Total Pageviews

Friday, 30 April 2021

कम्युनिस्ट दहशतवादाचा क्रूर चेहरा-tarun bharat-Tarun vijay- 25 APR21

 जगात कम्युनिस्ट विचारसरणीव्यतिरिक्त एवढी क्रूर, भयंकर आणि अमानुष विचारसरणी दुसरी कुठलीही नसेल. जर जिहाद आणि क्रूसेड (धर्मयुद्ध) या विषयांचे अवलोकन केले तर असे दिसते की, गेल्या अनेक शतकांत मध्यपूर्व आणि युरोपात कोट्यवधी लोक क्रूसेड अथवा इस्लामी जिहादमध्ये मारले गेले आहेत. मात्र, साम्यवाद, जी ख्रिश्‍चन आणि इस्लामिक विचारसरणीप्रमाणेच सेमेटिक विचारसरणी आहे, त्या विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन स्टॅलिन आणि माओ जे दौंगच्या कार्यकाळात दहा कोटींहून अधिक लोकांना क्रूरपणे ठार करण्याचा विक्रम नोंदविला. एवढेच नव्हे, तर कंबोडियाचे कम्युनिस्ट शासक राष्ट्रपती पोल पोट यांनी आपल्याच देशातील एक चतुर्थांश लोकसंख्येचे अत्यंत क्रूरपणे शिरकाण केले; अर्थात त्यांना अमानुषपणे जगातून नाहीसे केले. ज्या लोकांनी कम्युनिस्ट विचारसरणी मानण्यास नकार दिला त्या लोकांना पोल पोटने वर्षानुवर्षे हाल हाल करून ठार केले की ज्याच्यापुढे क्रूर चंगेझ खान आणि मंगोल शासकदेखील फिके पडतील.

भारतात १९२५ मध्ये दोन भिन्न विचारसरणी संघटनात्मक स्वरूपात पुढे आल्या. एक कम्युनिस्ट पार्टी जी मार्क्स आणि लेनिनच्या आदर्शांनी प्रेरित होऊन येथे स्थापित झाली आणि दुसरी संघटना होती डॉ. केशव बळीराम हेडगेवार द्वारा स्थापित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. एकेकाळी कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव पंजाबपासून बंगाल आणि त्रिपुरापासून केरळपर्यंत अनेक राज्यांत होता आणि त्यांच्या खासदार व आमदारांची संख्या शंभरपेक्षा अधिक झाली होती. मात्र, हळूहळू खासकरून सोव्हिएट संघाच्या विघटनानंतर भारतात कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव झपाट्याने ओसरला. ती विचारसरणी कालबाह्य झाली आणि आता केरळ व बंगालच्या काही मर्यादित क्षेत्रातच तिचा प्रभाव आहे.
मात्र, आजही कम्युनिस्ट विचारसरणी पत्रकारिता, लेखन, विद्यार्थी, राजकीय क्षेत्र तसेच नक्षलवादी आणि माओवादी हिंसाचार आणि बंडखोर संघटनांच्या स्वरूपात अराजकता फैलविण्यात सक्रिय आहे. तुलनात्मकदृष्ट्या पाहायचे झाल्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याची स्थापना १९२५ मध्ये भारतात झाली, तो आज भारताच्या नवीन अजेंडाची निर्मिती करीत आहे आणि दोन पंतप्रधान असे आहेत की, जे संघाच्या मुशीत घडलेले व संघाचे प्रचारक राहिलेले आहेत. या दोन विचारसरणींमधील प्रचंड अंतर हेच दर्शविते की, कुणाची भारताविषयी खरोखरच भक्ती, निष्ठा व आस्था आहे.
३ एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बिजापूर भागात कम्युनिस्ट विचारसरणीला मानणार्‍या माओवाद्यांनी २२ सुरक्षा जवानांची जी क्रूरपणे हत्या केली, ती काही नवीन घटना नाही. वस्तुस्थिती ही आहे की, गेल्या चार दशकांपेक्षाही अधिक काळापासून कम्युनिस्ट विचारसरणीला मानणारे नक्षलवादी आणि माओवादी भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक धोकादायक ठरत आहेत. १९६० च्या दशकात नक्षलवादाचा बंगालमध्ये प्रारंभ झाला. त्यावेळी ‘चीनचा राष्ट्राध्यक्ष तोच आमचा राष्ट्राध्यक्ष’ असे नारे बंगालमध्ये देण्यात येत होते. तसेच बंगालच्या गल्ल्या-गल्ल्यांमधील भिंती याच नार्‍याने रंगविण्यात येत होत्या. त्यावेळी कॉंग्रेसचे सिद्धार्थ शंकर राय मुख्यमंत्री होते. त्यांनी अतिशय कठोरपणे नक्षलवाद संपुष्टात आणला. तो बंगालमध्ये भलेही निष्प्रभ ठरला असेल, पण उर्वरित देशात कम्युनिस्ट विचारसरणीच्या २६ पेक्षा अधिक संघटना कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे उदयास आल्या. यातील सर्वात मोठी संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) आहे. या संघटनेची स्थापना २१ सप्टेंबर २००४ रोजी झाली. यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी, लेनिनवादी), पीपल्स वॉर ग्रुप आणि माओवादी कम्युनिस्ट सेेंटर ऑफ इंडिया (एमसीसी) या दोन संघटना सहभागी झाल्या. तेव्हापासून आजपर्यंत माओवाद्यांनी १२ हजारांहून अधिक भारतीय नागरिक आणि सुरक्षा जवानांची अतिशय क्रूरपणे हत्या केली आहे. यात सुरक्षा सैनिकांचा आकडाच २७०० पेक्षा अधिक आहे.
गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९३०० हून अधिक ज्या नागरिकांची माओवादी नक्षलवादी कम्युनिस्ट दहशतवाद्यांनी हत्या केली आहे, ती माओ आणि पोल पोट यांच्या विचारसरणीनुसार अतिशय क्रूरपणे करण्यात आली. म्हणजेच माओ व पोलचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून अतिशय निष्ठुरपणे लोकांना ठार मारण्यात आले. लहान-लहान मुलांसमोरच त्यांच्या आई-वडिलांना मारणे, आई-वडिलांसमोरच त्यांच्या बारा, तेरा, चौदा वर्षांच्या मुलांचे जबरदस्तीने अपहरण करणे आणि आपल्या माओवादी विद्रोही गटात सामील करून त्यांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देणे इत्यादी प्रकार माओवादी नेहमीच करीत असतात. जे आईवडील आपल्या मुलांना नक्षलवादी चळवळीत पाठविण्यास नकार देत होते, त्यांचे त्यांच्या मुलांसमोरच कुर्‍हाड अथवा चाकूने हात-पाय कापून तडफडत मारण्याची अनेक उदाहरणे या नक्षलवाद्यांनी प्रस्तुत केली आहेत. संबंधित (नक्षलग्रस्त) क्षेत्रात प्रचंड दहशत पसरविणे आणि भविष्यात पुन्हा आपल्या मुलांना माओवाद्यांच्या हवाली करण्यास कुणी नकार देऊ नये, या एकमेव उद्देशाने हे असले भयंकर प्रकार नक्षलवादी करतात.
छत्तीसगडमध्ये जवळपास १२ वसतिगृहे अशी आहेत की, ज्यातील मुलांच्या आई-वडिलांना माओवाद्यांनी, नक्षलवाद्यांनी ठार मारले आहे. या अनाथ झालेल्या मुलांचे पालनपोषण सरकारच्या मदतीने वसतिगृहांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नक्षलवादी चळवळीत सहभागी झालेल्या युवती, महिलांचे हे माओवादी अतिशय क्रूरपणे लैंगिक व अन्य प्रकारे शोषण करतात, हे अंगावर शहारे आणणारे वास्तव समोर आले आहे. माओवादी हिंसाचाराचे बळी ठरलेल्या शेकडो पीडित मुलांकडे अद्याप राष्ट्रीय माध्यमांचे लक्ष गेलेले नाही. कारण, दुर्दैवाने भारतीय पत्रकारितेमधील एका मोठ्या गटाची माओवादी-नक्षलवादी अर्थात कम्युनिस्ट दहशतवाद्यांना सहानुभूती आहे. या पत्रकारांच्या मते माओवाद्यांचा संघर्ष गरिबांसाठी आहे. ते गरिबीविरुद्ध लढा देत आहेत. सर्वहारांची सत्ता आणण्याचे या लोकांचे स्वप्न आहे. सुरक्षा दलांवरील हल्ले हा कधी माध्यमांच्या चिंतेचा विषय झाला नाही.
त्यांचे बलिदान नेहमीचीच बाब मानण्यात आली. गृह मंत्रालयाने ज्या कम्युनिस्ट दहशतवादाला आपल्या संकेतस्थळावर वामपंथी दहशतवाद जरी संबोधले असले, तरी त्याचा उल्लेख सरळ सरळ कम्युनिस्ट दहशतवाद असाच करायला हवा. ‘लेफ्ट विंग एक्स्ट्रिमिझम’ अर्थात डाव्या बाजूने झुकणारा दहशतवाद अशा शब्दांच्या जाळ्यात न अडकता याला थेट दहशतवादच संबोधले पाहिजे, असे अनेक लष्करी अधिकार्‍यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हा सरळसरळ कम्युनिस्ट विचारसरणीला मानणारा देशद्रोही भारतीयांचा दहशतवादच आहे. याच दृष्टीने याचा अंत केला पाहिजे. भारतात ११ प्रदेशातील ९० जिल्हे कम्युनिस्ट दहशतवादप्रभावी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. दरवर्षी ३ हजार कोटींपेक्षाही अधिक रक्कम कम्युनिस्ट दहशतवादाचा नायनाट करण्यात खर्च होते.
कम्युनिस्ट दहशतवाद पाकिस्तान वा चीनच्या हल्ल्यापेक्षा कमी नाही. संपूर्ण घोषित युद्धापेक्षा अधिक संख्येने भारतीय नागरिक व सुरक्षा सैनिक नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. कम्युनिस्ट दहशतवाद प्रभावित राज्यांत सुरक्षा संबंधित विविध खर्चांवर जवळजवळ ३६७ कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात येते. ३० असे जिल्हे आहेत, जेथे नक्षलवादी दहशतवाद अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे. या ३० जिल्ह्यांवरच दरवर्षी जवळजवळ ३६७ कोटींपेक्षाही अधिक रक्कम खर्च करण्यात येते. एकूण सर्व मिळून १००५ कोटी रुपये कम्युनिस्ट दहशतवादाचा सामना करण्यासाठी विविध योजनांवर खर्च करण्यात आले. यामुळे कम्युनिस्ट दहशतवाद पाकिस्तान व चीनच्या अग्रक्रमाप्रमाणेच भारताच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका आहे. अरुंधती रॉयसारख्या लेनिन नक्षलवादी हिंसाचाराला नेहमीच प्रोत्साहन देत असतात. अशांवर माओवाद्यांवर करतात तशी कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे

No comments:

Post a Comment