येत्या शनिवारी ‘कलम ३७०’ रद्द झाल्याला महिना पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर पाकिस्तान कितीही डरकाळ्या फोडत राहिला, तरी त्याचा काडीमात्र परिणाम होऊ शकलेला नाही. अर्थात, पाकने या कृतीसाठी भारताला गुन्हेगार ठरवण्यासाठी प्रचंड आटापिटा केलेला आहे. जागतिक व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा आणून भारताला कोंडीत पकडण्याचे नेहमीचे सर्व खेळ अपयशी ठरल्यावर आता पाकिस्तानातच आरोळ्या ठोकल्या जात आहेत. पण भारत सरकार वा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अशा कुठल्याही गदारोळाची दखलही घ्यायला राजी नसल्याने पाकिस्तानचा संताप दिवसेंदिवस अनावर होत चालला आहे. संयुक्त राष्ट्रसंघात जाण्याविषयी सुरू झालेल्या धमक्या आता अणुयुद्धापर्यंत जाऊन पोहोचल्या, तरी भारत पाकिस्तानकडे वळूनही बघत नाही, ही सर्वाधिक क्लेशाची बाब झाली आहे. कारण, भारत जितका अशा धमक्यांकडे दुर्लक्ष करतो, तितकी पाकला आपल्या नामर्दीची जाणीव अधिक बोचरी होत असते. मात्र, पाकचा खराखुरा राग नरेंद्र मोदी वा भाजप वगैरे लोकांवर अजिबात नाही. इमरान वा पाकसेनेचे अधिकारी संतापलेले आहेत, ते इथे भारतात बसलेल्या त्यांच्या दलालांवर. कारण, मागील तीन दशकांमध्ये पाकिस्तानने आपल्या सुरक्षेची यंत्रणा भक्कम करण्यापेक्षा, ते काम दोन भिन्न गटांवर कंत्राटी पद्धतीने सोपवलेले आहे. त्यातला एक गट पाकिस्तानभर पसरलेल्या जिहादीचा गट असून, दुसरा गट हा भारतातच स्थायिक असलेले राजकीय नेते, अभ्यासक, पत्रकार, पुरोगामी बुद्धिमंत असा आहे. यापैकी भारतात बसलेला पाकचा हस्तक अतिशय मोलाचा घटक होता आणि आजही आहे. कारण, त्याने चालविलेला येथील घातपात आणि पाकस्थित जिहादींनी इथे मांडलेला उच्छाद हीच तर पाकची मागील तीन दशकांमधील खरी रणनीती बनून गेली होती. ‘कलम ३७०’ रद्द होण्यातून हे दोन्ही गट निकामी ठरले आहेत आणि त्यापैकी येथील गद्दारांनी पाकला वेळीच सावध केले नाही, म्हणून सगळा जळफळाट चालला आहे.
भारतासाठी गेल्या तीन दशकांमध्ये पाकिस्तान हा लष्करी डोकेदुखी कधीच नव्हता. भारताशी शस्त्राने लढणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर पाकिस्तानने नवी रणनीती तयार केली. त्यात भारताच्या लोकशाही व मानवाधिकारालाच आपले हत्यार बनवण्याचा घाट घातला होता. त्यानुसार एका बाजूला काश्मिरातील फुटीरवादी तरुणांना चिथावण्या देऊन जिहादी घातपाती बनवणे व अघोषित युद्ध चालवणे, हा एक भाग होता. दुसरा भाग भारताच्या विविध मानवी हक्क वा नागरी अधिकाराचा आडोसा घेऊन काश्मीरमध्ये व दिल्लीत भारतीय कायदा प्रशासनाला पोखरून काढणारी गद्दारांची फळी उभी करणे. अशी दुहेरी रणनीती होती. एकदा त्यासाठीची यंत्रणा सज्ज झाल्यावर पाकसेनेला काहीच काम उरले नाही. त्यांच्या गुप्तचर खात्याने भारतातील तशा आमिषाला बळी पडून देशाशी गद्दारी करणार्यांरचा शोध घ्यायचा. त्यांची जोपासना करणे व जिहादी व्हायला राजी असणार्यांरना प्रशिक्षण देणे, इतकेच काम उरलेले होते. त्या दोन्ही आघाडीवर पाक यशस्वी झाल्यावर पाकसेना निश्चित झाली आणि भारताला अशा दुहेरी हल्ल्यांना तोंड देणे अवघड होऊन बसले. कारण, दोन्हीकडून ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी दु:स्थिती झालेली होती. हे दुष्टचक्र मोडण्याखेरीज अन्य पर्याय नव्हता. नुसत्या लष्करी कारवाईने किंवा शस्त्राने त्याचा बंदोबस्त होऊ शकणारा नव्हता. कारण, एक गद्दार निकामी झाला तर दुसरा बाजारात खरेदी करणे शक्य होते आणि एक जिहादी मारला गेला, तर दुसरा कायम सज्ज ठेवणे शक्य होते. साहजिकच अशी रसद तोडण्याला महत्त्व होते, तितकेच अशा दोन्ही आघाड्या निकामी करून टाकण्यालाही प्राधान्य होते. ते करणारा कोणी खमक्या देशाचे नेतृत्व करायला भारतात ठामपणे उभा राहायला हवा होता. तसा नेता जनतेला सापडायला व त्याच्या हाती देशाची सत्तासूत्रे सोपवायला २०१४ साल उजाडले. त्यानंतरच खराखुरा काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
पाकिस्तानचे दुर्दैव इतकेच होते की, त्याला किंवा त्याच्या गद्दार दलालांना नरेंद्र मोदी ओळखायला वेळ लागला आणि तोपर्यंत मोदींच्या अनेक खेळी खेळून झालेल्या होत्या. एका खेळीचा परिणाम दिसल्यावर डागडुजी सुरू करण्यापर्यंत मोदी सरकार पुढील खेळी करत होते आणि त्याचे परिणाम दिसण्यापर्यंत तिसरी खेळी सुरू व्हायची. पाकिस्तान त्यात गोंधळून गेला होता. कारण, पाकिस्तानचे इथे पोसलेले गद्दार हस्तकही गोंधळून गेलेले होते. आजवरचे पंतप्रधान किंवा राजकीय नेते आणि मोदी यातील मूलभूत फरक त्यांना कधीच ओळखता आला नाही, ही घोडचूक ठरलेली आहे. राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांच्यात मोठा फ़रक असतो. द्रविड शांत डोक्याने खेळतो. उलट विरेंद्र सेहवागला घाबरवण्याचा प्रयत्न केल्यास थेट अंगावर चाल करून जातो. मोदी त्याच्याही पलीकडील व्यक्तिमत्त्व आहे. ते शांत डोक्याने घटनाक्रमाला सामोरे जातात. उतावळेपणा त्यांच्या स्वभावात नाही. त्यापेक्षा प्रतिस्पर्धी वा शत्रूला गाफील ठेवून त्याच्याच सापळ्यात अडकवणे, ही मोदींची रणनीती राहिलेली आहे. ती राजकारणात असली तरी तशीच ती कारभारातही दिसून येते. पाकिस्तानला नमवायचे असेल, तर त्याच्यावर शस्त्राने हल्ला करण्यापेक्षा त्याने पोसलेल्या जिहादी किंवा देशांतर्गत बुद्धिवादी वर्गाचा कणा मोडला पाहिजे, याची खूणगाठ मोदींनी खूप आधीच बांधलेली होती. त्याची पूर्ण सज्जता करण्यातच पहिली पाच वर्षे निघून गेली आणि त्या काळात त्यांनी पाकप्रेमींच्या उतावळेपणाची साक्षात परीक्षाच घेऊन झाली. एकीकडे काश्मीरमध्ये गोंधळ घालणार्यात जिहादींचा कणा मोडणारी लष्करी कारवाई हाती घेतली आणि दुसरीकडे त्यानिमित्ताने पाकप्रेमी गद्दार आपापल्या बिळातून बाहेर येऊन उघडे पडतील, असेही खेळ केले. त्यांची विश्वासार्हता संपवून घेतली आणि दुसर्या पाच वर्षांसाठी निवडून येताच निर्णायक चाल खेळलेली आहे.
जागतिक मंचावर आपण तोकडे पडलो, म्हणून पाक संतापलेला नाही किंवा जिहादी मारले गेल्याने पाक विचलितही झालेला नाही. दोन्ही आघाडीवरची रणनीती फसत चालल्याने पाक खवळलेला आहे. पहिली बाजू म्हणजे लागोपाठ जिहादींचा खात्मा करून पाक प्रशिक्षित मुजाहिदींना संपवण्याची ही रणनीती येथील गद्दारांना आधीच समजू शकली नाही किंवा पाकला त्याची आधीच खबरबात देता आली नाही. हा येथील पाकप्रेमी बुद्धिमंतांच्या फळीचा पहिला पराभव होता. त्याचे परिणाम म्हणून सर्जिकल स्ट्राईक व बालाकोटचा हवाईहल्ला या दोन गोष्टींमध्ये पाकचे नाक कापले गेले. त्याला त्यांनी इथे पोसलेल्यांचे नाकर्तेपण जबाबदार होते. कारण, सरकारच्या गोटातल्या गोपनीय गोष्टी काढून पाकला सावध करण्यासाठीच तर त्यांना पोसले जाते ना? इतके झाल्यावर ‘कलम ३७०’ हे पाकिस्तानच्या उचापतींना लाभलेली कवचकुंडलेच होती. तेही झटपट निकालात काढण्याचा आराखडा पाकिस्तानला कळूही शकला नाही. कारण, तो पाकच्या इथेच बसलेल्या हस्तकांनाही मोदी सरकारने समजू दिला नाही. थोडक्यात, इतकीही माहिती देणार नसतील, तर असले गद्दार पाकने पोसावे कशाला? ‘कलम ३७०’ रद्द झाल्यावरही हे पाकप्रेमी भारतात कुठे गदारोळ माजवू शकलेले नाहीत आणि काश्मिरात सोडलेले व पोसलेले जिहादी कुठे साधी दगडफेकही करून दाखवू शकलेले नाहीत. थोडक्यात, ३० वर्षे अशा दोन गटांमध्ये पाकने केलेली सगळी गुंतवणूक मातीमोल होऊन गेलेली आहे. पाकला तेच मोठे अपयश सतावते आहे. नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थी नेत्यांपासून माध्यम क्षेत्रातील एकाहून एक विचारवंत-संपादक आठवडाभर आधी ‘कलम ३७०’ रद्द होण्याची साधी बातमी देऊ शकणार नसतील, तर त्यांच्यासाठी परिषदा, मेजवान्या किंवा चर्चासत्रांचे पंचतारांकित समारंभ योजण्यावर पाकने पैसे कशाला खर्चावेत? इमरानपासून जनरल बाजवा यांच्यापर्यंत सगळे पाकिस्तानी नेते, आपली पुरोगामी गुंतवणूक बुडित गेल्यामुळे मात करीत आहेत. मणिशंकर अय्यर उगाच नाही, मल्ल्यासारखे बेपत्ता झाले
No comments:
Post a Comment