Total Pageviews

Sunday, 27 September 2015

मक्केतील दुर्घटनेची चौकशी व्हायलाच हवी

मक्केतील दुर्घटनेची चौकशी व्हायलाच हवी (sakal editorial)आणि त्याची नेमकी कारणेही स्पष्ट व्हायला हवीत. पण त्यानिमित्ताने अलीकडल्या काळात गर्दीचे व्यवस्थापन हे दिवसेंदिवस किती अवघड होत चालले आहे, यावरही प्रकाश पडला आहे. भरमसाठ पैसा, धार्मिक परंपरेचा वारसा आणि राजघराण्याची मातब्बरी किंवा वलय एवढेच एखाद्या देशाकडे असणे पुरेसे नसते. देशाच्या कारभाराची सारी चक्रे सुव्यवस्थित चालण्यासाठी संस्थात्मक पाया मजबूत करावा लागतो. त्या आधाराने केलेला कारभार लोकाभिमुख आणि उत्तरदायी असावा लागतो. पण सौदी अरेबियाच्या राज्यकर्त्यांना यापैकी कशाचीच फिकीर दिसत नाही. दीर्घकाळ अमेरिकेचा लाडका देश असलेला सौदी अरेबिया "सिस्टिम्स‘ कशा चालवायच्या याविषयी मात्र आपल्या पाठीराख्या देशाकडून काही शिकलेला दिसत नाही. हज यात्रेच्या काळात आजवर अनेक दुर्घटना घडून गेल्यानंतरही त्यांचे डोळे उघडलेले नाहीत, हीच मोठी शोकांतिका म्हटली पाहिजे. संकटाचा अंदाज घेण्यात तेथील प्रशासन सपशेल नापास झाले आहे. आता इतरांवर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू असला तरी त्या देशाच्या राज्यकर्त्यांना जबाबदारीतून अंग काढून घेता येणार नाही. हज यात्रेसाठी मक्का् येथे जमलेल्या भाविकांनी सैतानाला दगड मारण्याच्या विधीच्या वेळी प्रचंड गर्दी केली. त्यात अभूतपूर्व अशी चेंगराचेंगरी झाली आणि सातशेहून अधिक भाविक मृत्युमुखी पडले. एका अंदाजानुसार त्या ठिकाणी त्या वेळी 20 लाखांहून अधिक भाविक जमा झाले होते. एवढ्या प्रचंड गर्दीचे नियंत्रण करणे, ही खरे तर कसरतच होती, यात शंका नाही. परंतु, एवढ्या मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणी जमा होणार म्हटल्यानंतर जास्त दक्षता घ्यायला हवी होती. धार्मिक स्थळी जमलेल्या भाविकांवर नियंत्रण ठेवणे, हे सरकारी यंत्रणांसाठी आव्हानच असते. बारा वर्षांपूर्वी नाशिकला झालेल्या कुंभमेळ्यातही असेच नियंत्रण सुटल्यामुळे काही भाविकांना प्राण गमवावे लागले होते आणि साबरीमाला येथेही प्रचंड गर्दीमुळे अशा घटना घडल्या आहेत. पण मक्केात गुरुवारी घडलेल्या दुर्घटनेची व्याप्ती ही या अशा दुर्दैवी अपघातांपेक्षा प्रचंड आहे आणि मृत्यूला सामोरे जावे लागलेल्या या भाविकांमध्ये जगभरातील मुस्लिम बांधवांचा समावेश आहे. त्यामुळेच या दुर्घटनेनंतर जगभरात जसे शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे, तशीच संतापाची लाटही उसळली आहे. मक्कास आणि मदिना येथे होणारी गर्दी जशी नवी नाही, त्याचबरोबर या गर्दीमुळे घडणाऱ्या दुर्घटनाही नव्या नाहीत. 1990 मध्ये मक्केेत झालेल्या अशाच चेंगराचेंगरीत 1426 भाविकांना प्राण गमवावे लागले होते. गेल्या काही शतकांतील मक्केोतील ही सर्वांत मोठी शोकांतिका समजली जाते. त्यात पुन्हा यंदाच्या हज यात्रेवर अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी मक्केातील "मसजिद अल-हराम‘ या जगभरात "ग्रॅण्ड मॉस्क‘ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मशिदीत क्रेन कोसळून झालेल्या अपघाताचे सावट होते. मक्का्-मदिना या दोन धर्मस्थळांची आयुष्यात किमान एकदा तरी यात्रा करावी, अशी जगभरातील मुस्लिमांची इच्छा असते. अर्थात आर्थिकदृष्ट्या शक्यआ असेल अशा मुस्लिमांनीच ही यात्रा करावी, असे मुस्लिम धर्मशास्त्र सांगते, तरीही या यात्रेला कायमच तुफानी गर्दी होत असते. सौदी अरेबियात बकरी ईद गुरुवारीच आली. सैतानाला दगड मारण्याचा विधी माध्यान्हापूर्वीच पार पाडण्याच्या रिवाजातून उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. मृत भाविकांमध्ये सर्वाधिक भाविक होते ते इराण या सौदी अरेबियाच्या पारंपरिक शत्रू देशातील. त्यामुळेच आता या दुर्घटनेची नेमकी जबाबदारी कोणाची यावरून आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला आहे. गर्दीचे नियंत्रण करण्यात सौदी अरेबिया अपयशी ठरल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप इराणने केला आहे. पण हज कमिटीचे प्रमुख प्रिन्स खलिद अल-फैजल यांच्या "आफ्रिकेतील काही भाविक नियमानुसार वागत नव्हते आणि ते उतावळे झाल्यामुळेच ही दुर्घटना घडली,‘ या विधानामुळे खळबळ उडाली आहे. या विधानाला वर्णद्वेषाची किनार असल्याचा आरोप पत्रकार आणि फिलाडेल्फियातील "मिडल ईस्ट फोरम थिंक टॅंक‘चे फेलो तारेक फताह यांनी केला आहे. त्यामुळेच सौदीचे नूतन सम्राट सलमान यांना ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आणि त्यास कोण जबाबदार आहे, यासंबंधात तातडीने उच्चस्तरीय चौकशीची घोषणा करणे भाग पडले आहे. पण इराण तेवढ्यावर संतुष्ट असल्याचे दिसत नाही. इराण सरकारने या दुर्घटनेनंतर सौदीच्या राजदूतास पाचारण करून, सौदी सरकारच्या या यात्रेसाठीच्या अपुऱ्या व्यवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्ता केली आहे. या दुर्घटनेची चौकशी व्हायलाच हवी आणि त्याची नेमकी कारणेही स्पष्ट व्हायला हवीत. पण त्यानिमित्ताने अलीकडल्या काळात गर्दीचे व्यवस्थापन हे दिवसेंदिवस किती अवघड होत चालले आहे, यावरही प्रकाश पडला आहे. त्यातही धार्मिक स्थळांवरील जमाव हा अनेक कारणांमुळे अस्वस्थ आणि प्रक्षोभक अवस्थांच्या सीमारेषेवर उभा असतो. त्याला आवरायला गेल्यास धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप होऊन जमाव अधिकच संतप्त होतो. त्यातून वातावरण स्फोटक बनते. सर्वच धर्माचार्यांनी आपापल्या भाविकांना शिस्तीने वागायला सांगायला हवे. नियंत्रण हे बाहेरून लादण्यापेक्षा ते स्वत:हूनच अमलात आणले गेले, तरच अशा दुर्घटना टळू शकतील

No comments:

Post a Comment