Total Pageviews

Sunday 25 August 2019

सोशल मीडीयाची मयसभा Source:तरुण भारत25 Aug 2019-॥ मानसरंग : मयुरेश डंके |



विविध गोष्टी शेअर करण्यात मला फार रस आहे असं जर एखाद्या महिलेनं चारचौघांत जाहीरच केलं तर त्याचा सात्विकच अर्थ लावला जाईल असं मानणं मुळातच गाढवपणाचं ठरतं. अनेक पोक्त वयाच्या महिलासुद्धा अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करण्यामध्ये व्यस्त असतात. स्वत:चं बोल्ड प्रोफाईल पोस्ट करतात. अनेक माणसं ते प्रोफाईल फोटो चवीनं पाहतात. आता तर एकाहून एक सरस अशी फोटो एडिटींग अ‍ॅप्स आली आहेत. आपले फोटो डाऊनलोड केले जाऊ शकतात, ते ह्या अ‍ॅप्समधून अश्‍लीलरित्या एडिट केले जाऊ शकतात आणि ते विविध पॉर्न साईट्सवर विकले जाऊ शकतात, किंवा आपल्यालाच त्यातून ब्लॅकमेलही केलं जाऊ शकतं. हा धोका केवढा मोठा आहे…! आपलं संपूर्ण आयुष्यच आपण या पोकळ प्रसिद्धीच्या नादात पणाला लावलंय हे आपल्याला कधी कळणार?

१९४३ साली अब्राहम मॅस्लो ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानं हायरारकी ऑफ नीड्सहे त्याचं संशोधन प्रसिद्ध केलं. माणसाच्या आयुष्यात विविध टप्प्यांवर त्याच्या प्रेरणा आणि जगण्याची उद्दिष्टं कशी बदलत जातात, हे मॅस्लोनं मांडलं. त्यात त्यानं पाच पायर्‍या मांडल्या आहेत.
अ- पहिली पायरी ही अन्न-वस्त्र-निवारा ह्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं
ब- दुसरी पायरी व्यक्तिगत सुरक्षितता, नोकरीची सुरक्षितता, कुटुंबियांची सुरक्षितता, उत्पन्नाचे स्त्रोत आणि स्थावर-जंगम मालमत्तेचं संरक्षण आणि भविष्यकालीन सुरक्षा यांची पूर्तता करणं
क- तिसरी पायरी मित्र-मैत्रिणी, विविध नातेसंबंध, लैंगिक गरजांची पूर्तता करणं
ड- चौथी पायरी समाजात प्रतिष्ठा मिळवणं
आणि
इ- पाचवी पायरी स्वत्वाचा शोध घेण्याची प्रेरणा पूर्ण करणं
सर्वसाधारणपणे व्यक्तींचा प्रवास याच दिशेनं होतो, असं मत मॅस्लोनं मांडलं. पण त्याला अपवादही असू शकतात, असंही त्यानं म्हटलेलं आहे. १९४३ मध्ये त्यानं मांडलेला हा सिद्धांत आजही बहुतांश प्रमाणात लागू होतो. पण त्यानं मांडलेल्या पायर्‍यांचा क्रम मात्र पूर्ण विस्कळीत झाल्याचं स्पष्ट दिसतं.
आधुनिक जगात माणसांचं आत्मकेंद्रीपण वाढत जाणं, त्यांचं विविध यंत्रांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढणं आणि माहिती तंत्रज्ञानाचा माणसाच्या आयुष्यात आलेला महापूर ही काही प्रमुख कारणं सांगता येतील. टोकाच्या व्यक्तीकेंद्रीत सुखसुविधांमुळं माणसांच्या आयुष्यातल्या प्रेरणा तर बदलतातच शिवाय नवनव्या समस्यांचाही जन्म होतो हे मॅस्लोच्या सिद्धांतात नाहीय, पण मॅस्लोच्या जन्माच्याही कितीतरी आधी ज्ञानोबारायांनी,तुकोबारायांनी, समर्थांनी हे धोके सांगून ठेवलेले आहेत.
मॅस्लो ने म्हटल्यानुसार, अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता ह्या चार गोष्टींची पूर्तता झाली की माणूस सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करायला लागतोच.
आपण आपल्या आजूबाजूला पाहतोच की, माणसं सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यापोटी काहीही करू शकतात. चौकाचौकांत फ्लेक्सच्या जागा वर्षभर गुंतून पडलेल्या असतात. अनेकदा त्या फ्लेक्सवर अगदी लहान-लहान मुलांचेही फोटो छापलेले असतात. एखाद्याच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक वर्तमानपत्रांची पानं शुभेच्छांच्या जाहिरातींनी भरलेली असतात. शुभेच्छा घेणार्‍यापेक्षा शुभेच्छा देणार्‍यांचेच फोटो भलेमोठे असतात. आपल्या देशात साध्या बसस्टॉपलासुद्धा लोक स्वत:चं नाव देतात.
पूर्वी वर्तमानपत्रात नाव किंवा फोटो येणं हे फार प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं. पेपरात नाव आलंयया गोष्टीनं माणसाच्या अंगावर मूठभर मांस चढायचं. आणि आपलं नाव छापून यावं म्हणून माणसं धडपडायची.
माध्यमांची रूपं बदलत गेली, तशी प्रसिद्धीची पद्धतही बदलत गेली. स्थानिक वृत्तवाहिन्यांवर जाहिरातींची पट्टी सुरूच असते. कुठल्याशा एका मराठी वाहिनीवर रोज सकाळी लहान मुलांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचा कार्यक्रम चालतो. एका बाळाचा फोटो दाखवतात अन् त्याच्या ढीगभर नातेवाईकांची नावं सांगतात. विविध रिलिटी शोज्मध्ये, आप की अदालत सारख्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षक कुठून येत असतील?
अनेक वाहिन्यांचे बातमीदार एखाद्या सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसांमध्ये माईक आणि कॅमेरा घेऊन जातात तेव्हा आपण टीव्हीत दिसणारह्या एकाच सुप्त इच्छेपायी माणसं कॅमेरासमोर एक सेकंदभर तरी दिसण्याची धडपड करताना दिसतात.
होम मिनिस्टरमध्ये महाराष्ट्राचे भावोजी घरी गेल्यावर ओळख करून द्याअसं सांगतात तेव्हा ती माणसं आपण अवश्य बघावीत. घरचं लग्न असल्यासारखी लोकं नटलेली असतात. वहिनी ओळख करून देताना सासरची माणसं, माहेरची माणसं, मैत्रिणी आणि सोसायटीतली माणसं अशी सगळी जंत्री सांगतात आणि कॅमेरा सगळ्यांवर फिरतो. लोकांचे चेहरे काय फुललेले दिसतात.. व्वाऽ! आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनातलं प्रसिद्धीचं मानसशास्त्र कसं असतं हे तुम्हांला दिसेल.
लग्नपत्रिका हे सुद्धा एक प्रसिद्धीचं माध्यमच झालेलं आहे. कारण त्यात आता आपले विनित बरोबरच शुभेच्छुक, कार्यवाहक आणि प्रमुख उपस्थिती असेही मथळे असतात. अनेक ठिकाणी मंगलप्रसंगी आहेर केल्यावर तो नावानिशी माईकवरून जाहीर सांगण्याची पद्धत अजूनही आहे.
दिवंगत व्यक्तींच्या विषयीची प्रसिद्धी हा तर एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. व्यक्ती निवर्तल्यावर वर्तमानपत्रात फोटो देतात आणि खाली शोकाकुल म्हणून नावं घालतात. चौकात फ्लेक्स लावतात. अनेकदा प्रथम, द्वितीय, तृतीय पुण्यस्मरणाच्या सुद्धा बातम्या दिसतात. त्यातही खाली नावं घातलेली असतात.
आता हे प्रसिद्धीचं भाग्य काही प्रत्येकाच्याच वाट्याला येत नाही. पण काळ बदलला अन् आपल्या आयुष्यात इंटरनेटनं प्रवेश केला. मग सोशल मीडीया अन् त्याची असंख्य अ‍ॅप्स आली. ही अ‍ॅप्स उगाच आली नाहीत आणि ती फुकटही नाहीत.
आपण चारचौघांत उठून दिसावं, सतत चर्चेत रहावं, लोकांनी आपल्याला पहावं, आपल्याविषयी चर्चा रंगवाव्यात, ही सुप्त इच्छा माणसांमध्ये असतेच ह्या एकाच छोट्याशा मानसशास्त्रीय संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवूनच ही सोशल मीडीया अ‍ॅप्सची मयसभा बांधण्यात आली.
प्रत्येकालाच हक्काची स्वतंत्र जागा अकाऊंटच्या रूपानं मिळाली. आपण कुठं जातो, काय करतो, काय खातो, काय पितो, कुणाबरोबर आहोत, आपल्याला काय आवडतं, काय आवडत नाही, कुठला सिनेमा पाहतो, कुठलं गाणं ऐकतो, आत्ता आपल्या मनात कोणत्या भावना आहेत हे सगळं सगळं जाहीर करण्यासाठी एक माध्यमच मिळालं. लोक इथं काहीही लिहू शकतात, बोलू शकतात, फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करू शकतात, वाट्टेल त्या शब्दांत टीका करू शकतात, अगदी ऐकवणार नाहीत किंवा वाचूही नयेत अशा घाणेरड्या शिव्याही पोस्ट करू शकतात.
आमच्या बागेत कळी उमलून फूल आलं, आज दूध नासलं म्हणून त्याचा चक्का कसा लावला आहे, शेजारच्यांच्या कुत्र्यानं आमच्या दारात कशी घाण करून ठेवली आहे, इथपासून ते हा पहा माझा मेकओव्हर’, ‘हा पहा माझा नवा हेअरकट’, ‘हे पहा माझं नवं स्टाईल स्टेटमेंट’, ‘हा पहा माझा नवा चष्मा’, ‘हा पहा माझ्या डोक्यावर उगवलेला पहिला पांढरा केसअसं काहीही आपण जगाला दाखवू शकतो. मी पाच वर्षांपूर्वी कसा दिसत होतो’, ‘मी दहा वर्षांपूर्वी कशी दिसत होतेअसलेही फोटो लोक पोस्ट करतात.
मला कोणती अभिनेत्री आवडते, कोणता अभिनेता आवडतो ते जाहीर सांगणं एकवेळ समजू शकतो. पण इथं तर रिलेशनशिप स्टेटस सुद्धा लिहीता येतं.
तुम्ही लोकांना शोधू शकता आणि त्यांचं प्रोफाईल तुम्हांला आवडलं तर मैत्रीही करू शकता. तुम्ही जशी लोकांची प्रोफाईल्स पाहता, तसे लोकही तुमचं प्रोफाईल पाहतच असतात. कुणाला कशात इंटरेस्ट असेल अन् कोण आपले फोटो, आपली माहिती पाहून तिचा काय अर्थ लावत असेल यावर आपला कसलाही ताबा असू शकत नाही. लोकांची विचारसरणी आपण कशी ठरवणार? आणि माझे फोटो पाहून, माहिती वाचून कुणालाही माझा मोह होऊ नये असं तरी कसं म्हणता येईल?
जगात सगळ्या प्रकारचे लोक असतात. काही केवळ प्रसिद्धीचे भुकेले असतात तर काहींचे हेतू निराळेच असतात. आपणच जरासं आत्मपरीक्षण केलं तर लक्षात येईल की आपल्या सोशल मीडीयावरच्या मैत्रयादीतल्या प्रत्येकालाच आपण पूर्ण ओळखतो असं नाही. अनेक अनोळखी व्यक्ती आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये आहेत. आपण त्यांच्याशी मैत्री का केली याचं नेमकं आणि शंभर टक्के खरं कारण आपल्यापैकी कितीजणांना सांगता येईल?
मला अमक्याचं प्रोफाईल जाम इंटरेस्टिंग वाटलं, काय कमाल दिसते ही बाई या वयातसुद्धा, वाटत नाही हिला दोन दोन मुलं असतील असं, काय जबरदस्त पर्सनॅलिटी आहे ना, गर्लफ्रेंड कसली लकी असेल ना याची, ह्याच्या सोबत एकदा जरी डेटवर जायला मिळालं तरी काय बहार येईल असा विचार मनात येत असणारच…! लोकांना दोष देणार तरी कसा?
यामुळं होतं काय? आपलं खाजगी आयुष्यच संपून जातं. आपण आपल्या सगळ्याच गोष्टी जगापुढं मांडायला लागलो. लोक आपले फोटो लाईक करतात, कमेंट्स करतात याचा आपल्याला फार आनंद होतो. माझ्या माहितीतल्याच अनेक महिला अशा आहेत की ज्या दर दिवसाला दहा-दहा सेल्फी पोस्ट करतात. असे सेल्फी किंवा क्लोजअप फोटोज् पोस्ट करण्यामागचा त्यांचा हेतू तरी काय असेल?
घरातला, माणसांमधला संवाद संपला की माणूस तो संवाद बाहेर शोधतोच. शेवटी कितीही झालं तरी आपण समाजशील प्राणी.. प्रायव्हसी हवी, स्पेस हवी असं कितीही ओरडलो तरी माणसं लागतातच आपल्याला..
कौटुंबिक समुपदेशनाच्या अनेक केसेसमध्ये मोबाईल फोन, इंटरनेट, सोशल मीडीया, व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम यांचा बेसुमार वापर हे एक प्रमुख कारण असल्याचं मला आढळून आलं. आपलं अत्यंत खाजगी आयुष्यसुद्धा जगाला दाखवण्याचा जो छंद माणसांना लागला त्यामुळं फार मोठा धक्का आपल्या नात्यांना बसला, हे आपल्या लक्षातच येत नाही. जे क्षण फक्त आणि फक्त आपल्या जोडीदाराबरोबरच घालवायचे असतात, त्यांचा आनंद घ्यायचा असतो, त्यांचे फोटो काढावेत का? हा माझ्या मनात कायम येणारा एक प्रश्‍न आहे. आणि ते फोटो सोशल मीडीयावर प्रसिद्ध करावेत का? हा दुसरा प्रश्‍न…! दोन्ही प्रश्‍नांची समाधानकारक आणि संतुलित उत्तरं मिळतच नाहीत.
आपण एकमेकांचं कौतुक करणं, आनंदानं पाहून हसणं, एकमेकांसोबत मस्त मनमोकळ्या गप्पा मारणं, निवांत वेळ घालवणं हे सगळं आपल्या आधुनिक आयुष्यातून चंबूगबाळं उचलून कधीच निघून गेलंय. आपला दिवस कधी उगवतो आणि कधी मावळतो याचा आपल्याकडे काही हिशोबच राहिला नाही. मी फार बिझी असतोहे वाक्य प्रतिष्ठेचं लक्षण झालंय. या सगळ्या धबगड्यात आपली इतरांकडून कौतुकाचे, आपुलकीचे, आस्थेचे दोन शब्द ऐकायला मिळण्याची सुप्त नैसर्गिक प्रेरणा पूर्ण होण्याचा एकच मार्ग उरला- तो म्हणजे सोशल मीडीया…!
दहा-पंधरा वर्षांपूर्वीची आपली आयुष्यं इतकी सार्वजनिक नव्हती. पण त्यामुळेच केवळ इतरांच्या नजरेत यावं याचा अट्टाहास किती असावा याला आपसूकच फार मर्यादा होत्या. पण आता लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याच्या नादात आपण मानसिकदृष्ट्या प्रचंड अस्वस्थ होत चाललो आहोत. कित्येकांना त्यांचे फोटो पोस्ट केले अन् त्याला लाईक्स मिळाले नाहीत की प्रचंड अस्वस्थ वाटतं, त्यांची चिडचिड सुरू होते, कशातच लक्ष लागत नाही. ही फार मोठी समस्या आहे.
लोकांनी आपली वाहवा केलीच पाहिजे, आपल्याला शुभेच्छा दिल्याच पाहिजेत, आपले फोटो त्यांना आवडलेच पाहिजेत असा काही नियम नाही. पण तरीही आपल्या अपेक्षांचं भूत ही गोष्ट समजूनच घेत नाही. आपल्या जवळच्या माणसांना आपल्यासाठी वेळच नसतो हा समज इतका पक्का झालेला असतो की कृत्रिम कौतुक मिळवण्याची लालसा आपल्याला सोशल मीडीयावरून अनोळखी व्यक्तींशी मैत्री करायला भाग पाडते. आपण ज्यांना कधी पाहिलंही नाही, ज्यांचा आणि आपला लांबून लांबून संबंध नाही अशा माणसांशी रात्र-रात्र चॅटिंग करायला लागतो. त्यांच्याशी आपल्या भावना शेअर करायला लागतो. खरं सांगायचं झालं तर, आपल्याला अनेकदा केवळ एक भावनिक आधार हवा असतो. पण समोरच्या व्यक्तीनं आपल्यात नेमकं काय काय पाहिलंय आणि त्याचा हेतू काय आहे, हे कसं समजणार?
नव्या नव्या जागी जाण्यात, नव्या नव्या लोकांना भेटण्यात, त्यांच्याशी मैत्री करण्यात, त्यांच्याशी गप्पा मारण्यात, विविध गोष्टी शेअर करण्यात मला फार रस आहे असं जर एखाद्या महिलेनं चारचौघांत जाहीरच केलं तर त्याचा सात्विकच अर्थ लावला जाईल असं मानणं मुळातच गाढवपणाचं ठरतं.
अनेक पोक्त वयाच्या विवाहित महिलासुद्धा अक्षरश: रात्र-रात्र अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करण्यामध्ये व्यस्त असतात. डेटिंगसाठीच्या अ‍ॅप्समध्ये त्या स्वत:ची नावं नोंदवतात. स्वत:चं बोल्ड प्रोफाईल पोस्ट करतात. अनेक माणसं ते प्रोफाईल फोटो चवीनं पाहतात. आता तर एकाहून एक सरस अशी फोटो एडिटींग अ‍ॅप्स आली आहेत. आपले फोटो डाऊनलोड केले जाऊ शकतात, ते ह्या अ‍ॅप्समधून अश्‍लीलरित्या एडिट केले जाऊ शकतात आणि ते विविध पॉर्न साईट्सवर विकले जाऊ शकतात, किंवा आपल्यालाच त्यातून ब्लॅकमेलही केलं जाऊ शकतं. हा धोका केवढा मोठा आहे…! आपलं संपूर्ण आयुष्यच आपण या पोकळ प्रसिद्धीच्या नादात पणाला लावलंय हे आपल्याला कधी कळणार?
विवाहीत स्त्रियांनी आपले चित्रविचित्र फोटो सोशल मीडीयावर का प्रसिद्ध करावेत? आपलं पोशाखाविषयीचं किंवा एकूण आचारस्वातंत्र्य आपण उपभोगतो, ते जगाला दाखवण्याची खरोखर आवश्यकता आहे का? ह्याचा विचार आपण कधी करणार आहोत?
महिला किंवा युवतींना असं वाटतं की केवळ आमचेच फोटो पाहिले जातात, पण असं नाही. पुरूषांचेही फोटो मोठ्या चवीनं पाहिले जातात, डाऊनलोड केले जातात. त्यांच्यावरही कमेंट्स पास होतातच. खास महिलांसाठीसुद्धा अशी चॅटिंग किंवा मेसेंजर अ‍ॅप्स आहेतच आणि त्यांच्यावर मेंबरशिपचे पैसे भरून महिला जॉईन होताना दिसतात. ह्या प्रकारच्या अ‍ॅप्सच्या भरपूर जाहिराती यूट्यूबवर दिसतील. चांगली सुसंस्कारित, सुशिक्षित कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेली माणसं अशा अ‍ॅप्सच्या जाळ्यात अडकलेलीही दिसतील.
अगदी तपशीलात विचार करून पाहिलं तर आपण चुकीच्या पद्धतीनं आणि अत्यंत भोळसटपणानं सोशल मीडीया वापरतो आहोत, हे आपल्याला जाणवेल. आपलं व्यक्तहोणं किंवा अभिव्यक्तहोणं कधीच खाजगी राहत नाही. त्याला सेन्सॉरशिपही नाही आणि कुणी संपादकही नाही. सारासारविवेकाच्या सगळ्या नाड्या सर्वस्वी ज्याच्या-त्याच्या हातात. आणि स्वैराचाराच्या जमान्यात कोण कुणाला विचारतंय? अशी एकूण सामाजिक परिस्थिती.
आपण आपलं संपूर्ण आयुष्यच जगापुढं अशा पद्धतीनं उलगडून ठेवतो की, नेमकं कोण कोण आपल्याकडे कोणत्या हेतूनं पाहतंय ह्याचा आपल्याला शेवटपर्यंत पत्ता लागू शकत नाही. आपल्या खाजगी माहितीचा महाप्रचंड डेटा काही कंपन्या त्यांच्या स्वार्थासाठी वापरतात, हे तर आपल्या गावीही नसतं.
मग अचानकच एखाद्या दिवशी कुणीतरी अनोळखी व्यक्ती (जिची आपल्याशी केवळ चॅटिंग पुरतीच ओळख असते) आपल्याशी काहीतरी निराळंच बोलायला लागते, तेव्हा आपल्याला धोक्याची जाणीव होते. समोरची व्यक्ती आपल्याला सरळ सरळ ऑफर द्यायला लागते, जरा जास्तच स्पष्ट बोलायला लागते, तेव्हा आपल्याला नैतिकतेची जाणीव व्हायला लागते. (अनेकांना तर ह्या पातळीपर्यंत गोष्टी येऊनही ती जाणीव होत नाही.) ती व्यक्ती आपल्या स्माईलीज् पाठवते, ‘सुंदर, ब्युटिफूलवगैरे मेसेजेस पाठवते तोपर्यंत सगळं गोड वाटतं. पण अशा मेसेजेसची देवाणघेवाण काही महिने चालल्यानंतर एकदम तू खूप सेक्सी दिसतेस/दिसतोस’, ‘आपण भेटूया का?’, ‘मला तुला भेटायचं आहेवगैरे मेसेजेस सुरू होतात. तेव्हा त्रास व्हायचं काय कारण? कारण अशा कमेंट्स करण्याची मुभा आपणच त्या व्यक्तीला दिलेली असते.
टाळी दोन हातांनीच वाजते, हा साधा नियम आहे. त्यामुळे, समोरच्या व्यक्तीनं माझ्याकडून अशी विचित्र अपेक्षा करावी, असं मी नेमकं काय वागलो/वागले, बोललो/बोलले हे शोधलं पाहिजे. आपले हौसेनं पोस्ट केलेले फोटो नेमकं काय काय ध्वनित करतायत, पाहणार्‍यांना नेमका काय मेसेज देतायत हे तपासलं पाहिजे.
आपण आपल्याला मिळालेल्या माध्यमस्वातंत्र्याचा उपयोग अवश्य करावा. पण त्याला निराळीच टोकाची आणि आयुष्य उध्वस्त करणारी वळणं लागू नयेत ही जबाबदारीही सर्वस्वी आपली स्वत:चीच आहे, हे अजिबात विसरू नये…!
जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येउनि लागे्॥
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीने मती राम सोडी्॥
ह्या समर्थवचनाचा विसर न पडावा…!
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पु


No comments:

Post a Comment