पाकिस्तानचे दलाल?
-vasudeo kulkarni
पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झालेले असतानाही, पाकिस्तानी लष्करालाच निर्दोष ठरवणारे संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी हे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री, दलाल आहेत काय? असा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेेते यशवंत सिन्हा यांनी लोकसभेत केलेला रोखठोक सवाल म्हणजे संतप्त भारतीयांचीच प्रतिक्रिया होय! दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या भागातील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून वीस पाकिस्तानी जवानांनी, गस्त घालणाऱ्या सहा भारतीय जवानांवर अचानक केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. सरहद्द ओलांडून वारंवार भारतीय चौक्यावर आणि जवानांवर हल्ले चढवायला सोकावलेल्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला हवे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून या घटनेचा सूड घ्यायला हवा, अशा संतप्त प्रतिक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटल्या, त्या पाकिस्तानी लष्कर वारंवार चिथावणीखोर कारवाया करीत असल्यानेच. पाकिस्तानने केलेला हा हल्ला अत्यंत भ्याड आणि आंतरराष्ट्रीय नियमांनाही चूड लावणारा असल्याची प्रतिक्रिया लष्कराकडून व्यक्त झाली होती. पाकिस्तानच्या लष्करी जवानांनीच हा हल्ला चढवल्याचे लष्कराने नमूद केले होते. पण या घटनेचा जाब सरकारला विचारणाऱ्या विरोधकांचाच नव्हे, तर भारतीय जनतेचा आणि लष्कराचाही अवमान संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी या चर्चेला उत्तर देताना केला, ही दुर्दैवी बाब होय! पूृँछ विभागातल्या सरल चौकीजवळच्या चकादाबाद जवळ गस्त घालणाऱ्या पाच जवानांवर पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीने अत्यंत नियोजनपूर्वक हल्ला चढवल्याचे लष्कराचे म्हणणे होते. पण अँटोनी यांनी मात्र पाकिस्तानी लष्कराच्या वेशात घुसलेले ते दहशतवादी असल्याचा दावा करून, त्या जवानांच्या हौतात्म्यालाच डांबर फासायचे अवसानघातकी आणि निंद्य कृत्य केल्यानेच विरोधकांनी सरकारच्या या नेभळट-पाकिस्तान धार्जिण्या, बोटचेप्या धोरणाचा दाहक शब्दात निषेध केला, ते योग्यच झाले. अँटोनी हे भारताचे की पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आहेत? चौकशी न करताच, त्यांनी हे आगलावे वक्तव्य कसे केले, लष्करावर ते दडपण आणत आहेत, अशा आरोपांची सरबत्ती भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी अँटोनी यांच्यावर केली, ती मुळीच वावगी नाही. दिल्लीत बसून, तो हल्ला पाकिस्तानी लष्कराने नव्हे, तर दहशतवाद्यांनी केल्याचे अँटोनी यांना कसे समजले? असा जळजळीत सवालही सिन्हा यांनी विचारला आहे. संरक्षण मंत्र्याच्या या असल्या पडखाऊ आणि पाकिस्तानला वाचवायच्या वक्तव्याने, पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला अधिकच चेव येईल, शस्त्रसंधी मोडून भारतीय जवानांवर हल्ले करायला चिथावणी मिळेल याचेही भान अँटोनी यांना राहिलेले नाही. अँटोनी यांनी केलेल्या वक्तव्यानंतरच लष्कराने या हल्ल्याबाबत केलेले वक्तव्य मागे घेतले. ते अँटोनी यांना जाणून बुजून मागे घ्यायला लावले असावे, या संशयाला त्यांच्या भंपक वक्तव्याने बळकटी येते. संरक्षण मंत्रीच देशाच्या आणि आपल्या लष्कराच्या हिताला चूड लावून, शत्रुराष्ट्राची तळी उचलत असेल तर, या असल्या नादान-नालायक संरक्षण मंत्र्याकडून लष्कराला कसले संरक्षण मिळणार? देशाच्या सीमा सुरक्षित कशा राहणार? आपले प्राण तळहातावर घेऊन सीमेवर चोवीस तास गस्त घालणाऱ्या जवानांच्या मनोधैर्यावरच आघात करणारे अँटोनी यांचे हे वक्तव्य राष्ट्रीय हिताची होळी करणारेच असल्याने, त्याचा निषेधच करायला हवा. त्यांनी पाकिस्तानला निष्कलंक ठरवून पाच शहिदांच्या बलिदानाचाही घोर अपमान केला आहे. या आगलाव्या वक्तव्याबद्दल त्यांनी संसदेची आणि देशाची-लष्कराचीही माफी मागायला तर हवीच, पण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या असल्या पळपुट्या संरक्षण मंत्र्याला घरी पाठवायला हवे. अन्यथा आगामी काळात उत्तर सीमेवर चीनकडून आणि पूर्व सीमेकडून पाकिस्तानकडून घुसखोरीच्या, हल्ल्यांच्या घटनात नक्कीच वाढ होईल, याचाही गंभीर विचार डॉ. सिंग यांनी करायला हवा.
लष्कराचाही विश्वासघात
गेल्या तीन वर्षात पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय सीमेवर 300 पेक्षा अधिक हल्ले चढवून शस्त्रसंधी मोडल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीही अनेक जवानांना पाकिस्तानच्या लष्कराने अचानक केलेल्या गोळीबारात शहीद व्हावे लागले. अशा घटना घडल्यावर अँटोनी हे नेहमीच पाकिस्तानचा निषेध करतात. कधी या निषेधाचे शब्द तीव्र असतात, हे असले हल्ले मोडून काढायला भारतीय लष्कर समर्थ असल्याच्या वल्गना करतात. प्रत्यक्षात मात्र त्यांचे वर्तन हे पडखाऊ आणि लष्कराचाही विश्वासघात करणारेच आहे. लडाखच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर चीनी सैनिकांच्याकडून वारंवार घुसखोरी होत असतानाही, ती थोपवायसाठी अँटोनी लष्कराला मोकळीक देत नाहीत. तीन वर्षांपूर्वी लडाखच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी लष्कराकडे असताना ती केंद्रीय गृहमंत्रालयाने आपल्याकडे घेतली. चीनी लष्कराच्या घुसखोरीत वाढ झाली. दौलत बेग ओल्डी भागात चीनी लष्कराने भारतीय हद्दीत वीस किलोमीटर घुसखोरी करून तंबू ठोकले. त्या घटनेचा प्रचंड गाजावाजा झाल्यावर याच अँटोनी यांनी चुमूर भागातले भारतीय लष्कराने बांधलेले बंकर पाडून टाकायच्या अटीवर चीनने माघार घेतली. अवघ्या दोनच दिवसांपूर्वी भारतीय जवानांच्या गस्ती पथकाला चीनी लष्कराने अडवून मागे जायला भाग पाडल्याची घटना घडली. अँटोनी यांना भारतीय लष्कराच्या आणि सीमेच्या, देशाच्या हितापेक्षा शांतता महत्त्वाची वाटते. त्या अघोरी शांततेच्या बदल्यात त्यांनी जवानांच्या शौर्यावरही निखारे ठेवायचा अधमपणा केला आहे. प्रेमनाथ सिंह, शंभू सरन राय, विजय कुमार राय, रघुनंदन प्रसाद आणि पुंडलिक माने या पाच जवानांचे पूृँछ सीमेत पाकिस्तानी जवानांनी बळी घेतले. या शहीदांच्या हौतात्म्याचा अवमान करणाऱ्या अँटोनी यांना, विरोधकांच्या, जनतेच्या संतापाचीही पर्वा नाही. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळलेली असतानाही अँटोनी मात्र शांततेची जपमाळ ओढत संसदेच्या साक्षीनेच पाकिस्तानची तळी उचलत आहेत, हे महाभयानक होय! लष्करप्रमुख विक्रम सिंह यांनी पूँछ भागाचा तातडीने दौरा करायची घोषणा केली. जवानांचे मनोधैर्य कायम राखायसाठी ते या भागातल्या जवानांना भेटतील, शहिदांच्या कुटुंबीयांचेही सांत्वन करतील, पण हल्ला करणाऱ्या शत्रूवर शस्त्रच उगारायचे नाही, गप्प बसायचे, हे असले देशविघातक धोरण अँटोनी यांनी स्वीकारलेले असल्याने, सिंह आणि लष्कराचे हातही बांधले गेले आहेत. त्यांच्या शौर्याला सरकारच्या लेखी काही किंमत राहिलेली नाही. अँटोनी यांनी पाकिस्तानला या घटनेबद्दल निर्दोष ठरवताच, पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांना या हल्ल्याचा तातडीने इन्कार करायची संधी मिळाली. अँटोनी यांच्या लष्करावरच बंधने आणायच्या धोरणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये धर्मांध दहशतवाद्यांना घुसवायची पाकिस्तानची कट-कारस्थाने यशस्वी होतील, हे नक्की
No comments:
Post a Comment