अण्णांच्या हाकेला धावतोय युवक वर्ग... अहमदनगर (18-August-2011) Tags : Ahmednagar,Editorialयुवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. युवकांनी मनावर घेतले तर जन आंदोलनाच्या माध्यमातून मोठी क्रांती होऊ शकते, ही धारणा आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची. युवाशक्तीला जागविण्याच्या भूमिकेतून अण्णांनी राज्यभरातील शाळा, महाविद्यालयात व्याख्याने देऊन युवकांमधील स्फुल्लिंग पेटविण्याचे काम केले आणि अण्णांच्या हाकेला ओ दिल्याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या जनलोकपाल आंदोलनातील युवकांच्या सहभागावरून दिसून येत आहे. ग्रामविकासाच्या कार्यात एक तप झोकून दिल्यानंतर ग्रामविकासाला लागलेली भ्रष्टाचाराची गळती बंद करण्यासाठी अण्णांनी ‘भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन’ स्थापन करून ग्रामविकासाबरोबर भ्रष्टाचार निर्मूलन कार्यात झोकून दिले. माहितीच्या अधिकारासारखा कायदाही अण्णांच्याच आंदोलनामुळे तयार झाला. जनतेच्या हितासाठी गेल्या वीस वर्षांत ११३ दिवस उपोषण तर दीडशे दिवस मौन व्रत धारण केले. परंतु देशातील स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी युवकांशिवाय पर्याय नाही, हे स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रभाव असलेल्या अण्णांनी ओळखले होते आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांनी युवा वर्गाच्या जागृतीवर भर दिला होता. यासाठी राज्यभरात दौरे करून शाळा, महाविद्यालयांत व्याख्याने देऊन अण्णांनी तरुणांमध्ये जागृती केली होती. युवकांच्या जनजागृतीमध्ये शिक्षण क्षेत्रातील वाढते बाजारीकरण, यामुळे सामान्यांच्या मुलांना उच्चशिक्षण घेणे कसे कठीण झाले हा प्रभावीपणे अण्णांनी मांडलेला मुद्दाही युवकांना भावत होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, बाबू गेणू यांच्यासारख्या तरुण देशभक्तांनी केलेल्या बलिदानाची आठवणही अण्णा युवकांना करून देत होते. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. युवक वर्ग जागृत झाल्याशिवाय या देशात नवी क्रांती घडणार नाही. यासाठी युवकांनी जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अण्णा वारंवार करीत होते. अण्णांच्या गेल्या वीस वर्षातील आंदोलनांमध्ये तरुणांचा सहभाग अत्यंत अल्प प्रमाणातच होता. राळेगणसिद्धी वगळता इतर भागात कोठेही युवक वर्ग आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसत नव्हते. परंतु अण्णांच्या युवक जागृतीच्या दौर्याला या आंदोलनाच्या निमित्ताने फळे लागल्याचा सध्या प्रत्यय येत आहे. सध्याच्या युवकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकनायक जयप्रकाश नारायण पाहिले नाहीत. मात्र, ही पिढी अण्णांच्याच रूपात गांधीजी आणि जयप्रकाशजी पाहत आहे. युवा वर्गाचा मोठा सहभाग आंदोलनात वाढत आहे. शाळा, महाविद्यालये बंद करून स्वयंस्फूर्तीने युवक वर्ग रस्त्यावर उतरत आहे. अण्णांच्या नावाच्या टोप्या, टी शर्ट, मोबाईलवरील रिंगटोन आणि एसएमएसही. सध्याच्या युवा वर्गात ‘अण्णा’ नावाची मोठी ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे. देशासाठीच्या स्वातंत्र्याच्या दुसर्या लढाईत अण्णांच्या हाकेला ओ देत युवक वर्ग सरसावला आहे. युवकांनी जर आंदोलनातील वाढता सहभाग असाच ठेवला तर अण्णांच्या स्वप्नातील ‘भारत निर्माण’ होण्यास वेळ लागणार नाही
No comments:
Post a Comment