दिल्लीचेही तख्त राखतो
महाराष्ट्र माझा!
निर्णायक युद्धं इतिहासात
तशी अनेकदा झाली. दुसरे महायुद्ध, 1971चे बांगलादेशची निर्मिती ही काही अलीकडची उदाहरणे. भारतवर्षातील अनेक
महत्त्वाच्या संग्रामांमध्ये 1761चे पानिपत युद्ध
अग्रस्थानी येते. याची कारणे अनेक आहेत - प्रचंड प्राणहानी आणि त्यामुळे इतिहासात
झालेला बदल, हे त्यातील प्रमुख. या
कडव्या झुंजीचे परिणाम त्यानंतरच्या नजीकच्या आणि दूरच्या काळातही दिसून आले,
हे निर्विवाद आहे. आज आपण जेव्हा मागे वळून
पाहतो, तेव्हा काय चित्र
डोळ्यांसमोर येते, याचे थोडे विश्लेषण करणे,
हा या लेखाचा उद्देश.
तराव्या शतकात शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापिले. याचे मूळ स्वरूप तुर्की-इराणी पातशाहच्या परराज्यापासून स्वराज्यनिर्मिती असेच होते. भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या पाऊलखुणांमध्ये जून 1674 मधील शिवराज्याभिषेक! इथून मराठेशाहीचा पुढील वटवृक्ष वृद्धिंगत झाला. 1720 ते 1740 या काळात छत्रपती शाहू यांच्या कालखंडात, बाजीराव पेशवे यांचा झंझावात हिंदुस्थानभर पसरला. जसे मुघल राज्य खिळखिळे झाले, तसे वायव्येकडील शत्रू पुन्हा हिंदुस्थानात शिरण्याचा प्रयत्न करू लागले. 1739च्या नादीर शाहच्या सैतानी स्वारीनंतर केवळ मराठेच यांना तोंड देऊ शकतात, हे सर्वमान्य झाले. अप्रत्यक्षपणे, याच वेळेपासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी मराठी सत्तेवर येऊ लागली.
यानंतर अवघ्या दहा
वर्षांत नादीर शाहचा एक नोकर, अहमद शाह अब्दालीने
पंजाबवर आक्रमण केले. मुघल पातशाह मुहम्मद शाहने नानासाहेब पेशवे यांनादेखील
मदतीसाठी बोलावले. पण, त्यापूर्वीच आक्रमण
परतवण्यात यश आलेले होते. जेव्हा पुढील चार वर्षांत अब्दालीच्या आणखी दोन स्वार्या
आल्या, तेव्हा दिल्लीचा वजीर
सफदर जंगने मराठ्यांची मदत मागितली. रोहिले-पठाण हे अब्दालीचे भारतातील हस्तक होते
आणि सफदर जंगचा त्यांनी पराभवही केला होता. तेव्हा शिंदे आणि होळकर प्रथमच
अंतर्वेदीत गेले आणि रोहिल्यांचा त्यांनी पराभव करून वजिराला पुन्हा गादीवर बसवले.
सफदरजंगाने त्यानंतर 1752 साली मराठ्यांशी तह केला,
ज्यायोगे मुघल पातशाह आणि राज्य याचे
सर्वप्रकारे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी पत्करली. त्याबदल्यात 30 लक्ष रुपये आणि अनेक पातशाही सुभे मराठ्यांना
दिले जातील, असे मान्य करण्यात आले.
इथून अब्दाली आणि मराठे या एकमेकांपासून दूर, अशा सत्तांच्या संघर्षाचा पाया रचला गेला.
उत्तरेत जे अनेक अफगाण-रोहिले स्थायिक झाले होते, त्यात नजीब खान, हाफिज रेहमत खान आणि अहमद खान बंगश हे प्रमुख होते. मराठ्यांची वाढती सत्ता पाहून ते धास्तावले होते. यात शाह वलिउल्लानामक एका कट्टर धर्मगुरूंचीही भर पडली. आपला धर्म आणि राजकीय सत्ता, दोन्ही या मराठ्यांपासून धोक्यात आहे, अशा अर्थाची गार्हाणी त्यांनी आपल्या मायदेशाच्या पराक्रमी पातशाह अहमद शाह अब्दालीकडे नेली. तुम्ही दिल्लीत या, या दख्खनी मराठ्यांना हुसकावून लावा, आम्ही तुमच्या खर्चाची काळजी घेतो, अशा स्वरूपाच्या या विनवण्या होत्या.
वास्तविक हिंदुस्थानातील
संपत्ती हे एक आकर्षण अब्दालीला पुरेसे होते. त्यात धर्मयुद्धाची जोड आल्याने 1757 मध्ये तो पंजाब ओलांडून दिल्लीकडे आला. पाच
हजार मराठा फौज दिल्लीच्या रक्षणासाठी हजर होती, पण ती हे आक्रमण थोपवू शकली नाही, तरी त्यांनी तीन लढाया दिल्या. दिल्ली काबीज करून अब्दालीने
तेथे लुटीची पराकाष्ठा केली. मुघल पातशाह, वजीर, त्यांची कुटुंबे, त्यांची पिढीजात संपत्ती पूर्णतः लुटून त्यांना
अक्षरशः नागवले. घरात खणत्या लावून संपत्ती बाहेर काढली. पण, इथे तो थांबला नाही. नजीबच्या आग्रहावरून तो
मथुरा आणि वृंदावन येथे धार्मिक युद्ध खेळला. तेथील तीर्थयात्री आणि साधुसंत यांची
कत्तल केली. यमुनेच्या पाण्याचा रंगदेखील या रक्ताने लाल झाला. उन्हाळ्याची चाहूल
लागताच अब्दाली दिल्लीची प्रचंड संपत्ती घेऊन मायदेशी परत गेला.
काही महिन्यांतच रघुनाथराव आणि होळकर यांनी दिल्ली पुन्हा जिंकून घेतली. पंजाबमध्ये जाऊन त्यांनी तैमूर शाह अब्दालीची लाहोरहून हकालपट्टी केली. मुलतान, अटक, पेशावरपर्यंत मराठा ठाणी बसवली. अब्दाली यावेळी इराणशी लढत होता आणि त्यातून तो बाहेर पडेल का नाही, हे कोणी सांगू शकत नव्हते. रघुनाथ राव आणि होळकर दक्षिणेत परत गेले, तेव्हा दत्ताजी शिंदे त्यांच्या जागी आले. इकडे नजीब खान पुन्हा अब्दालीशी संधान बांधू लागला. बोलणी करण्यात दत्ताजींना गर्क ठेवून, त्याने अब्दालीला पुन्हा येऊन धर्मयुद्ध लढण्यास पाचारण केले. अशा प्रकारे ऑक्टोबर 1759 मध्ये अब्दाली हिंदुस्थानावर आपल्या पाचव्या स्वारीस निघाला.
जेव्हा प्रचंड सेनेनिशी अब्दाली आला, तेव्हा दत्ताजीने दिल्ली वाचवण्यासाठी शर्थ केली आणि लढाईमध्ये आपला प्राण रणांगणी ठेवला. पुढे मल्हारजी होळकरांचा ही पराभव झाला. ’मोठा दीर्घ रोग आहे अब्दाली! याची उपेक्षा न करावी महाराज!’ असे उत्तरेकडून एक पत्र नानासाहेब पेशवे यांना आले. त्यानंतर दक्षिणेतून एक मोठे सैन्य, तोफखान्यासहित, सदाशिव राव भाऊ घेऊन निघाले. हिंदुस्थानात परप्रांतीयांना जागा नाही, सर्व शक्तींनी आपल्याबरोबर अफगाण आणि रोहिले यांच्याविरोधात लढावे, अशी भारतीय सत्ताधीशांना त्यांनी पत्रे धाडली. मात्र, मराठ्यांच्या मदतीला कोणी आले नाही, हे सर्व राजे केवळ आपला बचाव करीत आपल्या राज्यात राहिले. जुलै 1760 मध्ये दिल्ली मराठ्यांच्या हातात आली. त्यानंतर ऑक्टोबर 1760 मध्ये कुंजपुरा काबीज करून भरपूर रसद त्यांना मिळाली आणि त्याच महिन्याच्या अखेरीस दोन्ही फौजा पानिपत येथे समोरासमोर उभ्या ठाकल्या.
पानिपत येथे दि. 14 जानेवारी, 1761 रोजी अफगाण, रोहिले आणि अयोध्या नवाब शुजा उद दौला एकत्ररित्या मराठ्यांविरुद्ध लढले. पानिपतचे युद्ध तब्बल सात तास चालले. दुपारपर्यंत मराठा सैन्य हे युद्ध जिंकत आहे, असे चित्र होते. मराठा हुजुरात अफगाण वजिराची फळी फोडून अगदी अब्दालीच्या छावणीजवळ पोहोचले. हे पाहून आपल्या कुटुंबाला वेगवान उंटांवर बसवून अब्दालीने पलायनाची तयारी केली, असे त्याच्याच एका इतिहासकाराने नमूद केले आहे. मराठे युद्ध जिंकणार, असे वाटत असतानाच, एक गोळी विश्वासराव पेशवे यांना लागली आणि ते धारातीर्थी पडले. अनावर होऊन सदाशिवराव भाऊ गिलच्यांच्या सैन्यावर तुटून पडले. ’हाणा! मारा!’ अशा घोषणा देत मराठा हुजुरात, तुकोजी आणि जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार, सोनजी भापकर, इब्राहिम गारदी असे अनेक वीर प्राणपणाने लढले. अब्दालीलाही मोठ्या प्रमाणात प्राणहानी सोसावी लागली. परंतु, अखेर मराठ्यांचा पराभव झाला. मुख्य म्हणजे, युद्धानंतर निःशस्त्र शरण आलेल्यांची कत्तल करून अब्दालीने स्वतःवर कायमचा कलंक लावून घेतला.
नानासाहेब पेशवे यावेळी झाशीजवळ दहा हजार सैन्यानिशी पोहोचले होते. शिवाय दक्षिणेत दोन मराठा फौजा हैदर आणि निज़ामाच्या तोंडावर होत्या. अब्दालीच्या सैन्यात आणखी एक युद्ध लढण्याची क्षमता नव्हती. अब्दालीने दिल्लीत आल्यावर मराठा वकील बापू हिंगणेंना बोलावून तह करण्याची इच्छा प्रकट केली. पेशव्यांकडे वकील पाठवला व पत्रात लिहिले की, “आपल्या बंधूंनीच माझ्यावर हल्ला केल्यावर मला युद्ध लढणे भाग होते. पण, आता हिंदुस्थानाचा व्यवहार मी आपणांस सुपूर्द करतो.” दि. 20 मार्च, 1761 रोजी पानिपतचा विजेता रिकाम्या हाताने फारशी संपत्ती न मिळवताच मायदेशी जो निघून गेला, तो परत त्याने दिल्लीत प्रवेश केला नाही. 1739 पासून सुरू असलेली आक्रमणांची मालिका पानिपतला मराठ्यांनी कडवी झुंज देऊन संपुष्टात आणली.
‘चंबळ नदीच्या दक्षिणेत जा,’
असे मराठ्यांना सांगणार्या अब्दालीने सतलज नदी
आपली सीमा करू,असे यावेळी मान्य केले.
अर्थात, पुढे शिखांनी त्याला
तेथूनही मागे ढकलले. सिकंदराच्या काळापासून भारतावर होणारी आक्रमणे, पानिपतनंतर मात्र थांबली. एवढेच नव्हे, तर 1770 अखेर दिल्लीवर ताबा मिळवून मराठ्यांनी भोवतालचा प्रदेश जिंकून घेतला. उत्तरेत
गंगापार जाऊन नजीबचा पत्थरगड किल्ला लुटून फस्त केला.
या सर्व घटनांची परिणती मराठ्यांचा कुमाऊँच्या टेकड्यांच्या पायथ्यापासून दक्षिणेत कावेरी नदीपर्यंत आणि गुजरात ते ओडिशा या सर्व भारतखंडावर मराठ्यांचा ताबा राहिला. जर अब्दालीच्या प्रस्तावांना मान्य करून मराठे चंबळच्या दक्षिणेत गेले असते, तर त्याच्या उत्तरेकडच्या प्रदेशास कायमचे मुकले असते. आजच्या भारताच्या नकाशात सतलज नदी ही जवळजवळ 200 किलोमीटरपर्यंत भारताची सीमा आहे. जर मराठे दक्षिणेत राहिले असते, तर ही सीमा चंबळपर्यंत दक्षिणेत येऊ शकली असती. पुढे 33 वर्षे दिल्ली हरियाणा आणि पूर्वेकडे अलिगढपर्यंत मराठ्यांचा ताबा राहिला. दिल्लीसह हा प्रदेश 1803 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांकडून जिंकला आणि त्यामुळेच 1947 मध्ये पुन्हा सतलज नदी हीच पुन्हा सीमा निश्चित झाली, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये.
शिवछत्रपतींचे दिल्ली जिंकण्याचे
ध्येय, मानस आणि मराठ्यांनी
पानिपत आणि तद्नंतर केलेला पराक्रम या भगीरथ प्रयत्नांमधून आजच्या भारताचा नकाशा
निर्माण झाला आहे. 17व्या आणि 18व्या शतकातील मराठा राज्य झाले, म्हणून आपण अभिमानाने आपल्या इतिहासाकडे पाहू
शकतो, नाहीतर आपला इतिहास
म्हणजे एक गुलामगिरीची शृंखलाच झाली असती.
शिवराज्याभिषेकानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि या राज्यास गगनावरी नेणार्या वीर मराठ्यांना यासाठी नम्र अभिवादन ’स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव’ वर्षानिमित्त करणे आवश्यकच आहे. महाराष्ट्राचा राष्ट्रनिर्मितीतला वाटा मोठा आहे, याची जाणीव सार्वजनिक होणेही आवश्यक आहे. कारण खरंच आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!!
No comments:
Post a Comment