स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून अनेक व्याख्यांचं स्वरूप बदलायला लागलं. प्रभात फेऱ्या काढणं, राष्ट्रभक्तीपर गीतं म्हणणं, सत्याग्रह, सूतकताई, प्रसंगी ब्रिटिश सरकारच्या पोलिसांच्या लाठ्या खाणं, तुरुंगात जाणं, साधी रहाणीअबलोद्धार, अस्पृश्योद्धार इत्यादींसाठी काम करणे ही स्वातंत्र्याआधीची देशभक्ती होती. सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत.
स्वतःला विचारा, मी या देशासाठी काय करतो?
देशाला स्वातंत्र्य
मिळूनही 70 वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत.याची कारणे
अनेक आहेत. आपण साधे देशातले नियम पाळू शकत नाही. नियम मोडणे हेच आपल्याला
स्वातंत्र्य वाटते. इतर विकसित देशांची तुलना करता, त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो. पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता
आपण जाणून घेत नाही. ते वाहतुकीचे नियम पाळतात, ते नियम
मोडणार्याला, मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी त्याला शिक्षा होते, ते न चुकता कर भरतात,
सार्वजनिक ठिकाणी थुंकत नाहीत. स्थानिक प्रशासनाने जी चौकट घातली
आहे ती त्यांना बंधन वाटत नाही. आपण मात्र अगदी याच्या उलटे वागतो. येथे शांतता
राखा, असे लिहिले असेल तिथे हमखास कलकलाट असतो, `येथे थुंकू नये’ असे लिहिलेल्या
पाटीवरच लाल पिचकार्यांची रांगोळी असते, `नो पार्किंग’ची पाटी असते, तिथेच गाडय़ा
आडव्या तिडव्या लावलेल्या असतात. `कृपया रांगेची
शिस्त पाळा’ असे लिहिलेल्या ठिकाणीच झुंबड असते. येथे स्वच्छता राखा असे
लिहिलेल्या पाटीखालीच कचर्याचा डोंगर असतो. एक ना अनेक, म्हणजे नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशी आपली धारणा असते.
आजकाल
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे देशातले सगळ्यात मोठे स्वातंत्र्य असल्याचा समज समाज
माध्यमांनी पसरविला आहे आणि हे स्वातंत्र्य दाबले जाते आहे म्हणून ओरडाही केला जात
आहे. गेल्या 4-5 वर्षात वर्तमानपत्रांमध्ये एखादा विषय जितका चर्चिला जात नाही,तितका टीव्ही चॅनेल्स आणि या समाज
माध्यमांमध्ये चर्चिला जात आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप अशा माध्यमातून एक मोठा
वर्ग व्यक्त होत आहे. यात विषयाचे बंधन नाही. दहशतवादी बुर्हाण वाणीपासून ते एखादा चित्रपट
सेन्सॉरने संमत करावा की नाही, इथपर्यंत. म्हणजे
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मी काहीही लिहू शकतो, बोलू शकतो, याला जर कुणी अटकाव करण्याचा
प्रयत्न केला तर आहेच पुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याची ओरड.
या
सगळ्यात आजची तरुणाई काही वेगळा विचार करते आहे का? देशावर त्यांचे प्रेम आहे पण ते
फक्त स्वातंत्र्य दिन किंवा 26 जानेवारीलाच उफाळून येते. एरव्ही मी, माझे करिअर, माझी नोकरी, माझी प्रेयसी यातच ही तरुणाई बुडालेली
असते. म्हणूनच प्रत्येकाने विचार केला पाहिजे, की मी या देशासाठी काय करतो?
No comments:
Post a Comment