Total Pageviews

Tuesday, 1 December 2015

MUST READ INTOLERANCE DEBATE

सध्या संसदेत ‘असहिष्णुता’ या देशभर (विनाकारण) गाजणाऱया विषयावर वादळी चर्चा होत आहे. ज्या प्रकारे ही चर्चा होत आहे, आणि दोन्ही बाजूंकडून वाद-प्रतिवाद होत आहेत, ते ऐकले म्हणजे हा मुद्दाच किती पोकळ आहे, याची खात्री पटते. गेल्या दीड वर्षात, अर्थात भाजपाप्रणीत रालोआचे नरेंद्र मोदी सरकार निवडून आल्यानंतर देशात असहिष्णुता प्रचंड प्रमाणात वाढीस लागली असून अल्पसंख्याकांचे जिणे असहय़ झाले आहे, असा कांगावा करत पुरस्कार वापसी, सरकारवर टीका इत्यादींची झोड उठविण्यात काहीजण आघाडीवर आहेत. यात चित्रपटसृष्टीतील काही लोकप्रिय कलाकारही समाविष्ट आहेत. ही जी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे, ती केवळ सर्वसामान्य लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठीच आहे का असा संशय निर्माण होत आहे. संसदेत या विषयावर तावातावाने मते मांडण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. पण असहिष्णुतेची जी उदाहरणे देण्यात आली आणि जो तपशील सांगण्यात आला, तो पाहता इतका गदारोळ केवळ हेतुपुरस्सर आणि राजकीय कारणासाठीच उठविण्यात आला आहे, असे वाटल्यावाचून रहात नाही. देशात असहिष्णुता आहेच, असे ठामपणे सांगणाऱयांची मजल तपशील देताना मात्र, दादरी प्रकरण आणि काही लोकप्रतिनिधींची विधाने यापलीकडे जात नाही. यापैकी दादरी प्रकरण हे निषेधार्ह असले, तरी तेवढय़ावरून संपूर्ण देशात असहिष्णुता आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशीही अद्याप पूर्ण झालेली नसून ते नेमके कोणत्या कारणासाठी घडले यावर बरीच मतभिन्नता आहे. तेव्हा, न्यायालयाचा निकाल येण्याची वाट पाहणे योग्य ठरेल. चौकशीपूर्वीच साप साप म्हणून भुई थोपटल्यास नंतर असे करणाऱयांचे हसे होते, यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात चर्चवर हल्ला होऊन मोडतोड झाल्याचे वृत्त झळकले होते. यासाठी संघ परिवारच जबाबदार आहे अशी चौफेर हाकाटी मानवतेच्या ठेकेदारांनी आणि चोवीस तास बातम्यांची दुकाने चालविणाऱया वृत्तवाहिन्यांनी केली. पण नंतर हे हल्ले संघपरिवाराने नव्हे, तर अन्य अल्पसंख्याक समुदायाच्याच व्यक्तींनी घडविले होते, हे उघड झाले. संबंधित आरोपींना अटकही करण्यात आली. असे प्रसंग अनेकदा घडले आहेत. पण ही वस्तुस्थितीदेखील तितक्याच ठळकपणे लोकांपर्यंत पोहचविण्याचे धाडस आणि प्रामाणिकपणा या ठेकेदारांनी आणि वृत्तवाहिन्यांनी आजपर्यंत कधीच दाखविलेला नाही. वास्तविक हीच खरी असहिष्णुता असून सहिष्णुतेच्या स्वयंघोषित कंत्राटदारांकडून ती अनेकदा दाखविली जाते, हे दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. दुसरा मुद्दा बेजबाबदार विधानांचा. अशी विधाने करण्यात आपल्याकडे सर्वच पक्षांचे काही नेते आघाडीवर असतात. ती काही एकाच पक्षाची मक्तेदारी नाही. तसेच विविध विषयांवर अशी बेताल विधाने केली जातात. पण कथित पुरोगाम्यांना ‘त्याज्य’ असणाऱया विषयांवर ती केली, की लगेच देशाची एकता धोक्यात असल्याचा ढोल बडविण्यास सुरुवात होते. याबाबत नुकतेच घडलेले आणखी एक उदाहरण बोलके आहे. मुस्लिमांच्या भावना दुखावणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल महाराष्ट्रात एका सुप्रसिद्ध दैनिकाच्या पाच सहा कार्यालयांवर हल्ले चढविण्यात आले. त्यानंतर त्वरित या दैनिकाने जाहीर क्षमायाचना केली. असेच व्यंगचित्र हिंदू धर्माबाबत प्रसिद्ध केले गेले असते आणि मग असे हल्ले झाले असते, तर परिणाम काय झाला असता? हल्लेखोरांची संभावना असहिष्णु कशी करण्यात आली असती. प्रसिद्ध अभिनेता आमीरखानने त्याच्या पीके या चित्रपटात हिंदू देवदेवतांचे असेच व्यंगात्मक चित्रण केले आहेच. पण या देशातील बहुसंख्याकांनीही तो चित्रपट डोक्यावर घेण्याचा उदारपणा दाखविलेला आहे. मग तसाच तो अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करणाऱया संघटनांकडून का दाखविला जात नाही? ही असहिष्णुता नाही काय? सहिष्णुतेची जबाबदारी केवळ बहुसंख्याक समाजानेच स्वीकारावी, अशी अपेक्षा करणे केवळ चूकच नव्हे, तर घातक आहे. ही जबाबदारी सर्वच समाजघटकांची आहे. कोणत्या समाजाची संख्या किती, असा प्रश्न तेथे गैरलागू आहे. कारण, समाजमनात भीती निर्माण करण्याचे कार्य संख्येने थोडे असणारे लोकही करू शकतात. पण स्वतःला समाजाचे स्वयंघोषित नेते आणि मार्गदर्शक म्हणवून घेणारे विचारवंत ही बाजू लक्षातच घेत नाहीत, किंवा लक्षात आली तरी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. खरेतर या प्रवृत्तीमुळेच समाजात असहिष्णुता वाढीला लागते. संसदेत चर्चेच्या वेळी मार्क्सवादी खासदार मोहम्मद सलीम यांनी राजनाथसिंग यांचे एक कथित विधान एका नियतकालिकातून वाचून दाखविले. मोदींचे सरकार हे गेल्या आठशे वर्षातील पहिले हिंदू सरकार आहे, अशा अर्थाचे ते विधान होते. हे प्रक्षोभक आणि असहिष्णु विधान करणारा नेता देशाचा गृहमंत्री असा असू शकतो, असा सलीम यांचा सूर होता. पण ज्या नियतकालिकात ही मुलाखत प्रसिद्ध झाली आहे, त्याने आता खुलासा केला आहे. हे विधान राजनाथसिंग यांचे नसून दिवंगत विहिप नेते अशोक सिंघल यांचे आहे. ते ‘चुकून’ राजनाथसिंग यांच्या नावावर छापले गेले असे स्पष्टीकरण आता दीड वर्षांनंतर या नियतकालिकाने दिले आहे. अशा स्थितीत असहिष्णु कोण हाच प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेशी माहिती न घेता अर्धवट ज्ञानावर केवळ भावनेच्या भरात आरोप करणारे असहिष्णु नाहीत काय? ही सर्व उदाहरणे आणि प्रसंग पाहिल्यावर असहिष्णुतेचा मुद्दा धर्मनिरपेक्षतेचा कैवार घेणाऱयांकडून केवळ राजकीय हत्यार म्हणून वापरला जात आहे, असा जनतेचा समज झाल्यास तो चुकीचा म्हणता येणार नाही. धर्मभावना, मग ती बहुसंख्याकांची असो, किंवा अल्पसंख्याकांची, तिच्याशी खेळणे हे धोकादायक ठरते. हा खेळ धर्मनिरपेक्षतेच्या नावाने खेळला गेला तरी तो तितकाच घातक असतो. सर्वच संबंधितांनी याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच, काळ सध्याचा असो, की कोणताही असो, जबाबदारीने वागणे आणि बोलणे हेच श्रेयस्कर असून हा नियम सर्वांसाठीच आहे.

No comments:

Post a Comment