Total Pageviews

Friday, 3 January 2025

चीन बांधणार ब्रह्मपुत्रा नदीवर महाकाय धरण आणि भारताच्या विरोधात सुरू करणार पाणी युद्ध

https://www.youtube.com/shorts/hVe9g8SlEIw 

चीनशी संबंध म्हणजे एक शून्याचा पाढा आहे. भारत चीन सीमेबाबत चीन घुसखोरी केलेल्या भागातून परत गेल्यानंतर भारत चीन संबंध सुधारतील अशी आशा निर्माण झाली होती. मात्र चीन सतत भारतावरती मानसिक दबाव टाकत राहील .सीमा विवाद करार झाल्यानंतर चीनने पुन्हा एकदा भारताला आठवण करून दिली की चीन भारताविरुद्ध पाणी युद्ध(Water War) सुरूच ठेवेल. त्याची आठवण म्हणून एक घोषणा करण्यात आली की एक महाकाय धरण चीन ब्रह्मपुत्रेवर भारत चीन सीमेवर बांधत आहे.चीन भारताकडे केवळ एक आर्थिक बाजारपेठ म्हणून बघतो, एक बरोबरीचा देश म्हणून नाही.

हे जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण असेल.चीनचे धरण तिबेट स्वायत्त प्रदेशातील यारलुंग त्सांगपो नदीवर बांधण्यात येईल . यारलुंग त्सांगपो तिबेटच्या पठारावरून वाहते आणि नंतर अरुणाचल प्रदेशातून ती आसामात  प्रवेश करते, जिथे तिला ब्रह्मपुत्रा नदी म्हणतात. धरण थ्री गॉर्जेस धरणापेक्षा तिप्पट ऊर्जा निर्माण करेल. थ्री गॉर्जेस धरण दरवर्षी ८८.२ अब्ज किलोवॅट वीज निर्माण करते. प्रस्तावित धरण दरवर्षी ३०० अब्ज किलोवॅट वीज निर्मिती करू शकेल. जलविद्युत प्रकल्पाची किंमत एक ट्रिलियन युआनपेक्षा (१३७ बिलियन डॉलर्स) जास्त असू शकते. ही किंमत जगभरातील कोणत्याही पायाभूत सुविधा प्रकल्पापेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत, थ्री गॉर्जेस धरणातील गुंतवणूक २५४.२ अब्ज युआन (३४.८३ अब्ज डॉलर्स) होती. बांधकाम कधी सुरू होणार आणि धरणाचे नेमके ठिकाण काय, हे अद्याप स्पष्ट नाही.

चीनच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे, पण तो भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे. एकदा हे धरण बांधून पूर्ण झाले की ब्रह्मपुत्रचे पाणी चीन हवे तेव्हा रोखू शकेल, हवे तिकडे वळवू शकेल . या पाण्यावरील नियंत्रणातून चीनच्या हाती अरुणाचल आणि आसामच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम हा तर वेगळाच भाग आहे, ज्यामुळे भारत आणि बांगलादेशातील लाखो लोक प्रभावित होऊ शकतात. याबद्दल भारताने वेळोवेळी चीनशी चर्चा केली आहे. चीनने तसे काही होणार नाही असे वेळोवेळी आश्वस्तही केले आहे. पण चीनची वीज आणि पाण्याची प्रचंड तहान पाहता त्या आश्वासनांवर किती विसंबायचे हा प्रश्नच आहे.


No comments:

Post a Comment