Total Pageviews

Saturday 5 September 2015

11 दिवसांत 10 दहशतवाद्यांना ठार करणारा हुतात्मा लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी

11 दिवसांत 10 दहशतवाद्यांना ठार करणारा हुतात्मा लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी लान्स नायक गोस्वामी यांना दहशतवाद्यांशी लढताना वीर मरण जम्मू आणि काश्‍मीरमध्ये लष्कराच्या विशेष कमांडो पथकातील लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी यांनी असामान्य साहस दाखवून मागील 11 दिवसांत तब्बल दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यांच्या या अद्वितीय धाडसी पराक्रमाचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत असतानाच, दहा दहशतवाद्यांना ठार करणारा भारताचा हा सुपुत्र गुरुवारी हुतात्मा झाला आणि गोस्वामी यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दहशतवाद्यांशी लढत असताना हंडवाडा येथे गोस्वामी यांना वीर मरण प्राप्त झाले. ‘काश्‍मीर खोऱ्यात मागील अकरा दिवसांत तीन दहशतवाद विरोधी मोहिमा लष्कराने राबविल्या. या मोहिमांमध्ये दहा दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले असून, एका दहशतवाद्याला जिवंत पकडले आहे. लष्कराच्या या मोहिमांमध्ये आघाडीवर असलेल्या लान्स नायक गोस्वामी यांनी दहशतवाद्यांना ठार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कुपवाडा जवळच्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमेमध्ये चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. मात्र याच मोहिमेवेळी गोस्वामी यांना वीर मरण आले,‘‘ अशी माहिती लष्कराच्या उधमपूर येथील प्रवक्‍त्याने दिली. गोस्वामी यांच्या पाठीमागे पत्नी आणि सात वर्षांची मुलगी आहे. गोस्वामी यांनी स्वतःहून लष्कराच्या पॅरा कमांडो पथकात काम करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर 2012 पासून ते काम करत असलेल्या तुकडीतील एक उत्कृष्ट सैनिक म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या, असे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. 23 ऑगस्ट रोजी लष्कराने राबविलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमेत गोस्वामी यांनी सहभाग घेतला होता. या वेळी तीन कट्टर दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. तर दुसऱ्या मोहिमेवेळी गोस्वामी यांचा सहभाग असलेल्या पथकाने "लष्करे तोयबा‘च्या सज्जाद अहमद ऊर्फ अबू उबैदुल्हा या पाकिस्तानचा नागरिक असलेल्या दहशतवाद्याला जिवंत पकडले होते. लष्करी इतमामात अंत्यसंस्कार जम्मू आणि काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेल्या लान्सनायक मोहन नाथ गोस्वामी यांच्या पार्थिवावर आज संपूर्ण लष्करी इतमामात बिंदूखट्टा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराप्रसंगी उत्तराखंडचे कामगारमंत्री हरिश्‍चंद्र दूर्गपाल यांच्यासह लष्कर आणि प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परिसरातील शेकडो नागरिकांनीही हुतात्मा गोस्वामी यांना श्रद्धांजली अर्पण केली. गोस्वामी यांच्या परिवारात सैन्य दलात काम करण्याची परंपराच आहे. बिंदूखट्टा येथील रस्त्याला दिवंगत गोस्वामी यांचे नाव देण्याची घोषणा या वेळी दूर्गपाल यांनी केली.

No comments:

Post a Comment