https://youtube.com/shorts/ObCwifOJsHk?si=u867KQwG5ZdITfpV
भारताच्या दोम्माराजू गुकेशने वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी कँडिडेट्स
ही बुद्धिबळ विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि खडतर स्पर्धा जिंकण्याचा चमत्कार
केला. या विजयामुळे बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये विद्यमान जेता चीनचा डिंग
लिरेनशी टक्कर घेण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला. गुकेश हा आजवरचा सर्वांत युवा
कँडिडेट्स जेता ठरला. डिंग लिरेनशी सरशी झाल्यास तो बुद्धिबळाच्या इतिहासातील
सर्वांत युवा जगज्जेताही बनू शकेल. त्याच्या या अविस्मरणीय कामगिरीविषयी…
सुरुवातीची आव्हाने…
स्पर्धा सुरू होण्याच्या आधी दोन
घटक गुकेशच्या दृष्टीने प्रतिकूल होते. तो या स्पर्धेत सर्वांत लहान (१७ वर्षे)
होता. कँडिडेट्ससारख्या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये अनुभव हा घटक अनेकदा निर्णायक
ठरतो. निव्वळ युवा ऊर्जा एका टप्प्यापर्यंत साथ देऊ शकते. ती महत्त्वाची असतेच. पण
स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात इतर घटकांचा विचार करण्याची परिपक्वता आवश्यक असते. ती
वयानुरूप वाढते. दुसरा प्रतिकूल घटक होता रँकिंगचा. एकूण आठ बुद्धिबळपटूंमध्ये
गुकेश २७४३ एलो गुणांसह सहावा होता. त्याच्यापेक्षा अमेरिकेचे फॅबियानो करुआना
(२८०३) आणि हिकारू नाकामुरा (२७८९), रशियाचा इयान नेपोम्नियाशी (२७५८) या तीन खेळाडूंकडे
संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते. नेपोम्नियाशी हा दोन वेळचा कँडिडेट्स जेता
आहे. हे तिघे आणि गुकेश अशा चौघांनाही १४व्या म्हणजे अंतिम फेरीत जेतेपदाची संधी
होती. त्यात गुकेशने बाजी मारली हे विलक्षण आहे. अंतिम फेरीत गुकेशने नाकामुराला
बरोबरीत रोखून ९ गुणांपर्यंत मजल मारली. दुसरीकडे नेमोप्नियाशीविरुद्ध विजयाची
संधी करुआनाने दवडली आणि त्यांचा डावही बरोबरीत सुटला. त्यामुळे करुआना, नाकामुरा आणि
नेपोम्नियाशी यांना प्रत्येकी ८.५ गुणांपर्यंतच मजल मारता आली आणि गुकेश विजेता
ठरला.
आनंदचा वारसदार…
कँडिडेट्स स्पर्धा ही गेल्या काही
वर्षांमध्ये महत्त्वाची ठरू लागली, कारण या स्पर्धेत विजेता ठरणारा आणि ठरणारी बुद्धिबळपटू
विद्यमान जगज्जेत्यांचे आव्हानवीर बनतात. भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद
यालाच आतापर्यंत ही स्पर्धा जिंकता आली होती. आनंदने अर्थातच पुढे जाऊन अनेकदा
जगज्जेतेपदही मिळवले. त्याने यापूर्वी २०१४मध्ये कँडिडेट्स स्पर्धा जिंकली आणि तो
त्या वेळच्या जगज्जेत्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनसमोर आव्हानवीर बनला.
दरम्यानच्या काळात भारतीय बुद्धिबळपटूंनी बुद्धिबळ विश्वात लक्षवेधक कामगिरी
करण्यास सुरुवात केली होती. आनंदपासून प्रेरणा घेऊन भारत बुद्धिबळातील महासत्ता बनेल, असे गेली अनेक वर्षे
बोलले जात आहे. पण आनंदनंतर कोण, या प्रश्नाचे उत्तर चटकन देता येत नव्हते. कारण अनेक
गुणवान बुद्धिबळपटू उदयाला आले, तरी त्यांच्यापैकी आनंदप्रमाणे जगज्जेता कोण बनेल, या उत्तराची प्रतीक्षा
होती. अवघ्या दहा वर्षांत एखादा बुद्धिबळपटू कँडिडेट्स जिंकून जगज्जेतेपदापासून
एका पावलावर येईल, असे
नक्कीच वाटले नव्हते. गुकेशने ती प्रतीक्षा संपवली.
No comments:
Post a Comment