Total Pageviews

Wednesday, 22 June 2016

योगाचा निरामय संवाद!-YOGADAY

योगाचा निरामय संवाद! दुसरा आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा झाला. सगळ्या जगात लोकांनी उत्साहात एकत्रित येऊन योगासने केली. स्वत: नरेंद्र मोदी यांनी चंदीगड येथे योगासने केली. योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य अशी देणगी आहे. आपले आरोग्य अधिक चांगले राहावे म्हणून योगासनांच्या हालचाली करायच्या, स्नायू बळकट करायचे इतकेच योगाचे प्रयोजन नाही. भारतीय तत्त्वज्ञानात योगाचा अर्थ खूप व्यापक आहे. भारतीय तत्त्वज्ञान हे केवळ स्वत:भोवती केंद्रित कधीच नव्हते आणि नाही. व्यक्ती, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी अशी विशाल होत जाणारी वर्तुळे आहेत. या सर्व वर्तुळांना स्पर्शून जाणारी एक स्पर्शिका म्हणजे योग आहे. योग हा एक निरामय संवाद आहे. व्यक्ती आणि समष्टी, व्यक्ती आणि सृष्टी, व्यक्ती आणि परमेष्टी यांच्यातील हा एक विकासाचा संवाद आहे. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून जगाला सुचविला याचे कारण, हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे एक ऊर्जावान दिवस म्हणून या दिवसाचे एक महत्त्व आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा योगदिवस साजरा करावा, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाला दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. भारताला स्वराज्य मिळाले तेव्हापासून जास्तीत जास्त काळ सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी आणि सरकारांनी सतत पाश्‍चात्त्यांची नक्कल करण्यातच धन्यता मानली. भारतीय संस्कृतीसुद्धा जगाला काही देऊ शकते, यावर या लोकांचा विश्‍वासच नव्हता. जगाकडून विशेषत: पाश्‍चात्त्य देशांकडून उधार उसनवारी करून, भ्रष्ट नक्कल करून, स्वत:ला धन्य समजण्याचाच या लोकांचा स्वभाव वेळोवेळी प्रकट झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा, जगाला देण्यासाठीही या देशाकडे काहीतरी आहे, याची जाणीव आपल्या देशवासीयांना करून दिली. जागतिक योगदिवस साजरा करण्याचे आवाहन त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला केले आणि ते मान्य झाले. सर्व भारतीय नागरिक आणि जगाच्या कानाकोपर्‍यात असलेले भारतीय वंशाचे नागरिक यांची छाती गर्वाने फुलून आली. माझ्या देशाकडे जगाला देण्यासारखे काहीतरी आहे, याची अनुभूती पहिल्यांदा भारतीयांना आली. योग आणि प्राणायाम म्हणजे केवळ हातापायांच्या हालचाली आणि श्‍वसनाचा व्यायाम नाही. यामागे वैज्ञानिक आणि मानसिक प्रक्रियेचा विचार केलेला आहे. मानवी शरीर हे केेवळ भौतिक तत्त्वांनी बनलेले नसून यात अभौतिक तत्त्वांचाही समावेश आहे, याचा परिपूर्ण विचार करून योगाची रचना केलेली आहे. अनेक असाध्य रोगांवर योग आणि आयुर्वेद यांनी निराकरण करण्याचा मार्ग दाखविला आहे. योगाच्या माध्यमातून हिंदुत्व थोपण्याचा किंवा भगवेकरण करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा सरधोपट आरोप पोथीनिष्ठ डावे आणि समाजवादी करत असतात. हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे, हे समजून न घेता हिंदुत्वाचा अर्थ फक्त प्रार्थनापद्धतीपुरता संकुचित करून जे लोक हिंदुत्वाकडे पाहतात, तेच अशा प्रकारचा आरोप करू शकतात. योगाच्या बाबतीत रूढार्थाने जे हिंदू नाहीत अशा अनेकांना अत्यंत आश्‍चर्यकारक अनुभूती आलेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात किनवट येथे एक मुस्लिम तरुण काही कारणाने पाठीच्या कण्याने आजारी झाला. अनेक औषधोपचार केले. युनानी, ऍलोपॅथी, फिजिओथेरेपी अशा प्रकारच्या चिकित्सापद्धती अवलंबून झाल्या, पण झोपलेल्या या तरुणाला उठून बसता येणे अशक्य होत होते. असहाय अवस्थेत त्याला कुणीतरी योग विद्याधाममध्ये जाण्याचा सल्ला दिला. योगाचा चमत्कार असा की, योगोपचारामुळे हा तरुण उठून बसला. आपला हा पुनर्जन्म आहे, असे मानून त्याने उर्वरित आयुष्य योगाच्या प्रचाराला समर्पित करण्याचे ठरविले. घरात योगाचे वर्ग सुरू केले. भिंतीवर मोठा ॐ कार काढलेला आहे. त्यासमोर बसून हा योगाचे वर्ग घेतो. स्वामी रामदेव यांचा संपर्क आल्यानंतर हा तरुण त्यांच्या पतञ्जली योग समितीचे काम करतो आहे. स्वामी रामदेव यांच्यासोबत परदेशातही जाऊन आला आहे. योग हा भगवेकरण करण्याचा प्रयत्न आहे, योग करताना ॐ कार म्हणायचा की नाही, अशा सर्व खोडसाळ विषयांना हा किनवटचा मुस्लिम तरुण हे एक जिवंत उत्तर आहे. आता दिल्लीतील योगदिवसाच्या कार्यक्रमात, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहभागी झाले नाहीत. त्यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला आहे. योग ही स्वत:चे अहंकार समर्पित करण्यापासून सुरू होणारी प्रक्रिया आहे. अहंकार विसरायचे तेथेही हे लोक जर आपले पद आणि प्रतिष्ठा यांचे गळू जर सोडायला तयार नसतील, तर यांना काय भवितव्य? दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिन तोंडावर असताना, जे महाशय सगळे प्रोटोकॉल झुगारून उपोषण करण्याची आणि प्रजासत्ताकदिनाची परेड उधळून लावण्याची भाषा करत होते, त्यांनी प्रोटोकॉलचाच बाऊ करावा, हे अनाकलनीय आहे. काहीही झाले की, ऊठसूट मोदी यांच्यावर तेच ते गुजरातच्या दंगलीचे गलिच्छ आरोप करायचे. म्हणे योग म्हणजे तोडणे नव्हे तर जोडणे. गुजरातच्या दंगलींचा दोष मोदी यांच्या माथी मारून त्यांना बदनाम करण्याचे सगळे प्रयत्न पराभूत झाले. न्यायालयांनी मोदी यांना कोणत्याही प्रकरणात दोषी मानले नाही. भारतीय जनतेने तर त्यांना पंतप्रधानपदी नेऊन बसविले! मात्र, ज्यांनी हिंदुत्वाला, भारतीयत्वाला विरोध करण्याची सुपारीच घेतली आहे, त्यांना मोदी यांच्यावर तेच ते आरोप करण्याशिवाय दुसरा पर्याय तरी कोणता? योग करणे म्हणजे तोडणे असे कोणी सांगत असेल, तर किनवटच्या या तरुणासारखे अनेक जण हे त्यांना सणसणीत उत्तर आहे. मोदी यांनी योगदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना योगाच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना पुरस्कार तर जाहीर केलेच, पण योगाचे महत्त्व आपल्या शैलीत सांगितले. योग हा झिरो बजेट आरोग्य विमा आहे, असे मार्मिक वर्णन मोदी यांनी केले आहे. आगामी वर्षात आरोग्यसंपन्न भारताचा संकल्प करण्याची गरज होती. देशात मोठ्या संख्येने मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. मोदी यांनी योगाच्या माध्यमातून मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी योगाचार्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले आहे. एखाद्या पंतप्रधानांनी आपल्या देशाचा वैभवशाली ठेवा कशात आहे, याचा अचूक अंदाज घेऊन देशातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी वर्षभरासाठी देशाला अशा प्रकारे कार्यक्रम देण्याची ही पहिलीच वेळ असेल. भारतीय जीवनदर्शन संपूर्ण जगातील मानवतेला पावन करणारे आहे, हे केवळ शब्दांमधून सांगून पुरेसे नाही. हे जीवनदर्शन भारतीय समाजाने जगून दाखवावे लागेल. जगाला या उदात्त भारतीय संस्कृतीचे दर्शन आपल्या जीवनदर्शनातून घडवावे लागेल. योग हा त्याचा एक विषय आहे. येत्या वर्षभरात आपल्या स्वत:साठी, समाजासाठी, देशासाठी आणि जगातील मानवतेसाठी योगमय जीवनाचा योग आपल्या जीवनातून जगाला दाखवावा लागेल

No comments:

Post a Comment