युद्ध आणि संघर्षाच्या परिस्थितीत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव जनरल बिपीन रावत यांच्याकडे होता. सैनिकाने सैनिकासारखे काम करून देशाला सुरक्षित ठेवले पाहिजे, या सिद्धांतानुसार जनरल रावत सदैव कार्यरत राहिले. गेल्या काही वर्षांत भारताने पाकिस्तान आणि चीनला आक्रमकपणाने आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे, त्यामागची रणनीती आखण्यामध्ये जनरल रावत यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी पाहिलेले लष्करी आधुनिकीकरणाचे स्वप्न गतिमानतेने पूर्ण करणे गरजेचे आहे.
भारतीय संरक्षण दलाच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली एक मोठी दुर्घटना नुकतीच घडली. तामिळनाडूतील कुन्नूरजवळील घनदाट जंगलामध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात भारतीय संरक्षण दलाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. जनरल बिपीन रावत हे शूर सेनानी होते. त्यांच्या पत्नी मधुलिका सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्या होत्या.
2016 मध्ये जनरल रावत लष्करप्रमुख झाले, तेव्हा मधुलिका यांना आर्मी वूमन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारण्याची संधी मिळाली होती. त्या काळात त्यांनी कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यासह अनेक सामाजिक कामे केली. जनरल रावत यांच्या मृत्यूने देशाचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. परंतु, सैन्याची परंपरा आहे की, जेव्हा एक अधिकारी जातो, त्यावेळी लगेच दुसर्याला आणले जाते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेमध्ये काही कमतरता राहणार नाही. कोणाच्या मनात काही शंका नको.
स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांनंतर ‘सीडीएस’ हे पद आपण निर्माण केेले होते आणि जनरल बिपीन रावत हे भारताचे पहिले ‘सीडीएस’ होते. साहजिकच, अशा नेतृत्वस्थानी असणार्या व्यक्तीच्या निधनामुळे फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जनरल रावत यांच्या घराण्यात लष्करी सेवेची परंपरा आहे. त्यांचे वडील लक्ष्मणसिंह रावत हे सैन्यात लेफ्टनंट जनरल म्हणून कार्यरत होते.
लष्कराच्या उपप्रमुख पदावरून ते निवृत्त झाले. त्यांनी 111 गुरखा रायफलला कमांड केले होते. जनरल रावत यांनीसुद्धा आपल्या वडिलांच्या रेजिमेंटमध्ये प्रवेश केला होता. 1978 मध्ये त्यांनी भारतीय सैन्यात कमिशन ऑफिसर म्हणून प्रवेश केला. सैनिकी प्रशिक्षणादरम्यान त्यांना ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ हा सर्वात मोठा पुरस्कार मिळाला होता.
नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अर्थात ‘एनडीए’मध्ये प्रथम क्रमांक पटकावणार्याला हा पुरस्कार दिला जातो. जनरल रावत यांनी तिथपासूनच आपल्यातील लष्करी गुणांचे दर्शन घडवण्यास सुरुवात केली होती. सैन्यासाठीच्या सर्वच परीक्षा चांगल्या गुणांनी त्यांनी पार केल्या. ‘स्टॉप कॉलेज’ या महत्त्वाच्या परीक्षेत ते पहिले आले होते. अमेरिकेतील पोर्ट लिव्हनबर्ग येथून त्यांनी जनरल स्टाफचा कोर्स पूर्ण केला होता. अपघात झाला तेव्हा ते वेलिंग्टनमधील स्टाफ कॉलेजला लेक्चर देण्यासाठी जात होते. मीसुद्धा काही वर्षांपूर्वी तेथे होतो.
या महाविद्यालयात मेजर, जनरल, लेफ्टनंट दर्जाचे सुमारे 350 अधिकारी आणि 70 देशांतील लष्करी अधिकारी असतात. यात अमेरिका आणि रशियाचाही समावेश आहे. विदेशातील अधिकार्यांना आपल्या युद्धाभ्यासाविषयी कौतुक वाटते. कारण, भारतीय सैन्याला जितका अनुभव आहे तितका इतर कुठल्याही देशाला नाही. वाळंवट असो, बर्फाळ प्रदेश असो, जंगल असो अशा वेगवेगळ्या युद्धभूमीमध्ये लढण्यात भारतीय सैन्य माहीर आहे. जनरल बिपीन रावत यांनी हा कोर्स परदेशात केला होता.
युद्ध आणि संघर्षाच्या परिस्थितीत काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव जनरल रावत यांच्या गाठीशी होता. त्यांनी आफ्रिकेतील काँगो देशात संयुक्त राष्ट्र संघाच्या बहुराष्ट्रीय सेनेचेही नेतृत्व केले होते. काश्मीर खोर्यामध्ये प्रचंड हिंसाचार होत होता, तेव्हा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी एका सेक्टरचे नेतृत्व केले आणि त्यातही त्यांना खूप यश मिळाले होते. जिथे जिथे सुरक्षेची मोठी आव्हाने होती मग ते काश्मीर असो, लडाख असो, भारत-चीन सीमा असो, त्यांनी सगळीकडे उत्कृष्टरीत्या काम केले. यासाठी त्यांना शौर्याचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले. ईशान्य भारतात ते कोअर कमांडरही होते. त्यांच्या या देदीप्यमान, साहसी कारकिर्दीची दखल घेत 2020 मध्ये भारताचे पहिले ‘सीडीएस’ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
आज देशामध्ये अनेक मानवाधिकार कार्यकर्ते आहेत, जे काश्मीरमध्ये, ईशान्य भारतामध्ये उंटावरून शेळ्या हाकत सैन्याला नको तो उपदेश देत असतात. परंतु, जनरल रावत यांनी कोणाचीही पर्वा केली नाही. दहशतवादी आणि त्यांचे समर्थक यांच्याविरुद्ध त्यांनी कडक कारवाई केली. त्यामुळे तथाकथित विद्वानांनी त्यांच्यावर टीकाही केली. परंतु, त्यांनी जे काम केले ते निर्विवादपणे देशहितैषी होते. एका सैनिकाने सैनिकासारखे काम करून देशाला सुरक्षित ठेवले पाहिजे, या सिद्धांतानुसार जनरल रावत सदैव कार्यरत राहिले.
गेल्या काही वर्षांत भारताने पाकिस्तान आणि चीनला आक्रमकपणाने आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे, त्यामागची रणनीती आखण्यामध्ये जनरल रावत यांचा मोलाचा वाटा होता. जनरल रावत यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी सातत्याने आग्रह धरला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज राफेलसारखी लढाऊ विमाने भारतीय वायुदलात सामील झाली. थिएटर कमांड हेदेखील त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचे पाऊल. लष्कराच्या सर्व यंत्रणांमध्ये एकसूत्रीपणा, समन्वय आणण्यासाठी ते शेवटपर्यंत झटत राहिले.
अशा या कर्तबगार, शूर, जाँबाज आणि लष्करी रणनीतीकार व्यक्तीचे अपघातात निधन होणे, ही बाब निश्चितच धक्कादायक आहे. दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स मिळाला असून, त्यातून या दुर्घटनेची मूळ कारणे काय आहेत ते यथावकाश समोर येईलच; पण तत्पूर्वी हा घातपात नाही ना, असा प्रश्न समाजातील सर्वच स्तरांतून विचारला जाऊ लागला आहे. येणार्या काळामध्ये या अंगानेही चौकशी केली जाईल आणि हा अपघात कशामुळे झाला, हे समोर येईल.
ही दुर्घटना हेलिकॉप्टरचे कार्यान्वयन स्थगित झाल्यामुळे घडली की, एखादा मोठा पक्षी धडकल्यामुळे घडली की, हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला की, धुकट हवामानामुळे दृश्यमानता कमी होऊन पायलटच्या हातून काही चूक घडली, यावरून जितक्या लवकर पडदा उठेल तितक्या लवकर घातपाताच्या शक्यता मावळत जातील. ही दुर्घटना घातपात असण्याची शक्यता पूर्णतः नाकारणे आजघडीला चुकीचे ठरेल.
याचे कारण चीन आणि पाकिस्तान हे भारताचे शत्रू आणि त्यांना सामील असणारे भारतातील त्यांचे पाठीराखे कोणत्याही स्तराला जाऊन देशाला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे हे घडवून आणलेले षड्यंत्र नाही ना, याची खातरजमा झालीच पाहिजे. विशेषतः, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा संपन्न होत असतानाच हा अपघात घडणे, हे निश्चितच चिंताजनक आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, चीन हा देश काहीही करू शकतो.
सायबर वॉरचा वापर करून हेलिकॉप्टर कोसळवले जाऊ शकते का, असा प्रश्न कुणी विचारल्यास त्याचे उत्तर तंत्रज्ञानातील प्रगती आणि त्याचा विघातक वापर करण्यात निष्णात असलेला चीन यांच्याकडे पाहून होकारार्थी द्यावे लागेल. सायबर तंत्रज्ञानच नव्हे, तर हेलिकॉप्टरच्या रोटरचे स्क्रू ढिले करणे, त्यातील सिस्टीम बंद पाडणे अशा एक ना अनेक कोणत्याही मार्गाने काहीही केले जाऊ शकते. त्यामुळे घातपाताच्या दृष्टिकोनातूनही या दुर्घटनेचा तपास व्हायलाच हवा.
घातपाताच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मी ठामपणाने म्हणत आहे याला एक कारण म्हणजे, इतिहासात डोकावले असता काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचे प्रमुख जनरल झिया उल हक यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचे निधन झाले होते. त्यावेळी बराच तपास झाल्यानंतर असे पुढे आले होते की, त्या विमानाचा अपघात अमेरिकेची गुप्तहेर संस्था ‘सीआयए’ने केला होता. त्यामुळे भारताच्या संसदेवर, देशाच्या आर्थिक राजधानीवर हल्ला करण्यापर्यंत मजल मारणार्या आपल्या शत्रूंकडून वेगळ्या रणनीतीचा वापर करून हा घातपात घडवला नसेल ना, याचा तपास करण्यात गैर काहीच नाही.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, येणार्या काळात तातडीने जनरल रावत यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या ‘सीडीएस’ पदावर दुसर्या सक्षम अधिकार्याची नियुक्ती करावी लागेल. दीर्घकाळ हे पद रिक्त ठेवले जाता कामा नये. कारण, आज देशापुढील सुरक्षेची आव्हाने अत्यंत बिकट बनली आहेत. संभाव्य धोके लक्षात घेऊनच ‘सीडीएस’ हे पद तयार करून त्या पदावर जनरल रावत यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आजवर आपल्याकडे वायुदल, नौदल आणि भूदल हे वेगवेगळ्या जबाबदार्या पार पाडत असत. लढाईच्या काळात या तिन्ही दलांनी एकत्र काम केले पाहिजे, हा ‘सीडीएस’च्या स्थापनेमागचा मुख्य हेतू होता. कारण, स्वतंत्ररीत्या लढल्यामुळे देशाच्या संसाधनांचा योग्य वापर होत नाही. 1971 ची बांगला देशमुक्तीची लढाई फिल्ड मार्शल सॅम माणिकशॉ यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितरीत्या लढली गेली होती. त्यातील विजय किती मोठा होता, हे जगाने पाहिले. त्यामुळे ‘सीडीएस’चे पद तत्काळ भरले जाणे आवश्यक आहे.
जनरल रावत यांनी ‘सीडीएस’पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर लष्करी आधुनिकीकरणासह अन्य अनेक सुधारणांवर भर दिला होता. यामध्ये शस्त्रास्त्रांसाठी लागणारा खर्च कमी करणे, व्यवस्थापन एकत्रितरीत्या करणे इथपासून ते रणनीती एकत्रपणाने आखणे इथवर सर्वच कामांचा समावेश होता.
ते या जबाबदार्या अत्यंत काटेकोरपणाने पार पाडत होते आणि त्याचे सुपरिणामही दिसू लागले होते. पुढच्या काही वर्षांमध्ये थिएटर कमांड तयार होतील आणि भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत बनेल, अशी अपेक्षा करूया. किंबहुना, जनरल रावत यांनी पाहिलेले हे स्वप्न पूर्ण करणे हीच खर्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल
No comments:
Post a Comment