*शिवरायांचे आरमार*
*अष्टौ गुणा: पुरूषं दीपयन्ति*
*प्रज्ञा च कौल्यं च दम: श्रुतं च*
*पराक्रमश्च अबहुभाषिता च*
*दानं यथाशक्ति कृतज्ञताश्च*
भावार्थ -- माणसाला मोठेपणा मिळवून देणारे आठ गुण आहेत.
१. प्रज्ञा २. कुलीनता ३. संयम
४. पराक्रम ५. मितभाषण
६. ज्ञान ७. यथाशक्ती दान करणे.८. कृतज्ञता.
हा श्लोक वाचल्यानंतर असे वाटते की सुभाषितकाराने शिवरायांना समोर ठेवून हा श्लोक रचला असावा.
शिवरायांच्या काळात होत्या इस्लामिक सत्ता होत्या, त्यांच्या सत्ताधीशांना आरमाराकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. ११ व्या शतकात चोला राजा रामराज याने आरमाराकडे लक्ष दिले होते. असे आरमाराकडे लक्ष देणारा तोच अखेरचा हिंदू राजा होता.
पंधराव्या शतकात संगमेश्वरचा जखुराय नावाचा एक जहागिरदार होऊन गेला. तथापि आरमाराचे महत्त्व जाणणारा चोल राजा रामराज याच्यानंतर सहाशे वर्षांनी शिवरायांनी आरमाराची स्थापना केली.
शिवरायांना सागरावरच्या शत्रूची चाहूल लागली. सागरावर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या बलाढ्य शत्रूच्या विरोधात तेवढ्याच सामर्थ्याने उभे राहावे लागणार होते. याची शिवरायांना जाणीव होती.
सोळाव्या शतकापासून पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच या सत्ता स्वतःच्या आरमाराच्या बळावर हिंदुस्तान वर स्वारी करून आल्या. त्यांनी कोलकाता, चेन्नई, गोवा, वेंगुर्ला, राजापूर, मुंबई , सुरत अशा विविध ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या. हे सर्व पाहून त्यावेळच्या सत्ताधीशांनी आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही. आपले स्वतःचे आरमार असावे असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कोणीही पुढे सरसावले नाही. अपवाद शिवरायांचा होता.
हिंदवी स्वराज्याचा विस्तार करणे हे शिवरायांचे ध्येय होते. कोकणात आपल्या राज्याचा विस्तार त्यांना करायचा होता. तिथे आपले राज्य टिकवायचे असेल तर स्वतःचे सामर्थ्यशाली आरमार हवे. त्याचबरोबर बळकट जलदुर्ग असलेच
पाहिजेत. हे शिवरायांनी ओळखले. आरमार उभे करायचे तर बंदर आणि गोद्या हव्यात. वर्ष १६५६-१६५७ पासून शिवरायांनी आरमाराच्या उभारणीला प्रारंभ केला. त्यांनी सिंधुदुर्ग, खांदेरी यांसारखे किल्ले उभे केले. विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यांसारखे बळकट किल्ले कोकणच्या किनाऱ्यावर उभे करून अशा बळकट किल्ल्यांची एक माळ निर्माण केली. यापूर्वी कोणत्याही राजाने जलदुर्ग उभारण्याचा विचारही केला नव्हता.
वर्ष १६५६ मध्ये कल्याण आणि भिवंडी वर भगवा डौलाने फडकला. त्याच शुभमुहूर्तावर शिवरायांनी कल्याणला लढाऊ नौका बांधण्याच्या कार्याला आरंभ केला. विजयदुर्गा जवळ गड नदीच्या खाडीत जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती साठी गोद्या बांधल्या.
महानायक भंडारी, कान्होजी आंग्रे , धुळप अशी अनेक निष्ठावान मंडळी समर्थपणे आरमाराची धुरा सांभाळत होते. या वीरांनी मराठ्यांच्या आरमाराचा वचक शत्रूवर बसवला होता. शिवरायांनी आरमाराची स्थापना केली तो दिवस २४ ऑक्टोबर १६५७ म्हणजे आश्विन वद्य द्वादशी अर्थात वसुबारस शके १५७९.
आरमार म्हणजे राज्याचे एक स्वतंत्र अंग आहे. ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आणि ज्याच्या जवळ समर्थ आरमार त्याचा समुद्र ! या उक्तीला अनुसरून शिवाजी महाराजांनी सागरावरून होणाऱ्या आक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.
कोकणचा किनारा हा बहुतांशी उथळ आहे. तिथल्या खाड्यांची पात्रे सुद्धा उथळ आहेत. भरतीच्या वेळी खाड्यांमध्ये पाणी काही मैलांपर्यंत भरते. ओहोटीच्या वेळी ती पात्रे उघडी पडतात. त्यामुळे ह्या खाड्यांमधून वाहतुकीला निमुळत्या बुडाची जहाजे कुचकामी ठरतात. हे ध्यानात घेऊन शिवरायांनी खास सपाट बुडाच्या छोट्या होड्या बांधून घेतल्या. या होड्यांनी खांदेरीच्या युद्धात इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळवले. इंग्रजांच्या बलाढ्य युद्धनौकांना नामोहरम करण्यात या छोट्या नौका यशस्वी झाल्या.
अत्यंत अल्प काळात शिवरायांनी स्वराज्याच्या आरमारात गुराबा, तरांडी, गलबते, महागि-या खोड्या, मचवे, पगार, तिरकटी, पाल अशा विविध प्रकारच्या नौका समाविष्ट झाल्या. त्यांची एकूण संख्या ७०० पर्यंत पोहोचली.
शिवरायांनी अत्यंत अल्पकाळात आपले आरमार दल इंग्रजांच्या तोडीस तोड बनवले. जंजिर्याच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे शिवरायांना तो जलदुर्ग जिंकता आला नाही. तथापि सिद्दीच्या ताब्यातले जमिनीवरचे सर्व गड किल्ले आणि भूभाग यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यावर आपल्या स्वामित्वाची मोहोर उमटवली.
जंजिऱ्याला असलेला सिद्दी,
मुंबईमधले इंग्रज आणि चौलला असलेले पोर्तुगीज, हे स्वराज्याचे तीन सागरी शत्रू होते. या तिघांचाही शिवरायांना अत्यंत वाईट अनुभव आला होता. जंजीऱ्यावर कोणतीही मात्रा लागू पडत नव्हती. सिद्दीशी असलेले शत्रुत्व संपत नव्हते. इंग्रज त्याला सर्व प्रकारचे सहाय्य करत होते. जेव्हा-जेव्हा शिवरायांनी सिद्दीला अडचणीत आणले तेव्हा तेव्हा त्याला इंग्रजांनी मुंबईतल्या आपल्या सुरक्षित बंदरात आश्रय दिला.
सिद्दीला आश्रय देणाऱ्या इंग्रजांना मुंबईमधून घालून देण्याचा शिवरायांचा हेतू होता. तथापि मुंबईच्या उत्तरेला पोर्तुगिजांची सत्ता होती. त्याच्या चारही बाजूला समुद्राचा वेढा होता. इंग्रज अडचणीत आले की ते पोर्तुगीजांकडे आश्रय घेत असत. हा सर्व प्रकार ध्यानात घेऊन शिवरायांनी मुंबई बेटा जवळच्या समुद्रात किल्ला बांधण्याचे ठरवले. या किल्ल्यावरून जंजिरा आणि मुंबई यांच्यातल्या
चुंबाचुंबीला आळा घालता येईल. जागता पहारा ठेवता येईल. यादृष्टीने शिवरायांनी सर्वेक्षण करण्यास आरंभ केला. त्यांना मुंबई आणि चौल यांच्या
दरम्यानच्या सागरामध्ये दोन बेटे दिसली. या बेटांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. ही दोन्ही खडकाळ बेटे. मुंबईच्या दक्षिणेला पंधरा मैल अंतरावर तर जंजिराच्या उत्तरेला तीस मैल अंतरावर असलेली ही दोन बेटे. पूर्वेला असलेल्या बेटाचे नाव उंदेरी. या बेटाला इंग्रजांनी हेनरी हे नाव दिले. पश्चिमेला असलेल्या बेटाचे नाव खांदेरी. इंग्रजांनी या भेटायला केनरी नाव दिले. या दोन बेटा मधले अंतर केवळ दीड मैलाचे आहे. मुंबई बेटाच्या दक्षिण टोकाकडून ही दोन्ही बेटे आपल्याला स्पष्ट दिसतात.
थळच्या दक्षिणेला दीड मैलाच्या अंतरावर उंदेरी बेट आहे. पूर्वी अलिबागला किल्ला नव्हता. तो नंतर बांधण्यात आला. अलिबागच्या दक्षिणेला आत शिरलेली नागावची खाडी आहे. या खाडीपासुन तीन मैल अंतरावर अग्नेय दिशेला नागाव आहे. नागावच्या दक्षिणेला चार मैल अंतरावर चौल शहर आहे. भरती असते तेव्हाच नागावच्या खाडीतून जलवाहतूक होऊ शकते. ही खाडी मुळातच उथळ आहे. त्यामुळे ओहोटीच्या वेळी मोठी गलबते आत येऊ शकत नाहीत. छोट्या नावा मात्र काही अंतरापर्यंत आत येऊ शकतात. खांदेरी (केनरी) बेट हे मुंबई आणि चौल या दोन ठिकाणांपासून समान अंतरावर आहे.
*खांदेरी आणि उंदेरी या दोन बेटां* *मधील महत्त्वाचा फरक*
खांदेरी बेट हे उंदेरी बेटापेक्षा मोठे आहे. खांदेरी बेटाच्या मध्यभागी एक टेकडी आहे. या टेकडीच्या दक्षिणेला एक उंचवटा आहे त्याची एका बाजूची उंची ९० फूट तर दुसर्या बाजूची उंची ३० फूट आहे. हे बेट मुंबईपासून जवळ आहे. त्यामुळे या खडकाळ बेटावरून मुंबईच्या बंदरात शिरणाऱ्या आणि तिथून बाहेर पडणाऱ्या जहाजांवर टेहळणी करता येते.
(आपण तिथे स्वातंत्र्यानंतर त्या जलदुर्गाची पुनर्बांधणी केली असती तर आपल्याला भरपूर लाभ झाला असता. मुंबईकडे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपले लक्ष राहिले असते. कसाब मुंबई उत्पात करू शकला नसता. शिवरायांनी बांधलेल्या जलदुर्गांचा आजही आपल्याला देशाच्या संरक्षणासाठी लाभ करून घेता येईल. )
उंदेरी बेटाची उंची तीस फूट आहे. या बेटावर पाणी नाही. पण खांदेरी बेटावर पाणी आहे.
शिवरायांप्रमाणेच इंग्रजांना आणि पोर्तुगिजांना ही दोन बेटे दिसली होती. तथापि या दोघांनी या बेटांकडे लक्ष दिले नाही.
२८ नोव्हेंबर १६७० या दिवशी शिवरायांनी आपल्या मनातल्या योजनेला मूर्त रूप देण्याच्या हेतूने खांदेरी बेटाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासमवेत भूजलाचा शोध घेणाऱ्या तज्ज्ञांचे पथक होते. त्यांना तिथे पाण्याचे झरे असल्याचे आढळले.
पण शिवरायांना पुढची आठ वर्षे त्यांना तिथे काम करता आले नाही. कारण याच कालखंडामध्ये आदिलशहा आणि मोगल यांच्याशी त्यांना लढा द्यावा लागला. त्या लढाईत ते व्यस्त होते.
कर्नाटकाच्या मोहिमेवरून परत आल्यावर शिवरायांना थोडी उसंत मिळाली. १६ ऑगस्ट १६७८ या दिवशी खांदेरी आणि उंदेरी या दोन्ही बेटांवर बांधकाम करण्याच्या दृष्टीने त्यांनी लक्ष दिले. वर्ष १६७९ मध्ये साधारणपणे ऑगस्ट महिन्यात खांदेरी बेटावरचे झरे खोदून पाण्याच्या विहिरी बांधल्या. त्या विहिरींना गोड पाणी होते.
थळचा प्रांत शिवरायांच्या ताब्यात होता. बांधकामाच्या साहित्याची जमवाजमव थळ जवळ करण्यात आली. चौलच्या उत्पन्नातले एक लक्ष रुपये या दोन बेटांवरील बांधकामासाठी महाराज यांनी मंजूर केले. खांदेरी बेटावर तटबंदीच्या कामासाठी ४०० कामगारांची नियुक्ती केली. थळ पासून खांदेरी पर्यंत बांधकाम साहित्य आणि माणसांची ये-जा करण्यासाठी नावांची सोय केली.
उंदेरी बेटावर पाण्याची सोय नव्हती त्यामुळे तिथे बांधकाम सुरू केले नाही.
थळच्या किना-यावरून लांब पल्ल्याच्या तोफांचा मारा सहज करता येत होता तो उंदेरी बेटावर. खांदेरी बेट हे उंदेरी बेटा पेक्षा अधिक उंच. खांदेरी वरून उंदेरीवर तोफांचा मारा करता येत होता. त्यामुळे खांदेरी बेट हे उंदेरी बेटाच्या तुलनेत अधिक महत्त्वाचे होते.
शिवरायांनी खांदेरी बेटावर बांधकाम केल्याची वार्ता मुंबईतल्या इंग्रजांपर्यंत पोहोचली. इंग्रज सरकारला जाग आली. इंग्रज सरकारने सुरत मधल्या आरमार प्रमुखाला दिनांक २७ ऑगस्ट १६७९ या दिवशी पत्र पाठवून कळवले.
"मुंबई बंदराच्या तोंडाशी असलेल्या आपल्या मालकीच्या हेनरी-केनरी (उंदेरी-खांदेरी) या बेटांवर शिवाजीराजा किल्ल्याचे बांधकाम करत आहे. त्या बांधकामाला विरोध केला नाही तर आपलीच हानी होईल. हे बेट त्याने काबीज केले तर मुंबई बेटाचे आणि जवळपासच्या मुलखाचे दळणवळण मराठे भविष्यात बंद पाडू शकतील. म्हणून तातडीने त्याविरोधात हालचाल करणे क्रमप्राप्त आहे."
आपला सागरी शत्रू आपल्याला जलदुर्ग बांधणीच्या कामात अडचणी निर्माण करून अपशकून करणार याची अटकळ शिवरायांनी बांधली होती.
शिवरायांनी मायनाक भंडारी यांना खांदेरीच्या रक्षणासाठी १५० लढाऊ गलबते आणि चार तोफा देऊन आधीच पाठवले होते.
इंग्रजांनी एक तुकडी कॅप्टन
मिचिन याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या जलदुर्गाचे काम थांबवण्यासाठी पाठवली. मिचिन याने मायनाक भंडारी यांना ताकीद दिली.
"हे बेट इंग्रजांच्या मालकीचे आहे तुम्ही ताबडतोब हे बेट सोडून जा."
मायनाक भंडारी यांनी निडरपणे उत्तर दिले,
"आम्ही तुमची सूचना किंवा आज्ञा पाळणार नाही. आम्ही केवळ शिवरायांची आज्ञा पाळतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती करतो. त्यामुळे तुमची आज्ञा आम्ही कदापि पाळणार नाही."
ब्रिटिशांनी मुंबई बेट युद्धात विजय मिळवून मिळवले नाही. इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यात तह झाला होता. पोर्तुगीजांची राजकन्या आणि इंग्लंडचा राजकुमार चार्लस् यांचा विवाह झाला. या विवाहाच्या निमित्ताने पोर्तुगीजांनी मुंबई बेट इंग्रजांना आंदण म्हणून दिले. तो दिवस होता २३ जून १६६१. (वास्तविक मुंबई बेट ही पोर्तुगीजांचे नव्हते.) मुंबईचा वैधानिक दृष्ट्या ताबा वर्ष १६६४ मध्ये इंग्रजांनी घेतला.
समुद्रावर आपली सत्ता आहे याचा इंग्रजांना प्रचंड गर्व होता. आपल्या आरमारा समोर मराठ्यांच्या आरमाराचा निभाव लागणार नाही; असे इंग्रजांना वाटत होते. मराठ्यांच्या संपूर्ण आरमार दलाचा नाश करण्यासाठी आपल्याला आपले एकच गलबत पुरेसे आहे; अशी इंग्रजांची धारणा होती.
खांदेरी वरील मराठ्यांचे बांधकाम थांबवण्याच्या हेतूने इंग्रजांनी *कॅप्टन एन्साइन ह्यूजेस* याला तीन शिबाडे आणि सैन्य देऊन पाठवले. त्यावेळी त्याला पुढील सूचना देण्यात आल्या.
*१. मराठ्यांच्या दळणवळणाला* *प्रतिबंध* *करावा.*
*२. मराठ्यांना खांदेरी बेट सोडून* *जाण्यास भाग पाडावे.*
*३. मराठी शस्त्राचार करत नाहीत* *तोपर्यंत जबरदस्ती करू* *नये.*
*४. मराठ्यांच्या सामर्थ्य* *याविषयीचा अहवाल पाठवावा.*
४ सप्टेंबर १६७९ या दिवशी सकाळी ८ वाजता कॅप्टन
एन्साइन ह्यूजेस खांदेरी जवळ आला. त्याला खांदेरी बेटावर सोडून जाण्याच्या सर्व जागांवर तीन फूट उंचीची भिंत उभी असलेली दिसली. मोक्याच्या जागांवर चार - सहा तोफा सज्ज असलेल्या दिसल्या. बेटावर तटबंदीचे काम युद्धपातळीवर चालू असल्याचे आढळून आले. कॅप्टन ह्यूजेसच्या डोळ्यादेखत मराठ्यांच्या होड्या माणसे आणि सामान घेऊन खांदेरीकडे निघाल्या. त्याने त्या होड्या रोखल्या. नंतरचे दोन दिवस खांदेरी बेटाकडे एकही होडी गेलेली त्याला दिसली नाही.
इंग्रजांचे आरमार खांदेरी बेटा भोवती असलेल्या उघड्या समुद्रात होते. किनारपट्टीवर जाण्याची सोय नव्हती. तो भाग शिवरायांच्या ताब्यात होता. त्यांना मुंबई वरूनच रसद येत होती. पाणीसुद्धा तिथूनच आणावे लागत होते. दिवसांमागून दिवस जात होते.
अखेरीस खांदेरीवरील बांधकाम थांबवण्यासाठी इंग्रजांनी मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले.कॅप्टन मिचिन रिव्हेंज ही युद्धनौका घेऊन १३ सप्टेंबर १६७९ ह्या दिवशी संध्याकाळी खांदेरीच्या समुद्रात आला. हंटर आणि रिव्हेंज या युद्धनौका इंग्रजांच्या आरमारमधील प्रमुख युद्धनौका होत्या. त्याच दिवशी जोरदार पाऊस आणि वादळ सुरू झाले. फ्रान्सिस थॉर्पे हा रसद घेऊन मुंबईहून निघाला.
इंग्रजांचे सैन्य मात्र ह्या
वायूमानामुळे जेरीस आले. अनेक सैनिक रुग्णाईत झाले. ११ सप्टेंबर या दिवशी दौलतखान मराठ्यांच्या आरमारासह खांदेरीच्या साहाय्यार्थ आला. १९ सप्टेंबरला इंग्रजांनी त्यांच्या
शिवाडांवरून खांदेरीवर तोफा डागल्या. दोन्ही आरमाराची सागरात लढाई जुंपली. इंग्रजांना बेटावर चढायचे होते. मराठ्यांच्या तोफांचा भडिमार एवढा प्रचंड होता की त्यांना खांदेरी बेटावर चढून जाण्याचे धैर्य झाले नाही. या धुमश्चक्रीत कॅप्टन थाॅर्पे मारला गेला. इंग्रजांचे दोन-चार सार्जंट मारले गेले.
ब्रिटिशांनी कितीही , कशाही प्रकारचे प्रयत्न करून खांदेरी वरच्या बांधकामाला अपशकून करण्याचा प्रयत्न केला, तरीही खांदेरी वरचे बांधकाम चालू ठेवायचे. असा दृढनिश्चय मराठ्यांनी केला. त्यामुळे खांदेरीवर रसद आणि सामान पोहोचवण्याचे काम अखंड चालू होते. इंग्रजांच्या चिथावणीला मराठी बळी पडले नाहीत. जेव्हा बांधकामात मोठा अडसर निर्माण करण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला, तेव्हाच मराठ्यांनी कडवी झुंज दिली.
इंग्रजांची गलबते आणि होड्या खांदेरी भोवती आणि नागावच्या खाडीच्या तोंडाशी होत्या. खांदेरी वरून होणारा तोफांचा मारा इंग्रजांना खांदेरीवर प्रत्यक्ष हल्ला करू देत नव्हता.
इंग्रजांची मोठी गलबते आणि होड्या नागावची खाडी उथळ असल्यामुळे आणि दलदलीचा भाग असल्यामुळे पुढे येऊ शकत नव्हत्या. त्यामुळे अंधाराचा आणि ओहोटीचा लाभ घेऊन मराठ्यांच्या छोट्या नावा सामान घेऊन इंग्रजांच्या डोळ्यात धूळ फेकून खांदेरी पर्यंत पोहोचत होत्या. इंग्रजांची गलबते शिडावर चालणारी होती. त्यामुळे इंग्रजांच्या गलबताच्या हालचाली वाऱ्यावर अवलंबून होत्या. मराठ्यांच्या छोट्या नावा वल्ह्या ने चालवल्या जात होत्या. त्यामुळे त्या स्वतंत्रपणे चालवता येत होत्या. या नावांच्या हालचाली वाऱ्यावर त्या अवलंबून नव्हत्या.
*इंग्रजांच्या गलबतांची पांगापांग*
१८ ऑक्टोबर १६७९ या दिवशी इंग्रज आणि मराठे यांच्यात मोठे आरमारी युद्ध झाले. इंग्रज नागावच्या खाडीच्या तोंडाशी पहारा देत होते. काही गलबते थळलाही उभी होती. त्याच दिवशी पहाटेच्या सुमारास मराठ्यांच्या ४०-५० गुराबा मोठ्या वेगाने नागावच्या खाडीतून गोळीबार करत बाहेर आल्या. मराठ्यांची काही जहाजे चौलच्या बाजूने रात्री थळपाशी येऊन थांबली होती. एकाच वेळी इंग्रजांच्या नागाव खाडीच्या तोंडाशी असलेल्या आणि
थळ जवळ असलेल्या आरमारावर मराठ्यांनी जोरदार चढाई केली. अचानक झालेल्या या जोरदार हल्ल्यामुळे इंग्रजांच्या गलबतांची पांगापांग झाली. इंग्रजांच्या *रिव्हेंज* या महत्त्वाच्या आणि मोठ्या युद्धनौकेला बुडवण्याचा प्रयत्न मराठ्यांच्या आरमाराने केला. तथापि मराठ्यांना त्यात यश आले नाही.
मुंबई , हे इंग्रजांचे मूळ. तेच नष्ट करण्याचा विचार शिवरायांनी केला. मुंबईवर थेट हल्ला करण्याचे ठरवले. तशी योजनाही आखली. पण ते प्रत्यक्ष कृतीत आणता आली नाही. कारण मुंबईवर आक्रमण करण्यासाठी मराठ्यांचे आरमार जात असताना मार्गात पोर्तुगीजांचा मुलुख लागतो. त्या मार्गातून जाण्याची अनुमती पोर्तुगीजांकडे मागण्यात आली. पण पोर्तुगीज कॅप्टन जनरलने अनुमती नाकारली.
खांदेरीच्या या युद्धात इंग्रजांच्या आरमाराला यश येत नव्हते. मराठे शरण येतील, तहासाठी संदेश पाठवतील. या स्वप्नात इंग्रज रंगून गेले. पोर्तुगीज अथवा सिद्दी इंग्रजांच्या या दोन मित्रांपैकी कोणीही एक मित्र आपल्याला सहाय्य करण्यासाठी पुढे आला; की त्याला पुढे करून आपण काढता पाय घ्यायचा. असा विचार इंग्रज करू लागले.
*मराठ्यांचे पांढरे निशाण*
१७ नोव्हेंबर १६७९ सिद्धी गलबते घेऊन आला. त्याने खांदेरी भोवती फेरी मारली आणि पाहणी केली. खांदेरीवर त्याने गोळीबारही केला. इंग्रज आणि सिद्दी दोघेही मराठ्यांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र आले. तथापि युद्धाच्या पद्धतीवरून त्यांच्यात मतभेद झाले. सिद्दीच्या सहकार्यामुळे या युद्धात जर विजय मिळाला तर तो विजय मोगलांचा असेल असे सिद्दीने इंग्रजांना सांगितले. यामागचे कारण सांगताना सिद्धी म्हणाला की तो मोगलांचा सरदार आहे. त्यामुळे या युद्धात विजय झाला तर खांदेरी मोगलांकडे जाणार.
आपल्यावर इंग्रजांनी आक्रमण केले म्हणून शिवाजीराजे इंग्रजांवर संतापणार. मराठ्यांचे आरमार प्रबळ नसल्यामुळे मराठी तहाची बोलणी करण्यासाठी इंग्रजांकडे येतील. इंग्रज कोणत्याही प्रकारची भरपाई मराठ्यांना न देता तह करण्याचा प्रयत्न करणार. असा तह झाला की खांदेरी आपल्या ताब्यात येईल. असे स्वप्न इंग्रज पाहत होते. मराठ्यांनी तह करावा म्हणून इंग्रज प्रतीक्षा करू लागले.
*२१ नोव्हेंबर १६७९ सकाळी* *सहा वाजता खांदेरीवर मराठ्यांनी* *पांढरे निशाण* *लावले.* ते पाहून सिद्धीला अत्यानंद झाला. सिद्दीने आपल्या दोन-चार जणांना मराठ्यां बरोबर बोलणी करण्यासाठी खांदेरी वर पाठवले. सिद्धी ची माणसे खांदेरीवर गेली आणि तहाची बोलण्या करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. मराठ्यांनी त्यांना शिव्या घालून पाठवून दिले. नंतर इंग्रज सभ्यपणे बोलणी करण्यासाठी पुढे सरसावले. मराठ्यांनी शरणागतीचा शब्दही उच्चारला नाही. अखेरीस न राहून इंग्रजांनी विचारले,
"तुम्हाला तह करायचा नाही तर मग खांदेरीवर पांढरे निशाण का लावले?"
मराठ्यांनी शांतपणे उत्तर दिले,
_"किनाऱ्यावरच्या आमच्या_ _माणसांना विशिष्ट संकेत_ _देण्यासाठी हा बावटा लावला_ _आहे. खांदेरी किंवा उंदेरीाला यापैकी_ _एकही बेट आम्ही_ _कोणाच्याही ताब्यात देण्याचा_ _स्वप्नातही विचार करू शकत_ _नाही. तुमच्या गव्हर्नर कडून_ _मायनाक भंडारी यांच्या नावाने_ _कोणी समझोता करण्यासाठी_
_आला तर आम्ही विचार करू.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी इंग्रजांना पत्र लिहून कळवले,
" *खांदेरी बेट सोडण्याचा आमचा** *विचार नाही. तुम्हीला तरी* *तटबंदीचे काम आम्ही चालूच* *ठेवू. अखेरपर्यंत खांदेरी* *बेटावर इंग्रजांचे निशाण* *आम्ही फडकू देणार* *नाही."*
स्वतःला समुद्रावरचा अनभिषिक्त सम्राट म्हणून घेणाऱ्या इंग्रजांना शिवरायांच्या आरमाराने नाकी दम आणला.
इंग्रजांचा कॅप्टन केज्विन याने इंग्रज सरकारला कळवले,
*मराठ्यांच्या लहान नौका* *आम्हाला गुंगारा देऊन खांदेरीवर* *सहज पोचतात. या* *नौका दिसायला छोट्या* *असल्या तरी त्यांचा वेग* *अफाट आहे. मराठ्यांप्रमाणे* *छोट्या चलाख, चपळ* *नौका* *आपल्याजवळ नाहीत. त्यामुळे* *मराठ्यांच्या कार्यामध्ये* *अडथळा निर्माण* *करणे , त्यांना खांदेरी* *बेटावरुन घालवून देणे* *अशक्य आहे.* *आपल्या* *जवळच्या प्रचंड* *मोठ्या युद्धनौका आणि गलबते* *मराठ्यांच्या छोट्या* *नौकांना प्रतिबंध करण्यास* *असमर्थ ठरली आहेत.*
इकडे सुरतकरांचे धाबे दणाणून गेले. त्यांना अशी वार्ता कळली की शिवाजी महाराजांचे चार सहस्र मावळे मुंबईवर चाल करून येत आहेत. त्यांनी मुंबईला पत्राने कळवले --
*शिवाजीचे सैनिक बेटावर कुमक* *पाठवतात. तटबंदी* *उभारतात. तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या* *कार्यात अडथळा* *निर्माण करून त्यांना अडवू* *शकत नाही. म्हणून तुम्ही* *शिवाजी बरोबर तडजोड करावी.* *बेटावर हल्ला* *करण्यासाठी दोन गलबते दिली* *आहेत. तुम्ही प्रयत्न* *करून पहा. पण ध्यानात ठेवा* *तुम्ही अपयशी ठरलात तर* *शिवाजी तुमच्याशी* *कोणतीही बोलणी करणार नाही.* *तुम्ही बोलणी करायला गेला तर तो* *तुम्हाला उडवून लावेल. तसे झाले* *तर मुंबईचे रक्षण* *करण्यास तुम्ही समर्थ आहात* *का ? याचा आम्हाला* *विचार करावा लागेल.*
हे पत्र शिवरायांच्या आरमाराचा इंग्रजांच्या आरमारांनी केवढा धसका घेतला होता त्याची साक्ष देते.
श्री दुर्गेश जयवंत परुळकर
व्याख्याते आणि लेखक
No comments:
Post a Comment