Total Pageviews

Friday, 18 December 2015

BAJIRAO MASTANI बाजीराव-मस्तानी पुन्हा ‘अटके’पार!

रोखठोक : बाजीराव-मस्तानी पुन्हा ‘अटके’पार! Sunday, December 13th, 2015 रोखठोक संजय राऊत बाजीराव-मस्तानी पुन्हा ‘अटके’पार! Rokhthok Ne Logo‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटानिमित्त विरोधाचा ‘पिंगा’ घालण्याचे काम सुरू आहे. बाजीराव पेशवा हा मराठी साम्राज्याचा पंतप्रधान म्हणजे पेशवा. शिवाजी हा राजा होता. बाजीराव हा शाहूंचा नोकर होता. बाजीरावाने मराठी साम्राज्य ‘अटकेपार’ नेले ते तलवारीच्या धारेवर. त्या तलवारीची मूठ व धार मस्तानी होती. बाजीराव शूर होता म्हणून ही तलवार पेलू शकला. चित्रपटाच्या निमित्ताने बाजीरावाचे शौर्य ‘अटके’पार निघाले आहे. त्याचे पाय का ओढता? शिवरायांच्या नावाने महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, पण बाजीराव पेशव्यांनी ‘मराठा’ राज्य अटकेपार नेले. हे ‘अटक’ सध्या पाकिस्तानात आहे. पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानात जाण्याचा योग आला व ‘अटक’ येथे जाऊन ती माती मस्तकी लावता येईल यासाठीच अटकला गेलो. पेशव्यांनी मराठा साम्राज्य ‘अटके’पार नेले ते तलवारीच्या जोरावर. त्या बाजीरावास महाराष्ट्राने न्याय दिला काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना जाणता राजा नीट समजला नाही व बाजीराव पेशव्यांच्या वंशजांना बाजीराव समजले नाहीत. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे त्यांच्यातील गुणदोषांसह महाराष्ट्राची होती, एका कुटुंबाची नाहीत. ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटावरून दोघांच्या वंशजांनी जी भूमिका घेतली आहे तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्‍न आहे. पण यानिमित्ताने बाजीरावाचे शौर्य व बाजीरावावर जीव ओवाळून टाकणार्‍या मस्तानीचे अमर प्रेम पुन्हा समोर आले. संजय लीला भन्साळी या हिंदी सिनेसृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शकाला बाजीरावावर एक भव्य चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली व त्याने एक योद्धा सेनापती म्हणून बाजीरावाला प्रथमच जागतिक रंगमंचावर आणले. शनिवारवाड्याच्या भिंतींची पडझड झाली. तेथे आता भग्नावशेष उरले. त्या शनिवारवाड्यातून एक महायोद्धा जगाला आव्हान देत दिल्ली, पाकिस्तान, कंदहार पादाक्रांत करीत निघाला होता व त्या योद्ध्याची प्रेमकहाणी मागे शनिवारवाड्यात अनेक यातना व विरह सहन करीत बाजीरावाची प्रेरणा बनली होती. इतिहासात बाजीरावाचे नाव आहे, पण बाजीरावाबरोबर आजही ‘मस्तानी’चे नाव घ्यावे लागते इतके ते अतूट नाते निर्माण झाले. तळपती तलवार शिवाजीराजांची आठवण सगळेच काढतात. शिवाजी शूर व थोर होते, पण बाजीरावाची तलवारही अशी काही तळपली की त्या तळपत्या तलवारीचे वर्णन करण्यास इतिहासकारांच्या लेखण्या व कल्पना कमी पडल्या. शिवाजींचे भव्य स्मारक व्हावे असे ज्यांना वाटते त्यांनी योद्धा बाजीरावाचे स्मारक व्हावे म्हणूनही शर्थ केली पाहिजे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, शिवाजी महाराज हे स्वतंत्र राजे होते, पण बाजीराव महापराक्रमी असला तरी तो शाहूंचा नोकर होता. शिवाजी ‘राजे’ म्हणून आपली धोरणे स्वत:च ठरवीत व शर्थीने ती अमलात आणीत. बाजीरावाला ते स्वातंत्र्य नव्हते. शाहू व त्यांच्या राण्या, दरबारी मानकरी यांच्या चंचल लहरी सांभाळून आज्ञेप्रमाणे त्याला स्वामीसेवा करावी लागत होती. सर रिचर्ड टेंपल याने अत्यंत मोजक्या शब्दांत बाजीरावाचे वर्णन केले ते असे- ‘‘बाजीरावाच्या हाती राज्याची सूत्रे आली तेव्हा त्याला घरातल्या व बाहेरच्या अनेक अडचणींशी झगडावे लागले. ब्राह्मणाचे विशिष्ट गुण त्याच्यात भरपूर उतरले होते. तो रूपाने देखणा, भव्य व रुबाबदार. वागण्यात प्रेमळ, भाषणात आकर्षक, बुद्धीने तल्लख व कल्पक, कमालीचा उत्साही व संकटात युक्तिबाज असल्यामुळे तो यशस्वी होत गेला. सुंदर भाषण करण्याची कला त्यास अवगत असल्यामुळे समरांगणावरील विजय-विपत्ती या दोन्ही प्रसंगी सैनिकांत तो नवा हुरूप भरत असे. अश्‍वारोहणाच्या कलेत मराठ्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते, पण त्या कसबात बाजीराव अत्यंत वरचढ होता. युद्धात चौफेर बंदुकीचा मारा होत असतानासुद्धा तो बेडरपणे सर्वांपुढे ठासून उभा राही. कष्ट करण्यात त्याला आनंद वाटे. सामान्य शिपायाचे प्रत्येक काम तो स्वत: करी. राष्ट्राभिमान अत्यंत ज्वलंत. त्यामुळे राष्ट्रासाठी तो संकटाची पर्वा करीत नसे. ब्राह्मणाचे सोवळेओवळे व जातीचा कर्मठपणा त्याच्या अंगी बिलकूल नव्हता. पहिली ब्राह्मण बायको (हयात) असताना त्याने दुसरी मुसलमान बायको केली. शिवाजीराजांचे हिंदवी स्वराज्य तसे साडेतीन जिल्ह्यांचेे, पण अरबी समुद्रापासून थेट बंगालच्या उपसागरापर्यंत बाजीरावाने मराठी सत्तेचा विस्तार केला. त्याचा सारा जन्म उन्हातान्हात व उघड्या हवेत गेला, तसाच मृत्यूही उघड्या आकाशाखाली तंबूच्या आवरणात! उघड्या हवेचा जन्मभर झालेला ताण त्याला सोसला नाही. असे मस्त जीवन वार्‍यावर उधळून देणारा बाजीराव बल्लाळ हा शाहूंचा पेशवा होऊन गेला.’’ म्हणूनच शाहू महाराज म्हणत, ‘‘मला लाखाचे सैन्य दिले तरी नको; मला बाजीराव हवा!’’ मस्तानीची प्रेरणा ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाद्वारे इतिहासाची विटंबना झाली आहे काय? यावर आता वाद घातला जात आहे. शनिवारवाड्यात लढवय्ये बाजीराव शेंडी हलवत नाचताना दाखवले हे विकृत आहे. हा मराठ्यांचा इतिहास नाही. बाजीरावाच्या आयुष्यात मस्तानीने प्रवेश केला, इतिहास बदलून गेला व मराठेशाहीचे नुकसान झाले, असे म्हणणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेऊन व मोगलांशी हातमिळवणी करूनही संभाजीराजे यांना इतिहासाने ‘धर्मवीर’ म्हणून मान्यता दिली. मग शूर बाजीरावाने मस्तानीवर प्रेम केले म्हणून त्याला दोष का देता? मस्तानीवर प्रेम हे कर्तृत्व नव्हते तर त्याची प्रेरणा होती. शौर्य हेच त्याचे कर्तृत्व होते. बाजीराव शूर होता म्हणून मस्तानीने त्याच्यावर जीव ओवाळून टाकला. ‘मस्तानी’ हे बाजीरावाचे एक अंग बनले व त्यामधून एक नवा बाजीराव निर्माण झाला. शौर्याला रंगेलपणाची किनार लाभली. पुण्यनगरीतील कोल्हेकुईने त्याच्या घोडदौडीला व तलवारबाजीला बेदरकारी आली. मस्तानीला घेऊन तो स्वारीला जाई. त्याच्या भरारीला साजेशीच त्याची ही जीवनसाथी जितकी नृत्यनिपुण तितकीच रणशूर. घोड्यावर दोघे जेव्हा दौडतात तेव्हा रिकीब मागेपुढे होत नाहीत अशी ग्वाही मिळविणारे हे स्वार. दिल्ली दरवाजावर त्यांनी धडक दिली. मराठे आले या भीतीने गांगरलेल्या मोगल बादशहाचे बारगीर टेहळणी करावयास गेले तेव्हा दिल्लीजवळच्या एका बागेत हे प्रणयी युगुल घोड्यावर बसूनच एका झाडाच्या फांद्यांशी खेळत प्रेमचेष्टा करीत असलेले त्यांना दिसले. हा प्रसंग कपोलकल्पित असेल, परंतु एका इतिहासकाराने तो वर्णिला आहे. न उलगडलेले कोडे पेशवे आणि मस्तानी हे एक न उलगडलेले कोडे. मस्तानीचे चरित्र हे तर त्याहूनही हरवलेले एक गुपित. तरी रंगलेल्या विड्याचा रस तिच्या गळ्यातून उतरताना दिसे हे या सौंदर्यसम्राज्ञीबद्दलचे वर्णन आजही प्रत्येकाच्या मुखी आहे. पहिल्या बाजीरावाच्या मनावर राज्य करणारी ही नर्तकी त्याच्या मुलाच्याच लग्नात प्रथम दिसली. नानासाहेबांच्या लग्नात ही ‘मस्तानी कलावंत’ नाचली व तिला वस्त्र व बिदागी देण्यात आली, अशी पेशवे दफ्तरात नोंद आहे. बाजीरावाने मस्तानीस शनिवारवाड्यातच महाल बांधून दिला. तिच्या येण्याने बाजीरावाच्या स्वगृही मात्र बेदिली माजली. ‘रायाच्या या यावनी कंचकी’ने शनिवारवाड्यात नवे प्रश्‍न निर्माण केले. बाजीरावाचा चिरंजीव नानासाहेब व भाऊ चिमाजी अप्पा यांनी मस्तानीशी वैर धरले. ‘इजमुळे संसर्ग घडला, इजला मारावे’ असे बोलण्यापर्यंत चिमाजी अप्पाची मजल गेली. बाजीरावाने मस्तानीला दूर ठेवून व्यवहार चालविला असता तर पुण्यातील ब्राह्मण काही उसळून उठले नसते, पण बाजीरावाने मस्तानीला चक्क घरात ठेवले व पत्नी म्हणून वागविले. ती व पुढे तिचा मुलगा समशेरबहादूर घरात वावरत. रघुनाथ, सदाशिव व तो एकत्र खेळत. मस्तानीही पुढे शुद्ध ब्राह्मणी पोशाख करी, ब्राह्मणी अन्न जेवी. बाजीरावाची पत्नी काशीबाईही तिच्याशी खेळीमेळीने वागे. वर्षातून एकदा शनिवारवाड्यातील गणेशोत्सवात देवापुढे तिचे नाचगाणे होई. ती मराठी बोले. समशेरचे वळणदार मोडी अक्षर पेशवे दफ्तरात आहे. मस्तानी व काशीबाई यांचे संबंध हा एक काव्याचा विषय होऊ शकेल. बाजीरावाच्या गैरहजेरीत मस्तानीला काशीबाईइतके जवळचे दुसरी कुणी नव्हते. कृष्णजयंतीच्या एका कार्यक्रमात मस्तानीने नृत्य केले व ते संपल्यावर ती काशीबाईच्या जवळ येऊन बसली. विश्‍वासाने, प्रेमाने व आदराने. आणि चौकशी केली एका गोष्टीची. नानासाहेबाला त्याच्या पित्याचे काही पत्र आले काय याची विचारणा तिने केली आणि खेदाने म्हणाली, ‘‘आम्हास पत्र पाठवीत नाही, आम्ही काय केले?’’ काशीबाईंची सहानुभूती होती तरी मस्तानीची नजरकैद व यातना चुकल्या नाहीत. पेशवाईचा मालक हतबल झाला. स्वत: बांधलेल्या वाड्यातून बाजीराव निघाला व पाटसला जाऊन राहिला. मग ‘पुरुषाचा डौल’ करून शनिवारवाड्यातून मस्तानी पळाली आणि हे दोन प्रेमवेडे जीव पुन्हा एकत्र आले, असे काहीजण सांगतात. साम्राज्याचा कणा unnamed (1)बाजीराव हा योद्धा होता व मराठी साम्राज्याचा ‘कणा’ होता. मस्तानी हे काही पाप नव्हते व राज्य लयास जाईल असे बाजीरावाचे वर्तन नव्हते. बाजीराव हा स्त्रीलंपट होता व त्यापायी स्वत:चा र्‍हास केला, राज्य पणास लावले असा पुरावा नाही. किंबहुना त्याच्यासारखा ‘योद्धा’ होणे नाही हेच आजही म्हटले जाते. मस्तानी ही बाजीरावाबरोबर प्रत्यक रणात गेली व बाजीरावास प्रेरणा देत राहिली. त्यामुळे मस्तानी ही बुंदेलखंडाच्या छत्रसालाचीच मुलगी हा काही इतिहासकारांचा दावा खरा वाटतो. बाजीराव-मस्तानीचे प्रेम निर्भेळ. त्यांची स्मृती तेवत ठेवणारा त्यांचा पुत्र समशेरबहाद्दर. पेशव्यांबरोबर तो अखेरपर्यंत निष्ठेने राहिला व सदाशिवराव भाऊंबरोबर अलौकिक पराक्रम गाजवून पानिपतावर ‘मराठी राज्या’साठी धारातीर्थी पडला. त्याचा मुलगा अलिबहाद्दर बुंदेलखंडात बांद्याला राहिला व ते संस्थान त्याने स्वतंत्रपणे नावारूपास आणले. त्याचा वंशज व बांद्याचा नबाब १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात झाशीच्या राणीबरोबर इंग्रजांशी अखेरपर्यंत लढला. मस्तानीची ही वंशवेल. ज्यांनी तिला ‘वेश्या’ व ‘रखेल’ ठरवले ती एक युवराज्ञी व बाजीरावाची महाराणी होती. तिने मराठी साम्राज्याच्या सेनापतीस अखेरपर्यंत रणधुरंधर ठेवले. ती रूपराणी होती त्याहीपेक्षा बाजीरावाच्या तलवारीची धार होती. जबरदस्त योद्धा माल्कम हा निराळ्या प्रकृतीचा पाताळयंत्री माणूस, पण त्यालाही इतिहासाच्या पानावर खालील शब्दांत बाजीरावाचा गौरव करावा लागला. ‘‘सन १७२० ते १७४० या काळात भारताचे भवितव्य केवळ एका व्यक्तीच्या हातात होते. ती व्यक्ती म्हणजे पहिला बाजीराव पेशवा. सतत चिकाटीने श्रम करण्याची त्याच्यात जिद्द होती. सूक्ष्म निरीक्षणाची शक्ती होती. सारासार विचार होता व अंगीकृत कार्यावर त्याची श्रद्धा होती.’’ सर जदुनाथ सरकार यांनी बाजीरावावर काय म्हटले ते पहा- ‘‘बाजीरावाच्या केवळ वीस वर्षांच्या कारकीर्दीत मराठ्यांच्या राष्ट्रसत्तेचे संपूर्ण रूपांतर झाले आणि सार्‍या भारताच्या राजकीय सत्तेची पुनर्रचना झाली. महान शिवाजीनंतर हिंदू जातीने निर्माण केलेला हा एकमेवाद्वितीय कर्मयोगी त्या अफाट परिश्रमानं झिजून गेला. कार्लाइलने कल्पिलेल्या विभूतीसारख्या या (सुपरमॅन) पुरुषोत्तमाचा जीवनपट मनन करण्यासारखा आहे.’’ मराठेशाहीच कशाला? सार्‍या मध्ययुगीन भारताचा इतिहास तपासला तरी ज्याला उभ्या जन्मात पराभव माहीत नाही व ज्याची तलवार सदा अजिंक्यच राहिली असा एकमेव सेनापती म्हणजे बाजीराव बल्लाळ – पहिला बाजीराव पेशवा! एकाच शतकातील दोन पुरुष. नेपोलियन व बाजीराव दोघेही अत्यंत रणधुरंधर. चकित करून सोडणार्‍या वेगाने लांब लांब मजला मारण्याची त्यांची ख्याती. पण बाजीरावास मराठी वाङ्मयाच्या कुंपणातच अडकवून ठेवले. त्याला जागतिक प्रसिद्धी कमी मिळाली. पुन्हा त्याची जात आडवी आली व मस्तानीचे प्रकरण त्यास चिकटवून हा महान योद्धा उपेक्षित ठेवला. हे जणू षड्यंत्रच होते. ‘मराठा साम्राज्या’च्या अनेक राजांना व भोसले कुलवतांना शेंडी नव्हती. पण त्यांनी नाचगाण्यात, मद्य सेवनात, रंगेलपणात राज्य लयास नेले. बाजीरावाने यापैकी काहीच केले नाही. त्याने मस्तानीला प्रतिष्ठा दिली व विश्‍वास दिला. ते सर्व राज्याच्या कामी आले. तरीही बाजीराव उपेक्षित! मस्तानी सती गेली! बाजीरावाचे जीवन झंझावाती होते, पण त्या झंझावातास मस्तानीच्या शृंखला पडल्या. शनिवारवाड्याच्या कटकारस्थानांत ‘मस्तानी’ कैद झाली. पर्वती बागेत ती तुरुंगात होती. तिचे लक्ष बाजीरावावरून उडावे व तिने आपण होऊन निराळे व्हावे यासाठी चिरंजीव नानासाहेब याने मस्तानीशी लगट व प्रेमाचे नाटक सुरू केले. मानव कोणत्या हीन नव्हे पशुकोटीला जाऊ शकतो हे यावरून उघड होते. मराठी इतिहासात हा किळसवाणा प्रकार घडला. या सगळ्याचा घोर नासरजंगच्या लढाईत (१७४०) बाजीरावाला लागला. मस्तानीच्या जिवाला धोका असल्याचा हृदयरोग लागल्याने या लढाईत त्याची तडफ दिसून आली नाही. तरी त्याची सरशी झालीच! रणात अजिंक्य ठरलेला, पण स्वगृही पराभूत झालेला हा मानी पेशवा उत्तरेच्या स्वारीला गेला. त्यात मराठी राज्य विस्ताराचे ध्येय होते. मस्तानी वियोगाचे दु:ख विसरण्यासाठी त्याने रणाचा मार्ग स्वीकारला. मस्तानीची व त्याची ताटातूट झाली ती कायमचीच. बाजीरावाचा आजार वाढल्याचं कळलं तेव्हा चिमाजी अप्पाचं हृदय द्रवलं व त्याने मस्तानीला त्याच्याकडे पाठवून दे असे नानासाहेबाला लिहिले. ‘रायाची वस्त्रं रायास येईल’ असे करावे असे शाहू सांगत होताच, परंतु तरीही नानाने आपल्या आईला-काशीबाईला बाजीरावाकडे पाठविले. काशीबाई तिथे गेली तेव्हा तिलाही उमगलं की, मस्तानी आल्याशिवाय बाजीराव आता उठत नाही. मस्तानीला पाठवा अशी हाक काशीबाईनेच दिली, पण आता वेळ गेली होती. नर्मदेच्या दक्षिण तीरी रावेरखेडी येथे हा पराक्रमी पेशवा वयाच्या चाळिसाव्या वर्षी निधन पावला. १८ ऑगस्ट १७०० मध्ये या वीराचा जन्म झाला व २८ एप्रिल १७४० रोजी सकाळी ११ वाजताचे हे निधन. बाजीराव गेला व मस्तानीचे जीवनही संपले. तिच्या आगमनाइतकेच तिचे निर्वाणही इतिहासाने उपेक्षित मानले, पण बाजीरावाच्या तलवारीची मूठ मस्तानी होती. बाजीरावाच्या शौर्यगाथेस मस्तानीची किनार आहे. बाजीराव गेला, मस्तानीही गेली. इथेही मस्तानीची रिकीब त्याच्या रिकिबीला जुळलेली राहिली. कुणी म्हणतात, मस्तानीने त्याच्या चितेत उडी घेतली. ती सती गेली. कुणी सांगतात, बाजीरावाच्या निधनाच्या वार्तेनेच मस्तानी शनिवारवाड्यात मृत्यू पावली. तिचे नाव सांगणार्‍या वास्तूही भुईसपाट होत चालल्या आहेत. शनिवारवाड्यात मस्तानीकरिता खास महल बाजीरावाने बांधला होता. त्या वाड्याचा मस्तानी दरवाजा तेवढा शाबूत आहे. इंग्रजी अमदानीतील किंकेड हे आयसीएस गृहस्थ मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश होते. केवळ वीस इंग्रजी शब्दांत त्याने बाजीरावाच्या मृत्यूनंतर भावना व्यक्त केल्या. त्या २० शब्दांतच त्याने बाजीरावाचे व मस्तानीचे चरित्र सांगितले. ‘‘Bravest of the brave, Fairest of the Fair, Bajirao died like a most Fascinating Figure in romance of Love.’’ (शूरांतला शूर, सुंदरातला सुंदर, अद्भुत प्रेमकथेच्या नायकासारखा बाजीराव मनाला चटका लावून उठून गेला.) बाजीरावाच्या शेंडीकडे व ‘पिंगा’ गाण्याकडे पाहण्यापेक्षा त्याच्या कर्तबगारीकडे पहा. बाजीरावाचे भव्य चरित्रच जागतिक पातळीवर जाऊ द्या. आता तरी बाजीरावाचे पाय ओढू नका - See more at: http://www.saamana.com/utsav/rokhthok-bajirao-mastani-punha-atakepar#sthash.Hetemiw3.dpuf

No comments:

Post a Comment