उस्मानीचा शोध आता लागलाच तर त्याला दिसताक्षणी गोळ्या घालाव्यात व गोळ्या घालणार्या पोलिसांच्या मागे सरकारने ठामपणे उभे राहावे हीच जनतेची इच्छा आहे.
पोलिसांना का झोडपता?
आता उस्मानीला गोळ्या घाला!
गुजरात पोलिसांनी पकडलेला इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी उस्मानी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला ही अत्यंत संतापाची आणि गंभीर अशी बाब आहे. पळून गेलेला अफझल उस्मानी हा अहमदाबाद आणि सुरत बॉम्बस्फोटांचा आरोपी होता. उस्मानीच्या पलायनाचा ठपका नेहमीप्रमाणे पोलिसांवर आला आहे व सगळ्यांनी मिळून गृहमंत्री आर.आर. म्हणजे आबा पाटील यांना सुळावर चढवले आहे. उस्मानी कोर्टातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला हे खरे, पण त्यासाठी संपूर्ण पोलीस दलाचे वस्त्रहरण धोबीघाटावर करायचे व आपल्याच पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रकार राज्यकर्त्या पक्षांनी तरी करू नयेत. मुख्यमंत्र्यांनी नागपुरात सांगितले की, ‘‘बॉम्बस्फोटांतील आरोपी उस्मानी पळाला तो पोलिसांच्या ढिलाईमुळे.’’असे सांगून मुख्यमंत्र्यांनी गृहखात्यावर ठपका ठेवला, पण फक्त गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे म्हणून ठपका ठेवून भागणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपलीही जबाबदारी तेवढीच आहे. मुख्यमंत्री हे काही फक्त सरकारी विश्रामगृहांवर व विमानतळांवर पोलिसांच्या सलाम्या घेण्यासाठी नाहीत व पोलिसांचे काम फक्त मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यापुरतेच नाही. उस्मानी पळाला कारण मुंबई पोलिसांवर कामाचे जबरदस्त ओझे आहे आणि हे ओझे वाहून पोलिसांचे कंबरडे मोडून पडले आहे व मोडक्या कंबरड्याने पोलीस उस्मानीसारख्या अतिरेक्यांना कोर्टाच्या तारखांसाठी घेऊन जात आहेत. शरद पवार यांचे म्हणणे खरे मानले तर मुख्यमंत्री काहीच कामे करीत नाहीत व
मंत्रालयात फायली तुंबवून
त्यांचा डोंगर केला आहे. निर्णय घेऊन कामे पुढे रेटणे हे मुख्यमंत्र्यांचे काम, पण अशा कामांचा ताण घ्यायला मुख्यमंत्री तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांचा ताण काय असतो हे त्यांना समजणे कठीण आहे. उस्मानी पळाला तो पोलिसांच्या तणावाचा फायदा घेऊन. मुळात अशा खतरनाक अतिरेक्यांना तळोजा येथून फक्त तारखा घेण्यासाठी मुंबईच्या कोर्टात वारंवार आणणे आवश्यक आहे काय? अशा दहशतवाद्यांचा खटला व रिमांडची प्रकरणे ‘व्हिडीओ’ कॉन्फरन्सिंगद्वारेच चालवायला हवीत हे अनेकदा ठरवूनही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. तसे झाले असते तर हा उस्मानी असा पळून गेला नसता. पोलिसांवर कामाचा ताण आहे व मुंबईवर इतके भयंकर हल्ले होऊनही पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण होऊ शकले नाही. दहशतवाद्यांच्या ‘एस्कॉर्ट’मध्ये असलेल्या दहा पोलिसांपैकी फक्त दोन पोलिसांकडे शस्त्रे असतात. बाकीचे सारे हरीगोपाळच म्हणावे लागेल. गृहमंत्र्यांची ढिलाई मुख्यमंत्र्यांना खटकत असेल तर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सर्व तडफेने व धडकेने केले पाहिजे. सरकारात मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘दोन बायका फजिती ऐका’ अशीच आहे, पण राज्याच्या सुरक्षेचे निर्णय घेताना तरी हात थरथरू नये एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. पोलिसांनी ढिलाई केली असे मुख्यमंत्री म्हणतात, पण बॉम्बस्फोटांतील आरोपींना पळून जाण्यास मदत करण्याइतपत नासके रक्त मराठी पोलिसांच्या अंगात शिरलेले नाही. चूक झाली आहे हे मान्य करावे लागेल, पण
मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या सुरक्षेत असलेले पोलीस
ढिलाई करीत नाहीत व उस्मानीच्या सुरक्षेतले पोलीस ढिलाई करतात हा आरोप बरा नाही व सरकारच्या प्रमुखाने तरी तो करू नये. ज्या मराठी पोलिसाने म्हणजे तुकाराम ओंबळेंनी प्राणाचे बलिदान देऊन कसाबसारख्या भयंकर अतिरेक्यास जेरबंद केले त्याच ओंबळेंचे रक्त मुंबई पोलिसांच्या अंगात आहे, पण याच मुंबई पोलिसांच्या अंगावर मुसलमानी अतिरेक्यांनी आझाद मैदानावर हात टाकला, महिला पोलिसांचा विनयभंग केला तेव्हा मुख्यमंत्र्यांचे तोंड का शिवले होते? आझाद मैदानावरील या धर्मांध आरोपींना चिरडण्यात पोलिसांनी ढिलाई केली, अशा प्रकारचे कडक विधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आले असते तर पोलिसांच्या अंगावर गुंजभर मांस चढले असते. ऊठसूट महाराष्ट्राच्या पोलिसांना झोडपून काढणे ही आता फॅशन झाली आहे. पोलिसांनी जीवावर उदार होऊन शौर्य गाजवायचे व त्या बदल्यात त्यांच्या नशिबी तुरुंगवास, निलंबने व जन्मठेपा यायच्या. अशावेळी राज्यकर्त्यांनी स्वत:ची चमडी व दमडी वाचविण्यासाठी पोलिसांना वार्यावर सोडायचे हे धंदे ज्या दिवशी बंद होतील त्या दिवसापासून एकही उस्मानी पळून जाणार नाही. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी तर कमाल केली. उस्मानीच्या पलायनाने ते इतके संतापले की त्यांनी सांगितले, ‘‘गुजरात पोलीस अतिरेक्यांना पकडतात व महाराष्ट्र पोलीस त्यांना सोडून देतात.’’ मुंडे यांचे गुजरात प्रेम आम्ही समजू शकतो. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा असा उपमर्द करण्याची गरज कुणाला नाही. उस्मानीचा शोध आता लागलाच तर त्याला दिसताक्षणी गोळ्या घालाव्यात व गोळ्या घालणार्या पोलिसांच्या मागे सरकारने ठामपणे उभे राहावे हीच जनतेची इच्छा आहे
No comments:
Post a Comment