Total Pageviews

Thursday, 12 September 2013

police deart due govt apathy

पोलीस निरीक्षक अरविंद सरवणकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने जे. जे. रुग्णालयात निधन छोटा राजन टोळीतील गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या याच्या बनावट चकमक प्रकरणात सजा ठोठावण्यात आलेले पोलीस निरीक्षक अरविंद सरवणकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने जे. जे. रुग्णालयात निधन झाल्याचे वृत्त आले आणि पोलीस दलात अस्वस्थता पसरली. एका गुंडाच्या बनावट चकमक प्रकरणात १३ पोलिसांसह तब्बल २१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागण्याचा विरळाच निकाल लागल्याने आधीच खळबळ माजली होती. त्यातच एका पोलीस अधिकाऱ्याचा अशा रीतीने अंत व्हावा, हे तमाम पोलिसांसाठी क्लेशदायक होते. जेमतेम ४३ वर्षांच्या सरवणकर यांचा चकमकीशी थेट संबंध नसल्याचे सरकारी वकिलांच्या युक्तिवादातूनही स्पष्ट झाले होते. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष पथकाच्या अहवालातही सरवणकर यांच्यावर ठपका नव्हता. मात्र न्यायालयाने चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा वगळता सर्वाना दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याने सरवणकर यांनाही सर्वासोबत तळोजा तुरुंगात जावे लागले. याआधी हे सर्व तब्बल तीन-साडेतीन वर्षे ठाण्यातील तुरुंगात होते. तळोजा तुरुंगातच या सर्वाच्या आजारपणाचा पाढा सुरू झाला. महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सुसज्ज तुरुंग असा गाजावाजा करीत २००८ मध्ये खुल्या झालेल्या तळोजा मध्यवर्ती तुरुंगातील कमालीच्या असुविधांचा सरवणकर बळी ठरले, अशी पोलीस वर्तुळाची भावना आहे. सरवणकर यांना वेळीच वैद्यकीय सुविधा मिळाल्या असत्या तर कदाचित त्यांना जीवदान मिळाले असते. तळोजा हा खुला तुरुंग आहे. अस्ताव्यस्त झुडपे आणि अस्वच्छतेमुळे मलेरियाग्रस्त कैदी हे तेथे नेहमीचे झाले असले, तरी ५० कोटींच्या या तुरुंगात इस्पितळाचे अस्तित्व फक्त चार खाटांपुरते आहे. डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे बऱ्याच वेळा कैद्यांना व्हॅनमध्ये कोंबून वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात नेले जाते. तेथे कैद्यांसाठी स्वतंत्र वॉर्ड नसल्यामुळे वैद्यकीय सुविधा मिळण्यात अडचणी येतात. सरवणकर सुरुवातीला मलेरियाने आजारी होते. ४ सप्टेंबर रोजी त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला. त्यासाठी तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात चालढकलच झाली. अखेरीस त्यांचा आजार बळावला आणि सुरुवातीला वाशी येथील महात्मा गांधी रुग्णालयात व नंतर जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारातील हेळसांड त्यांच्या जिवावर बेतली. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही या शिक्षा झालेल्या पोलिसांची बाजू घेत शिक्षा कमी करण्याची नेहमीच्या थाटात घोषणाही केली होती. ती घोषणा प्रत्यक्षात येण्याआधीच सरवणकर यांचा मृत्यू झाला आहे. या सर्व कैद्यांचे पॅरोलचे अर्ज महिन्याभरापासून गृहखात्यात पडून आहेत. या कैद्यांना आठ दिवसांचा पॅरोल मंजूर झाला असता तर काही क्षण कुटुंबीयांबरोबर घालवता आले असते. परंतु आबांच्या गृहखात्याने तेही कागदी घोडे नुसते नाचवत ठेवले. राज्यातील मध्यवर्ती तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी कोंबले जात असल्याची बाब वेळोवेळी समोर आली आहे. तळोजा तुरुंगामुळे ठाणे व येरवडा तुरुंगांवरील ताण कमी होईल अशी अपेक्षा होती. परंतु तळोजा तुरुंगातील गैरसोयींकडे सतत दुर्लक्षच केले गेले. तुरुंगात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरवणकर यांच्यानंतर आणखी किती बळी जावे लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment