटका मोजणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी... रस्त्यावर, बस-रेल्वेस्थानकात हमखास आपल्याला असे काही निराधार आजी-आजोबा दिसतात. तेव्हा आपल्या मनात एक क्षणभर तरी नक्कीच विचार येतो की, कुणीच कसं नसेल यांना, कोणीतरी असेलच ना... आणि त्यांची ही निराधारता आपल्याला निःशब्द करुन जाते. अशाच या निराधार आजी-आजोबांना घराचा, मायेचा हात देण्याचे काम करत आहेत कल्याणी पाटील. बसस्थानकात रोज दिसणाऱ्या एका आजीला बघून कल्याणी खूप अस्वस्थ होत असे. तिने त्या आजीला आपल्या घरी आणण्याविषयी वडिलांना विचारले असता त्यांनी तिला यावर नीट विचार करण्यास सांगितला. तिला मुंबई-पुण्यातले जवळजवळ २०० वृद्धाश्रम दाखविले.कल्याणीने वयाच्या १८व्या वर्षी बसस्थानकातील आजीला घरी आणले. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. अनेक वृद्ध लोक तिच्याकडे येत होते. २०१० मध्ये तिने 'द्वारका सेवासदन' वृद्धाश्रम पुण्यातील राजगुरुनगरच्या आपल्या घराजवळच सुरू केला. एका आजीपासून सुरू झालेल्या या आश्रमात आज शंभरपेक्षा जास्त वृद्ध आजी-आजोबा वास्तव्यास आहेत. या आश्रमाच्या वाटचालीत कल्याणीला तिचे वडील दिनकर पाटील आणि आई कांता पाटील यांची खंबीर साथ लाभली.
कल्याणीचे दहावीपर्यंतचे शिक्षण नेरळमध्ये झाले. त्यानंतरचे शिक्षण पुण्यातल्या राजगुरूनगरमधील पूर-कान्हेसर या गावात झाले. वृद्धाश्रमासाठी काम करतानाही तिला खूप अडचणी आल्या. अनेक स्थानिक लोकांनी 'कशाला नसत्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या?' असे बोलून तिची हेटाळणी केली. मात्र, कल्याणी थांबली नाही. या वृद्घाश्रमासाठी मदत मागताना अनेक संस्थांनी, “आम्ही वृद्धांना मदत करत नाही, फक्त निराधार मुलांना मदत करतो, कारण, त्यांचे भविष्य महत्त्वाचे आहे. वृद्ध लोकांवर पैसे कशाला खर्च करायचे?” अशीही उत्तर दिली. घराच्या मागील बाजूलाच कल्याणीने आश्रम बांधला आहे. जेवण मात्र घरातले आणि सगळे आजीआजोबा एकत्रच करतात. कल्याणीची आई सगळ्यांसाठी स्वयंपाक करते. काही आज्या त्यांना मदत करतात. सगळ्यांना एकच प्रकारचे अन्न. कुठलाही भेदभाव नाही. कल्याणी या ज्येष्ठांच्या मानसिक अवस्थेबद्दल अनेक गोष्टी सांगते. कोणी आपल्या मुलांची आठवण काढून रडतं, तर कोणी निपचित बसून राहतात.आपल्या आयुष्याची फरफट त्यांच्या डोळ्यातून दिसते. त्यांना बळ आणि आपला कुणी आहे, असा विश्वास देण्यासाठी कल्याणी सदैव तत्पर असतात. आजपर्यंत या वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतलेल्या सर्व ज्येष्ठांचे अंत्यसंस्कार कल्याणीनेच केले आहेत.
अनेक ज्येष्ठांचे अनुभव अंगावर काटा आणणारे असून फक्त मुलांना जड झाल्याने रस्त्यावर सोडलेल्या वृद्धांविषयी सांगताना प्रचंड धक्का बसल्याचे कल्याणी सांगते. एका आजोबांना त्यांच्याच मुलांनी रात्री दोन वाजता घरातून बाहेर काढले. त्यांना राजगुरूनगर पोलिसांनी कल्याणीच्या आश्रमात भरती केले. तब्बल चार वर्षांनी ते आजोबा जेव्हा वारले, तेव्हा त्यांचा मुलगा अचानक प्रकट होऊन त्याने आपल्या वडिलांचे अंतिम संस्कारही न करता फक्त वडिलांच्या विम्याचे पैसे मिळावे म्हणून कागदपत्रे नेली. त्याने आपल्या वडिलांचे तोंडही बघितले नाही. आईवडिलांना ओझं समजून झुरळासारखी झटकून टाकणारी निर्दयी आणि पाषाणहृदयी पिढी आपण इतक्या कमी वयातच बघितल्याचे कल्याणी सांगते. कल्याणीला २०१८ मध्ये 'महाराष्ट्र ग्राम विकास प्रतिष्ठान'चा सामाजिक कार्यातील पुरस्कार मिळाला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात मदतीची खूप गरज असून आर्थिक स्वरूपात या आश्रमात कोणतीही मदत स्वीकारली जात नाही. धान्य, कपडे अशी साहित्यरुपी मदत येथे स्वीकारली जाते. या आश्रमात सर्व आजी-आजोबांचे एकत्र वाढदिवस साजरे केले जातात. सर्व सण-सोहळे आनंदात संपन्न होतात. सकाळी ९ वाजता चहा, मग नाश्ता, थोडे बागकाम किंवा वाचन, त्यानंतर दुपारचे जेवण, झोप, मग सायंकाळचा चहा, परत थोडे फिरणे, मग रात्रीचे जेवण असा या वृद्धाश्रमातील दिनक्रम. आज्या स्वयंपाक किंवा भजन करीत असतात तर आजोबा बागकाम, फिरणे, वाचनात आपला वेळ व्यतीत करतात. या आश्रमात बहुतांश सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना अनेक शारीरिक-मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते. इथे दर दोन दिवसांनी डॉक्टरांकडून सगळ्यांची तपासणीही केली जाते. खरं म्हणजे, कल्याणीचा हा वृद्धाश्रम म्हणजे निराधारांसाठी शेवटच्या दिवसातील सोनेरी दिवसच. आयुष्यभर मुलांसाठी जगलेल्या या पिकलेल्या पानांना कल्याणीने जे सुखाचे दिवस दिले, त्याचे मोल नाही. तिला हा आश्रम चालविताना अनेक अडचणी येतात, मात्र त्या सगळ्यांकडे तिने दुर्लक्षच केले. कल्याणीच्या या कामाला आणि निःस्वार्थ सेवेला अनेक प्रणाम...!
No comments:
Post a Comment