"...बोलावं की बोलू नये, या संभ्रमात आहे मी . हा संभ्रम आजचा नाही, तो गेल्या कित्येक वर्षांचा आहे, आणि तो माझा एकट्याचा नाही माझ्यासारख्या असंख्य आत्म्यांचा आहे . आज अगदी असह्य झालं म्हणून तुमच्यासमोर तोंड उघडतोय मी. असं काही बोलणं हे आमच्या लष्करी शिस्तीत बसणारं नाही, लष्करी नियमात लिहिलेलं नाही, तरीही मी बोलतोय. धाडस करतोय. कारण हे कुणी तरी बोलायला हवंच आहे, तुम्हाला सांगायलाच हवं आहे , ती वेळ आत्ता आली आहे, कारण तुम्ही सगळे हिंदुस्थानी तुमच्या हातातल्या स्मार्ट फोनवर 'लष्करी दिनाच्या ' शुभेच्छा एकमेकांना देत असाल, चित्रं एकमेकांना पाठवत असाल , तुमचं राष्ट्र प्रेम स्मार्टफोनवर अगदी उफाळून आलं असेल, म्हणून मला वाटलं हीच वेळ आहे सर्व काही सांगण्याची. हीच वेळ आहे मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची.
... मनात संतापाचा ज्वालामुखी केव्हाचा धुमसतो आहे .
जखमा भळभळत आहेत.
मीच एकटा नव्हे, शहीद झालेले आम्ही सगळे जवान, हिंदुस्थानच्या सीमांवर शापग्रस्त असल्यासारखे , आसमंतात भटकत आहोत .
वाळवंटात , बर्फाच्छादित डोंगर, कडेकपाऱ्यात , भयंकर जंगलात जिथे जिथे म्हणून हिंदुस्थानच्या सीमा आहेत, तिथे तिथे आम्ही सगळे अस्वस्थ आत्मे भटकत आहोत...
शोधत आहोत , कुठे आहेत आमच्या हिंदुस्थानातील सुजाण नागरिक ?
कुठे आहेत संवेदनशील , जबाबदार नागरिक ?
कुठे आहेत कळवळा येणारे, उसासे टाकणारे नागरिक ?
प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला , प्रत्येक लष्करी दिनाला आम्ही अस्वस्थ होऊन शोधीत असतो , तुमच्यातील राष्ट्रभक्त , तुमच्यातील विवेकशील , पथदर्शी स्वातंत्र्यप्रेमी ...
शोधीत असतो आम्हाला राख्या पाठवणाऱ्या आमच्या भगिनी...
शोधीत असतो आमच्यासाठी मेणबत्त्या लावून स्मरण करणारे विद्यार्थी ...
शोधीत असतो आठवणीने आमच्यासाठी आसवं सांडणारे आमचे देशबांधव...
शोधत असतो आम्ही...
अश्वत्थाम्यासारखी भळभळती जखम घेऊन वाऱ्यावर हिंडत असतो.
आमच्या जखमेत कसलंही तेल नकोय, आम्हाला तो स्यमंतक मणीसुद्धा नकोय .
कसलाही स्वार्थ नाहीय आमच्या मनात.
नकोत आम्हाला शौर्य पुरस्कार
नकोत आम्हाला मानमरातब
नकोय आम्हाला एखादा जमिनीचा तुकडा कुणीतरी त्याच्या मोठेपणासाठी दिलेला
नकोय पेन्शन, नकोय कँटीन, नकोत आमचे पुतळे , वा स्मरणार्थ बांधलेले तथाकथित सगळे सोपस्कार
नकोत तिरंग्यात लपेटून मिळणारे मानसन्मान
नकोत त्या बंदुकीच्या फैरींचे कौतुक सोहळे
नकोत आमच्या कुटुंबियांना तुमचे बेगडी सांत्वन आणि पूर्णत्वाला न जाणारं आश्वासन
नकोच ते सर्व काही
नकोच ...
आम्ही सीमेवर तुमच्यासाठी रक्त सांडतो
आम्ही तुमच्यासाठी बलिदान करतो
मिळेल ते खातो, नाही मिळाले एखाद्या दिवशी तर कसली तक्रारच नसते आमची...
पुरेशी झोप मिळो न मिळो
पुरेशी जागा, आराम, विश्रांती मिळो न मिळो
वर्षानुवर्षे कुटुंबियांना , आमच्या तान्हुल्याना भेटायला मिळो न मिळो
सगळे सण समारंभ, वाढदिवस आणि काय काय असणारं सगळं सांस्कृतिक, मिळो न मिळो...
आमची तक्रारच नाही कसली !
देहात , मनात , रक्तात केवळ एकच तीव्र जाणीव असते...
हिंदुस्थानचं संरक्षण !
तुम्हा सर्व देशवासीयांचं संरक्षण !
हिंदुस्थानातील सर्व मानबिंदूंचं संरक्षण !
प्रथा, परंपरा, संस्कृती , ज्ञानविज्ञान आणि आपल्या परमप्रिय हिंदुस्थानच्या नकाशाचं संरक्षण !
यासाठीच तर आम्ही वसा घेतलाय, यासाठीच तर देहत्यागाची तयारी ठेवलीय , यासाठीच तर लौकिक सुखोपभोगावर लाथ मारून अलौकिक असं मातृभूचं संरक्षण करण्याचं व्रत घेतलंय ...
त्यापुढे आम्हाला पडणारे कष्ट, खडतर जीवन हे काहीच नाही...
पण...
तुम्हा पैकी अनेकांच्या वर्तनांनं आम्हाला खेद होतोय, लाज वाटतेय आणि आतून संतापून जायला होतंय...
आम्ही जवान सीमेवर रक्त सांडतोय आणि तुम्ही ...?
तुम्ही एकमेकांचं रक्त सांडताय , माताभगिनींची अब्रू लुटताय,
प्राणापलीकडे आम्ही हिंदुस्थानच संरक्षण करतोय आणि तुम्ही क्षुल्लक कारणावरून देशाच्या अमूल्य संपत्तीचं नुकसान करताय, विध्वंस करताय, जाळपोळ, दंगेधोपे करताय...
आम्ही इथे खांद्याला खांदा लावून युद्ध करताना शेजारी कोण आहे त्याची जात विचारत नाही, धर्म विचारत नाही, शिक्षण विचारत नाही, तो नेहमीच सैनिक नावाच्या जातीचा, रक्ताचा, धर्माचा असंच आम्ही मानतो आणि तुम्ही...
जातपातधर्म यावरून भांडताय, समाजात दुही पेरताय, महापुरुषांना आपापसात वाटून घेताय, त्यावरून तुमची संवेदनशीलता हळवी होतेय...
या सर्वांची तुम्हाला लाज नाही वाटत ?
पाकिस्तानचे झेंडे फडकवताना , त्यादेशाचा जयजयकार करताना, भारतमातेचे तुकडे व्हावेत अशी इच्छा बाळगणाऱ्यांच्या नादी लागताना, नंदनवन असणाऱ्या काश्मीर चे संरक्षण करणाऱ्यांवर दगड फेक होताना डोळे मिटून घेताना आणि सच्च्या देशप्रेमीवर चिखलफेक करून त्यांचे नितीधैर्य खच्ची करणारे निमूट पणे पाहताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही ?
सगळे षंढ बनलात की तुमच्या अंगातलं रक्त दूषित बनलं ?
मातृप्रेम संपलं की पैसा हेच सर्वस्व बनलं ?
आपलं स्वत्व विकलं की पारतंत्र्याची हौस आली ?
आम्हा सगळ्या अस्वस्थ आत्म्यांना भयाण अंधकार दिसतोय...
रक्ताचा लाव्हा उकळतोय
आणि तुमचं इतके दिवस संरक्षण केल्याचं दुःखही होतंय...
कशाला *लष्करी दिन* पाळताय ? तुमच्या वर्तनांनं तो 'दीन' झालाय.
आम्ही अस्वस्थ आहोत, आम्हाला, शहीद होऊनही सद्गती मिळाली नाही कारण तुमच्या पैकी अनेकांचं वर्तन..
अजूनही वेळ गेलेली नाही
अजूनही संधी गेलेली नाही
उठा, आणि आमच्या बलिदानाची शपथ घेऊन राष्ट्राचा विचार अगोदर करा ! शपथ आहे आम्हा सर्व जवानांच्या आत्म्याची , आमच्या देशभक्तीची !
तरच आम्हाला मुक्ती मिळेल, अन्यथा पुन्हा एकदा पारतंत्र्य...पुन्हा गुलामी
आणि आमच्या रक्ताचा अपमान !
माझ्या भावाबहीणीनो ,
आमच्या माघारी, खरंच
सांभाळाल ना हा माझा प्राणप्रिय देश !
*लष्करी दिनानिमित्त तुम्हाला आमच्या रक्ताची आण घालतोय, सांभाळा देशाला...!*
वंदे मातरम !!!
*-- डॉ.श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.*
९४२३८७५८०६
--------------
मित्रानो, ही पोस्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचू द्या , नावासह, व्हॉट्सअप आणि फेसबुकवरही...वंदे मातरम !
No comments:
Post a Comment