दिनांक :15-Mar-2019 |
नमम
श्रीनिवास वैद्य
भारत-पाकिस्तानमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 10 कि. मी. आत, गुलाम काश्मीर क्षेत्रात पाकिस्तानची लढाऊ विमाने सुपरसॉनिक (आवाजाच्या वेगाहून अधिक) वेगाने उडताना दिसत आहेत. भारताच्या हे लक्षात येताच, सर्वत्र अतिसावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. ही बातमी ऐकताच, अमेरिकेतील एक युद्धविश्लेषक व दक्षिण आशिया क्षेत्रातील भू-राजकारणाचे अभ्यासक मेजर लॉरेन्स सेलिन यांनी नेमकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणतात- पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर स्थित जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर हल्ला करून भारताने जो एक स्पष्ट रणनीतिक विजय मिळविला आहे, त्याने पाकिस्तानची छी: थू: झाली. आता पाकिस्तान एखाद्या संतप्त पाळीव कोंबड्याप्रमाणे सीमा रेषेच्या बाजू-बाजूने धावाधाव करीत आहे. लॉरेन्स सेलिन पुढे म्हणतात की, दहशतवाद आणि आण्विक युद्धाची धमकी, हे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख घटक आहेत. पाकिस्तान हा नकली देश आहे, जो आंतरराष्ट्रीय आचारसंहिता पाळण्यास लायक नाही. दक्षिण आशियात शांतता आणि स्थैर्य कायम करायचे असेल, तर पाकिस्तानची आण्विक युद्धाची क्षमता नष्ट केली पाहिजे आणि त्याचे किमान चार तुकडे करायला हवे. एका परदेशी विश्लेषकाच्या या मताच्या प्रकाशात, आपण आपल्या भारतातील विरोधी पक्ष, विचारवंत, बुद्धिवंत, दरबारी पत्रकार, संरक्षण विषयाचे तज्ज्ञ यांचे विचार तपासून बघितले, तर शरमेने मान खाली जाईल.
बालाकोटवरील हल्ल्यानंतर, भारतातील 21 राजकीय पक्षांनी भारत सरकारची निंदा करणारा ठराव पारित केला, जो पाकिस्तानच्या मीडियात वारंवार दाखविला जात होता. आम्ही आमच्या भूमीचे रक्षण करायचे नाही तर कुणी करायचे? तसे करण्याची भारताची क्षमता नाही का? जरूर आहे. असतील-नसतील त्या जुन्या-पुराण्या अस्त्र-शस्त्रांसह आमचे लष्कर भारताच्या सीमेचे रक्षण करण्यास समर्थ आहे. आमची ही ताकद आमच्या राज्यकर्त्यांनी कधी ओळखलीच नाही. ओळखली असेल, तर त्याचा वापर केला नाही. प्रत्येक वेळी शांततेच्या गोष्टी. चर्चा सुरू करण्याचा आग्रह. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी अन्यान्य प्रयत्न, यांचाच आम्ही आधार घेत गेलो. आमचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ज्या स्वप्नवत् गुलाबाच्या बगिचात विहरत होते, त्याच स्वप्नात त्यानंतरचे बहुतेक सर्व राज्यकर्ते राहू इच्छितात. कारण ते सोयीचे आहे. सोपे आहे आणि राज्यकर्त्यांच्या राजकीय सोयीचेही आहे. शेजारी देशांनी कितीही कुरापती काढल्या, तरी आम्ही त्या ‘वसुधैव कुटुंबकम्’चा विकृत अर्थ लावून सतत नरमाईचे बोटचेपे धोरण स्वीकारून सहन केल्या आहेत. भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आणि ‘हार्ड पॉवर’ आम्ही नेहमी सुप्तावस्थेतच ठेवण्यात इतिकर्तव्यता मानली. दुसर्याने आक्रमण केले, तरच प्रत्युत्तरादाखल युद्ध हा अगदी म्हणजे अगदीच शेवटचा पर्याय म्हणून आम्ही स्वीकारला आहे. ज्याला ‘प्रीअॅम्टिव्ह अटॅक’ (धोका लक्षात येताच तडफेने स्वत:च त्यावर हल्ला करणे) हा पर्याय आम्ही कधी मनात आणलाच नाही. आमची सिद्धता नव्हती का? होती. आम्ही कुठल्याही अंगाने तसूभरही कमी नव्हतो. पण, राजकीय इच्छाशक्तीच नव्हती. ती असायला पाठीला कणा असणे आवश्यक असते.
2014 नंतर मात्र हे सर्व बदलले. आधीच्या कॉंग्रेस सरकारने करून ठेवलेली घाण साफ करता-करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताची ‘सॉफ्ट व हार्ड पॉवर’ चाणाक्षपणे वापरण्यास सुरवात केली. शत्रुदेशाला नामोहरम करण्यासाठी युद्ध िंकवा युद्धसज्जता हा एकमेव मार्ग नसतो. इतरही अनेक मार्गाने शत्रुदेशाला घायाळ करता येऊ शकते. नुकतीच एक बातमी आली आहे की, 24 फेब्रुवारीला चाबहार बंदरातून अफगाणिस्तानातील मालाचे जहाज भारताकडे रवाना झाले आहे. अफगाणिस्तानातून भारतात येणारा माल प्रथमच पाकिस्तानला टाळून येत आहे. या खेपेला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी झरांज या ठिकाणी हिरवी झेंडी दाखविली. झरांजनंतर इराणच्या प्रदेशातून ही खेप चाबहार बंदरात पोहोचली आणि नंतर ती जहाजाने भारताकडे निघाली. 2017 साली भारतातून अफगाणिस्तानला जाणारा मालदेखील याच मार्गाने जहाजाने पाठविण्यात आला होता. हा व्यापारमार्ग सुरू होणे म्हणजे पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या घायाळ करणेच आहे. हे आधीच्या म्हणजे महान अर्थशास्त्री, नम्र-विनम्र डॉ. मनमोहनिंसग सरकारला का नाही सुचले? खरेतर, या व्यापारमार्गाबाबत भारत-इराण यांच्यात 2003 सालीच चर्चा झाली होती. (म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात) त्यानंतर 2003 ते 2014 (संपुआ सरकारचा काळ) बोलणी पुढे सरकलीच नाही. 2015 साली चाबहार बंदर विकसित करण्याबाबत करार झाला. 2018ला चाबहार बंदराचे संचालन भारताने आपल्या हातात घेतले आणि 2017 ला भारताचा माल चाबहार बंदरामार्फत अफगाणिस्तानला पोहोचलाही. भारताने अफगाणिस्तानसाठी चाबहार मार्ग खुला केल्यामुळे पाकिस्तानचे किती आर्थिक नुकसान झाले आहे, याचा अंदाज घ्यायचा असेल, तर पाक टीव्हीवरील तिथल्या लोकांच्या चर्चा ऐकाव्यात. अक्षरश: हादरून गेले आहेत ते. आज पाकिस्तान भिकारी बनला आहे, त्यात या नव्या मार्गाचा फार मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही.
आज चीन ठामपणे पाकिस्तानच्या बाजूने उभा असल्याचे आपण पाहतो. मसूद अझहरप्रकरणी चीनने पाकिस्तानची बाजू घेतली आहे. यावर चीनला दोष द्यायचा, चीनला झोडपून काढायचे, त्याच्यावर टीका करायची, ते सोडून आपले विरोधी पक्ष, नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची टिंगल करण्यात गुंतले आहेत. परंतु, या कृतीतून चीनने भारताला एक स्पष्ट संदेश दिला आहे. जे करायचे ते स्वत: करा. कुबड्यांसाठी इकडे-तिकडे बघू नका. आम्ही हे सत्य फार वर्षांपूर्वी जाणले होते. आमच्याकडून काही शिका. चीनचे भारताला हे अप्रत्यक्ष सांगणे आहे. आम्ही ते ओळखले पाहिजे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी दयनीय करायची की, त्याला अंततोगत्वा भारताकडे हात पसरायची पाळी यावी. मग तुम्ही त्याला ऐटीत सांगू शकाल की, बाबा रे! आधी मसूद, हाफिझ, दाऊद दे. मग जे वाटेल ते माग. ही दानत दाखविण्याआधी आम्हाला आमची ताकद वाढवावी लागेल. ती दलाल कॉंग्रेसच्या राज्यात वाढणार नाही. आज जे राफेलवरून मोदी सरकारवर चहुबाजूने खोटे आरोप होत आहेत, त्यांनी आपल्या मनात मोदी सरकारबद्दल संशय निर्माण न होता, आमचे रक्त तापायला हवे. पण ते नुसते तापून चालणार नाही. दिवाणखान्यातील गुबगुबीत सोफ्यावर बसून भारताच्या शहीदांबद्दल अश्रू ढाळून चालणार नाही. त्याचे प्रत्यंतर आपल्या हातून घडणार्या विवेकपूर्ण कृतीतून दिसायला हवे.
जर आपल्याला खरेच, पाकिस्तानला नामोहरम करायचे असेल, तर एक तत्काळ आणि तसा अत्यंत सोपा पर्याय लवकरच आपल्याला उपलब्ध होत आहे. तो म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचे सरकार प्रचंड बहुमताने दिल्लीत बसविणे. जातिपातीचे, भाषा-प्रांतभेदाचे विषारी राजकारण बाजूला सारून आम्हाला देशासाठी पुढे यावे लागेल. मिर्झा गालिब यांचा एक सुंदर शेर मला येथे आठवतो-
रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ायल
जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या हैं...
(धमन्यांमधून धावणार्या या रक्ताचे मला काहीएक कौतुक नाही. डोळ्यांतून जर त्याचा थेंब टपकत नसेल तर ते रक्तच नाही!)
इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांच्या, संयुक्त राष्ट्र संघातील एका भाषणातील एक वाक्य सदा लक्षात राहील असे आहे. या सभेत ते जगात जवळपास एकटे पडले होते. नेत्यानहू म्हणतात- ‘‘सारे जग जरी आमच्या विरुद्ध उभे राहिले, तरी हा इस्रायल आपल्या पायांवर एकटा ठामपणे उभा राहील!’’
आपल्याला असा भारत करता येणार नाही का? भारत तयारच आहे. भारताच्या या आंतरिक विजिगीषू वृत्तीला 2014च्या भाजपा सरकारने जागृत केले आहे. ती वृत्ती सार्वत्रिकपणे प्रकट होण्यास उत्सुक आहे. दार खटखटवीत आहे. आपल्याला पुढाकार घेऊन दार उघडायचे आहे. त्यासाठी 2019ची निवडणूक समोर आहे
No comments:
Post a Comment