Total Pageviews

Sunday, 11 September 2022

इतिहास घडविणारे भाषण-- संजय पाठक-TARUN BHARAT

 इतिहास घडविणारे भाषण-- संजय पाठक-TARUN BHARAT

आज, रविवार, दि. 11 सप्टेंबर. हा दिवस भारतात आणि भारताबाहेरही ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून साजरा केला जातो. विश्वबंधुत्व म्हणजे नेमकं काय आणि स्वामी विवेकानंदांची विश्वबंधुत्वाची संकल्पना नेमकी काय होती याचं विवेचन करणारा हा लेख...
दि. 11 सप्टेंबर हा दिवस ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. पण, हा ‘विश्वबंधुत्व दिन’ नेमका 11 सप्टेंबरलाच का? तर 1893च्या दि. 11 सप्टेंबर या दिवशी स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत शिकागो येथे झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत भाषण केलं होतं. एका भारतीयाला जागतिक व्यासपीठावर आपले विचार भाषणाद्वारे मांडण्यास मिळालेली ती पहिलीच संधी होती! विवेकानंदांसारख्या भारतभूमीच्या एका सुपुत्राला आणि एका देशभक्ताला मिळालेली ती अभूतपूर्व अशी संधी होती. त्या संधीचं स्वामी विवेकानंदांनी अक्षरशः सोनं केलं. 11 सप्टेंबर या दिवसाचं महत्त्व आहे ते यासाठी!
मात्र, दि. 11 सप्टेंबर, 1893 रोजीचं स्वामी विवेकानंदांचं ते भाषण एखाद्या फर्ड्या वक्त्यानं एखाद्या सभेत किंवा एखाद्या व्याख्यानमालेत व्याख्यान द्यावं एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं. एखाद्या प्राध्यापकाने किंवा शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर दिलेल्या 35-40 मिनिटांच्या व्याख्यानासारखंही ते भाषण नव्हतं! विवेकानंदांचं ते भाषण होतं अमेरिकेत वादळ निर्माण करणारं! ते भाषण होतं धर्ममार्तंडांमध्ये आणि कट्टरपंथीयांमध्ये खळबळ माजवणारं! प्राचीन हिंदू धर्म सार्या जगाकडे कोणत्या नजरेनं पाहतो ते सांगणारं असं ते भाषण होतं. विवेकानंदांच्या त्या भाषणानं खरं सांगायचं झालं तर एक इतिहास घडविला होता!
स्वामी विवेकानंदांचं ते भाषण होतं एका वेगळ्या विषयावर. असा विषय की, जो जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी त्यापूर्वी कोणत्याही भारतीयाला मिळाली नव्हती. तो विषय होता हिंदू धर्माची तत्वे जागतिक व्यासपीठावर मांडण्याचा. प्रामुख्याने ‘विश्वबंधुत्वा’ची संकल्पना आपल्या त्या भाषणातून स्वामी विवेकानंदांनी परिषदेला उपस्थित असलेल्या विविध धर्मांच्या प्रतिनिधींपुढे मांडली.
अमेरिकेला प्रयाण
कोलंबस हा दर्यावर्दी 1492 मध्ये अमेरिकेत उतरला. त्या घटनेला 1892 मध्ये 400 वर्षे पूर्ण होणार होती. त्या निमित्ताने अमेरिकेत वेगवेगळ्या महोत्सवांचं आणि प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमांचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली होती जागतिक सर्वधर्म परिषद. या सर्वधर्म परिषदेसाठी आयोजकांनी जगातल्या सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केलं होतं. त्या सर्वधर्म परिषदेत जगातल्या सर्व धर्मांचे प्रतिनिधी एकत्र येणार होते आणि आपापल्या धर्माची तत्वे, आपापल्या धर्माचे विचार मांडणार होते. विविध धर्मातल्या विचारांचं आदान-प्रदान त्या परिषदेच्या निमित्ताने होणार होतं.
वरवर पाहता, सर्वधर्म परिषदेच्या आयोजकांचा हेतू चांगला वाटत होता. पण, त्यामागे दडला होता एक छुपा अजेंडा किंवा एक विशिष्ट हेतू! तो हेतू होता, ख्रिस्ती धर्माचं महत्त्व सांगण्याचा. जगातल्या विविध धर्मांमध्ये फक्त ख्रिस्ती धर्मच कसा श्रेष्ठ आहे, हे त्या परिषदेच्या निमित्ताने अमेरिका सार्या जगाला सांगणार होती. त्या परिषदेतून ख्रिस्ती धर्माच्या श्रेष्ठत्वाचाच डंका पिटला जाणार होता. हिंदू धर्मीयांचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद त्या सर्वधर्म परिषदेला गेले. अमेरिकेतल्या शिकागो या शहरात ती आयोजित करण्यात आली होती.
त्या परिषदेला जाण्यापूर्वी विवेकानंदांनी कन्याकुमारीच्या समुद्रातल्या शिलाखंडावर तीन दिवस चिंतन केलं होतं. सर्वधर्म परिषदेला जाण्याचा विवेकानंदांचा विचार पक्का झाला तो त्या तीन दिवसांच्या चिंतनानंतरच. म्हैसूरचे महाराज चामराजेंद्र वाडियार यांनी विवेकानंदांच्या अमेरिका प्रवासासाठी आर्थिक मदत दिली. परिषदेला जाण्याबाबत श्री शारदामाता यांचा आदेश विवेकानंदांना मिळाला. अखेरीस स्वामी विवेकानंद अमेरिकेत शिकागो इथे जाण्यासाठी निघाले. तिथे ते बोटीने जाणार होते. बोट सुटणार होती मुंबईहून. त्यासाठी स्वामी मुंबईला आले. स्वामीजींना निरोप देण्यासाठी तुरीयानंद आणि ब्रह्मानंद हे त्यांचे सहकारी मुंबईला आले होते. सुमारे साडेतीन महिने प्रवास करून स्वामीजी जागतिक सर्वधर्म परिषदेसाठी शिकागोमध्ये दाखल झाले.
विश्वबंधुत्वाची मांडणी
शिकागोच्या त्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी विचार मांडले ते हिंदू धर्मासंबंधीचे. हिंदू धर्मातल्या विश्वबंधुत्वाची कल्पना स्वामीजींनी प्रामुख्याने आपल्या भाषणात मांडली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली तीच मुळी, ‘विश्वबंधुत्वदर्शक’ अशा दोन शब्दांनी! हिंदू धर्मातलं विश्वबंधुत्वाचं तत्व सांगणारे ते दोन शब्द होते, ‘भगिनी’ आणि ‘बंधू’. विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली ती, ‘अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुनो!’ या वाक्याने आणि त्यातल्या ‘भगिनींनो’ आणि ‘बंधुंनो’ या दोन शब्दांनी परिषदेत उपस्थित असलेल्या सार्यांची मनं विवेकानंदांनी जिंकून घेतली!
हिंदू धर्मात शिकवण दिली जाते ती सहिष्णुतेची आणि सर्वांच्या मताला मान देण्याची म्हणजे अर्थातच विश्वबंधुत्वाची. हे विश्वबंधुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर या जगातला प्रत्येकजण, मग तो कोणत्याही देशाचा असो वा कोणत्याही धर्माचा असो, माझा बांधव आहे ही भावना उराशी बाळगून त्याप्रमाणे प्रत्येकाशी केलं जाणारं वर्तन म्हणजे विश्वबंधुत्व!
हिंदू धर्मातली ही विश्वबंधुत्वाची संकल्पना विवेकानंदांनी आपल्या भाषणातून प्रकर्षाने मांडली. प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या रोमारोमात सहिष्णुता भिनलेली आहे.
प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या विचारातून आणि दैनंदिन आचरणातून दर्शन घडतं ते या सहिष्णुतेचंच! ही बाब स्वामीजींनी विविध उदाहरणांद्वारे परिषदेत उपस्थित असलेल्यांच्या निदर्शनास आणून दिली. भारतात जगातल्या विविध धर्मांचे लोक काही ना काही कारणाने आले. त्या सर्वांना उदारपणे इथे आश्रय दिला तो सहिष्णू वृत्तीच्या हिंदूंनीच! सहिष्णूतेची किंवा विश्वबंधुत्वाची संकल्पना ही हिंदू धर्माच्या किंवा प्राचीन वैदिक धर्माच्या उदयापासून या देशात अस्तित्वात आहे. याच संकल्पनेचा पुनरुच्चार संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानातून केला होता. भगवान बुद्धांनीही ‘विश्वबंधुत्वा’च्या संकल्पनेचा पुरस्कार आपल्या शिकवणुकीतून केला होता.
धर्मांतराची गरज नाही
शिकागोच्या सर्वधर्म परिषदेव्यतिरिक्त एरवीही स्वामी विवेकानंद ‘विश्वबंधुत्वा’ची संकल्पना वेगवेगळ्या पद्धतींनी सांगत. हिंदू धर्मीयांच्या अवतारवादाच्या सिद्धांतातून स्वामीजी हीच गोष्ट कशी सांगतात ते पाहा. स्वामी विवेकानंद सांगत, “ईश्वर पुनःपुन्हा अवतार घेत असतो. राम, कृष्ण, बुद्ध यांच्या रूपाने ईश्वरानं जन्म घेतला होता आणि नंतर तो पुन्हा एका वेगळ्या अवताराच्या रूपात जन्म घेईल. जग दर 500 वर्षांनी अधोगतीला जाते. त्यानंतर एक प्रचंड अशी अध्यात्मिक लाट येत असते. त्या लाटेच्या अग्रभागी पूर्णत्व प्राप्त करून घेतलेली एखादी व्यक्ती असते. अशा पूर्णत्व प्राप्त झालेल्या व्यक्ती प्रत्येक धर्मात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच हिंदू धर्म कोणत्याही अन्य धर्माचा द्वेष करीत नाही.”
निरनिराळे धर्म म्हणजे शेवटी आहेत तरी काय? यासंबंधी विवेकानंद म्हणतात, “जगातील निरनिराळे धर्म म्हणजे नाना रुचींच्या नर-नारींसाठी नाना अवस्थांमधून त्या एकाच ईश्वराकडे जाण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. प्रत्येक धर्माचा उद्देश देहबोधाला ब्रह्मबोधात परिवर्तित करणे हाच आहे आणि त्या एकाच ईश्वराने समस्त धर्ममार्ग उत्पन्न केले आहेत.
विश्वबंधुत्वाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कुणीही आपला धर्म बदलून दुसर्या धर्मात जाण्याची अजिबात आवश्यकता नाही,” असं विवेकानंद म्हणत. ते म्हणत, “ख्रिस्ती माणसाला हिंदू वा बौद्ध व्हावयास नको आणि हिंदू वा बौद्धालाही ख्रिश्चन बनण्याचं प्रयोजन नाही. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे आचरण केलं तर ‘विश्वबंधुत्वा’ची संकल्पना आपोआप प्रत्यक्षात उतरेल,” हे सांगताना विवेकानंद म्हणत, “प्रत्येकाने स्वत:चे वैशिष्ट्य कायम राखून इतर धर्मातला सारभाग ग्रहण केला पाहिजे आणि त्याद्वारे पुष्ट होऊन स्वत:च्या प्रकृतीनुसार वाढत गेले पाहिजे.” आपलाच धर्म जीवंत राहून इतर धर्म नष्ट होतील, अशा स्वरुपाची मनोराज्यं करणार्यांची विवेकानंद कीव करत. ते म्हणतात, “संघर्ष नको, परस्परांना साहाय्य करा. आत्मसात करा, विनाश करू नका. कलह नको तर मैत्री हवी, शांतता हवी.”
सुमारे 700 कोटी लोकसंख्या असलेल्या या जगावर यापूर्वी अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या. आजही अशा आपत्ती येत आहेत. कोरोनासारखी भयानक आपत्ती तर आज आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत! यापुढेही या जगावर नैसर्गिक आपत्ती येणार आहेत. पर्यावरणाचा असमतोल, दुष्काळ, पाणीटंचाई, प्रदूषण, उपासमार, रोगराई, वादळे, भूकंप अशा विविध आपत्तींना आज सारी मानवजात तोंड देत आहे. त्याचबरोबर हरवत चाललेलं मन:स्वास्थ्य, आपसातली जीवघेणी स्पर्धा, परस्परांविषयीचा मत्सर व द्वेष, भ्रष्टाचार, अनारोग्य, अस्वच्छता अशा अनेक गोष्टींना जगातल्या प्रत्येकाला आज सामोरे जावे लागत आहे.
असं म्हणतात की, मानवाची आयुर्मर्यादा आज वाढली आहे. ही गोष्ट नक्कीच सुखावह आहे! पण या वाढलेल्या आयुर्मर्यादेतला कितीतरी भाग आपण विविध समस्यांशी संघर्ष करण्यातच खर्च करत असतो. या आयुर्मर्यादेतून सुखाचे असे फारच थोडे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. सुखाचे हे क्षण अधिकाधिक प्रमाणात आपल्याला प्राप्त व्हावेत असं जर वाटत असेल, तर जगातल्या प्रत्येकानं सहिष्णू वृत्तीनं, म्हणजेच पर्यायानं विश्वबंधुत्वाच्या भावनेनं आपलं दैनंदिन आचरण केलं पाहिजे.
स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, आम्हाला माणूस घडविणारा धर्म हवा आहे. आपल्याला ‘माणसे’ हवी आहेत आणि ती जितकी अधिक मिळतील तितके चांगले!
See translation

No comments:

Post a Comment