Total Pageviews

Monday 3 February 2020

चीनमधील पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल -भारताने आपल्या विद्यार्थ्यांना वुहानमधून बाहेर काढले,आम्ही पाकिस्तानी विद्यार्थी मात्र इथेच अडकलो -tarun bharat


    दिनांक  03-Feb-2020 22:00:09
भारताच्या कोणत्याही भानगडीत नाक खुपसणार्‍या पाकिस्तानसारख्या ‘पाक’ देशाच्या विद्यार्थ्यांवर भारताचे कौतुक करण्याची आणि आपल्याच सरकारला शिव्याशाप देण्याची वेळ का बरे आली असावी?
गेल्या १५-२० दिवसांपासून ‘कोरोना’ विषाणुजन्य आजाराने थैमान घालत चीनमध्ये ३०० पेक्षा अधिक जणांचा बळी घेतला. चीनमध्ये अजूनही ‘कोरोना’ विषाणुजन्य आजाराचा प्रकोप आणि मृतांचा आकडा वाढतच असून लोकांमधील भीतीची भावना आणि अफवा तर दुप्पट वेगाने पसरत आहे. ‘कोरोना’ विषाणूमुळे चीनमधील जवळपास १८ ते २० हजार जण संक्रमित झाल्याचेही म्हटले जाते. उल्लेखनीय म्हणजे, जग एक खेडे झालेल्या काळात ‘कोरोना’च्या दहशतीने केवळ चीनलाच नव्हे, तर अन्य देशांनाही काळजीत पाडले. ‘जागतिक आरोग्य संघटनेने’ही वेगाने हालचाल करत आरोग्य आणीबाणीची घोषणा केली. सोबतच जगातील बहुतेक देशांनी आपापल्या नागरिकांना चीनमधून स्वदेशात नेण्यास सुरुवात केली. भारतानेही तत्परता दाखवत चीनमध्ये अडकलेल्या आपल्या विद्यार्थी व नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी विमानोड्डाण केले. चीनमधून भारताने आतापर्यंत हजारभर भारतीयांना बाहेर काढले, तसेच मानवतेचा परिचय करून देत मालदीवसारख्या देशाच्या नागरिकांनाही बरोबर घेतले. मात्र, जगभरातील देश आपापल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हालचाल करत असतानाच भारताशी उभा दावा पुकारणारा ‘पाकिस्तान’नामक इस्लामाधिष्ठित देश पैगंबर मोहम्मदाने काय सांगितले, हे उगाळण्यातच व्यस्त असल्याचे दिसले. समाजमाध्यमांवर सध्या चीनमधील पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात- “भारताने आपल्या विद्यार्थ्यांना वुहानमधून बाहेर काढले, बांगलादेशानेही तशीच तजवीज केली,” असे बोलताना दिसतात. तसेच, “आम्ही पाकिस्तानी विद्यार्थी मात्र इथेच अडकलो असून आमचे सरकार आमच्याकडे लक्षही देत नाही. उलट आम्हाला जगा किंवा मरा, असा सल्ला देते. आमच्या सरकारला स्वतःची जरा तरी लाज वाटली पाहिजे आणि त्याने भारताकडून काहीतरी शिकायला हवे,” असे म्हणताना पाहायला मिळते. भारताच्या कोणत्याही भानगडीत नाक खुपसणार्‍या पाकिस्तानसारख्या ‘पाक’ देशाच्या विद्यार्थ्यांवर भारताचे कौतुक करण्याची आणि आपल्याच सरकारला शिव्याशाप देण्याची वेळ का बरे आली असावी?



तर ‘कोरोना’ विषाणुजन्य आजाराने ग्रासलेल्या चीनमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानी विद्यार्थी मोठ्या आशेने आपल्या सरकारकडे डोळे लावून बसले होते. परंतु, पाकिस्तानने या विद्यार्थ्यांना हालअपेष्टांतून बाहेर काढण्यासाठी नव्हे, तर त्यांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी तयार असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनी इस्लामला जागत १४०० वर्षांपूर्वी पैगंबर मोहम्मदाने दिलेल्या शिकवणीची आठवण या विद्यार्थ्यांना करून दिली. पैगंबर मोहम्मदाच्या मते, “तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्लेगची साथ असल्याचे समजले तर तिथे जाऊ नका, पण जर तुम्ही जिथे राहता त्या जमिनीवरच प्लेगची साथ पसरली तर ती जागा सोडून जाऊ नका!” हाच संदेश अल्वी यांनी चीनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थी व नागरिकांना देत, आम्ही मदत करणार नाही, तुम्ही तुमचे तिकडेच काय ते पाहा, अशी भूमिका घेतली. धर्माच्या जंजाळात गुरफटले की पाकिस्तानसारख्या देशाचा माणुसकीशी संबंध कसा तुटतो, याचे हे जीवंत उदाहरण. परंतु, भारतीय विद्यार्थ्यांना न्यायला तो देश बस, विमाने पाठवतो आणि आपला राष्ट्रपती मात्र, ‘जगा किंवा तिकडेच मरा’चे सल्ले देत असल्याचे पाहून, पाकिस्तानी विद्यार्थी चिडले आणि त्यांनी आपल्याच सरकारला भलीबुरी विशेषणे लावायला सुरुवात केली. सोबतच राष्ट्रपती एका तर्‍हेचा तर पाकिस्तानी पंतप्रधानाची तर्‍हाच निराळी. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी मदत मागणार्‍या आपल्या विद्यार्थ्यांबद्दल वेगळेच मत मांडले. “पाकिस्तानचे चीनशी असलेले संबंध पाहता सदर विद्यार्थ्यांना तिथून स्वदेशात आणणे योग्य ठरणार नाही. कारण, असे केले तर आमचे लोक तिथे सुरक्षित नाहीत, असे पाकिस्तानला वाटते, हा चुकीचा संदेश चीनला मिळेल. तसेच ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार मानवाकडून मानवाला होण्याचा धोका असल्याने एक जबाबदार व्यक्ती म्हणून आम्ही आमच्या नागरिकांना तिथेच राहण्याची सूचना देत आहोत,” असे इमरान खान म्हणाले. कहर म्हणजे, ज्या ज्या पाकिस्तानी व्यक्तींना ‘कोरोना’ विषाणूची लागण झाली, त्या व्यक्ती जोपर्यंत त्यापासून पूर्ण मुक्त होत नाही, तोपर्यंत त्यांना पाकिस्तानात प्रवेश नाही, असेही पाकिस्तानने म्हटले. वरील घटनाक्रमावरून स्वतःला‘जबाबदार व्यक्ती’ म्हणवून घेत आपल्याच देशाच्या नागरिकांना वार्‍यावर सोडणारा बेजबाबदार राष्ट्रप्रमुख अन्य कोणता असेल? असे इमरान खान आणि डॉ. आरिफ अल्वी यांच्याकडे पाहून वाटते.



दुसरीकडे पाकिस्तानला भारताशी बरोबरी करण्याची, भारताला पाण्यात पाहण्याची आणि भारताच्या कोणत्याही कृतीत लुडबूड करण्याची खुमखुमी नेहमीच येत असते. हे गेल्या ७२ वर्षांतल्या अनेक घटना व प्रसंगांवरून सिद्धही झाले. पण, आता भारताने ज्याप्रकारे आपल्या नागरिकांना सुखरूप परत स्वदेशात आणले, त्याची बरोबरी करण्याची बुद्धी पाकिस्तानला झाली नाही. यावरून त्या देशाचा आपल्या नागरिकांबद्दलचा व्यवहार दिसून येतो. नुकत्याच भारतीय संसदेने संमत केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरुनही गळा काढण्याचे उद्योग पाकिस्तानने केले. भारतातल्या मुस्लिमांची फारच काळजी वाटत असल्याच्या आविर्भावात पाकिस्तानने त्यावर प्रतिक्रिया दिली. पण, आताच्या ‘कोरोना’ग्रस्त चीनमधील विद्यार्थ्यांना लाथाडणारा पाकिस्तान स्वतःच्या देशातल्या नागरिकांची मदत करण्यासही नालायक असल्याचे दिसते. कचराकुंडीत फेकलेल्या कचर्‍याकडे ज्या मानसिकतेने पाहिले जाते, तिच मानसिकता पाकिस्तान आपल्या नागरिकांप्रति जोपासत असल्याचेही यावरून स्पष्ट होते. म्हणूनच पाकिस्तानने आधी भारतात काय होते, इथे ‘सीएए’ लागू होते की, ‘एनआरसी’ आणि जम्मू-काश्मीरला लागू असलेले ‘कलम ३७०’ निष्प्रभ केले जाते की, त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन होते, या भानगडीकडे लक्ष देऊ नये. त्या देशाने आधी आपल्या पायाखाली काय जळते, हा पाहावे. तथापि, इथे भारतात राहूनही ‘पाकिस्तान, पाकिस्तान’चा जप करणारे अनेक दिवटे आपल्याला वेळोवेळी दिसून येतात. पाकप्रेमाचा उमाळा दाटून येणारे हे लोक टाळ्या पिटत भारतावर आणि भारत सरकारवर निरनिराळे आरोप करतानाही आढळते. परंतु, पाकिस्तानला डोक्यावर घेणार्‍यांनी आधी त्या देशाची आपल्या नागरिकांशी वागण्याची प्रवृत्ती लक्षात घ्यावी. पाकिस्तानला आपल्याच नागरिकांच्या मानवाधिकाराचे कितपत मोल आहे, हे त्या देशाच्या आताच्या कृतीवरून तपासावे. तसे केल्यास नक्कीच आपण भारतात लाखपटीने सुरक्षित असल्याचे त्यांना पटेल आणि जर नाहीच पटले तर त्यांना त्यांचा पाकिस्तान लखलाभ असो! दरम्यान, आपल्या विद्यार्थी व नागरिकांना चीनमध्ये मरण्यासाठी सोडणार्‍या पाकिस्तानची जगभरात चांगलीच छी-थू झाली. बदनामीचे डाग अंगाखांद्याला बरबटल्याने कदाचित पाकिस्तानला उपरती झाली आणि म्हणूनच त्याने आता चीनमधून येणार्‍या विमानांना आपल्या विमानतळांवर उतरण्याची परवानगी दिल्याचे वृत्त आहे. परंतु, सगळ्या जगात नाक कापले गेल्यानंतर एखादी कृती करणे म्हणजे स्वतःच्याच हाताने उघडे पडलेल्याने चिंधी लावून लाज वाचवण्याचाच प्रकार. असे केल्याने गेलेली किंमत परत येत नसते, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे.

No comments:

Post a Comment