Total Pageviews

Monday, 27 July 2020

२०१४ मध्ये ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी विवेक विचार आयोजित विमर्श व्याख्यानात चीनशी वागायचं कसं या विषयावर मांडणी केली होती. ती मांडणी आज तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे.


प्रतिनिधी । जपान आणि इतर अनेक शेजारी देशांबरोबर चीनचे वादाचे संबंध आहेत. शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने त्या देशांबरोबर आपली मैत्री वाढवत चिनी ड्रॅगनशी मुकाबला करणे शक्य आहे. केंद्रातील नवे सरकार मोदींच्या नेतृत्त्वाखाली या दिशेने पावले टाकत असल्याचे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडअर व संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन यांनी केले.

विवेकानंद केंद्राच्या विवेक विचार मासिकाने "चीनशी वागायचं कसं?' या विषयावर २१ डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विमर्शचे आयोजन केले होते. ज्ञानप्रबोधिनी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख बसवराज देशमुख होते. व्यासपीठावर मासिकाचे संपादक सिद्धाराम पाटील व केंद्राचे सहसंचालक दुर्गाप्रसाद मिणीयार उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमात केंद्राचे पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे रिजनल मॅनेंजर जितेंद्र जोशी, डॉ. प्रतिभा पाटील यांचा सत्कार झाला. अप्पासाहेब हत्ताळे यांनी सूत्रसंचालन, अॅड. शांतवीर महिंद्रकर यांनी आभार मानले. विवेकानंद केंद्राचे प्रांत प्रमुख अभय बापट, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, हरिभाऊ गोडबोले, प्रा. प्रशांत स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
अरुणाचल प्रदेशावर चीन सातत्याने दावा सांगतो आहे. या दुर्गम राज्यामध्ये राज्यामध्ये विवेकानंद केंद्राचे व रामकृष्ण मिशनचे सुरू असलेले सेवाकार्य मी जवळून पाहिले आहे. देशभक्तीचे हे कार्य अजोड आहे, असे उद्गार श्री. महाजन यांनी काढले.
तो राजकीय नेतृत्वाचा पराभव
१९६२ च्या चीन युध्दात भारताचा पराभव झाला, असे मी मानत नाही. कारण त्यावेळी फक्त आपले दहा टक्के सैन्य लढले. ९0 टक्के सैन्य, शंभर टक्के नौदल युध्दात सहभागीच नव्हते. या स्थितीत भारताचा पराभव झाला, असे कसे म्हणायचे? तो तर राजकीय नेतृत्वाचा पराभव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौर्‍यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अज्ञानातून टीका केली जात आहे. वस्तुत: मोदींचे पाऊल योग्य दिशेने पडत आहे. त्यांच्या दौर्‍यामुळे भारतावर नाराज असलेल्या नेपाळशी मैत्री झाली आहे. चीनचा शत्रू जपान, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सशी भारताची मैत्री दृढ झाली आहे, असे ब्रिगेडियर महाजन म्हणाले.
पाक नव्हे चीन हाच खरा शत्रू
पाकिस्तान हा भारताचा फार मोठा शत्रू नाही आणि काश्मीरही मोठा प्रश्न नाही. सीमेपलीकडून जी सशस्त्र घुसखोरी होत आहे, त्यातील ९0 टक्के अतिरेकी सीमेवरच मारले जातात. पाकिस्तान हा शुन्याचा पाढा आहे. त्या देशाशी मैत्री करणं, हे दिवास्वप्न आहे. त्यामुळे त्यात वेळ दवडू नये. चीन हाच आपला क्रमांक एकचा शत्रू आहे,असे निरीक्षण नोंदवून चीनचा मुकाबला करण्यासाठी सैन्याचे आधुनिकीकरण जलद गतीने करणे गरजेचे आहे.
विवेकानंदांनी दिला होता इशारा
स्वामी विवेकानंद जेव्हा चीनच्या दौर्‍यावर गेले होते, तेव्हा तेथे साम्यवादही नव्हता; पण स्वामीजींनी भारताला चीनपासून धोका असून, तो देश भविष्यात महासत्ता बनेल, अशी भविष्यवाणी केली होती. चीन हा निद्रीस्त राक्षस आहे, असे उद्गार स्वामीजींनी काढले होते. त्यानंतर योगी अरविंद घोष, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनीही हा धोका सांगितला होता.
केवळ मागील सरकारशी स्पर्धा नको
चीन भारताशी पारंपरिक आणि अपारंपरिक पध्दतीने युध्द करू शकतो. त्या देशाची शक्ती प्रचंड आहे. या शक्तीचा सामना करण्यासाठी भारताला सैन्याचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. मागील सरकारच्या तुलनेत या सरकारने पावले उचलली आहेत. हे सरकार याकामी पुढेही गेले आहे; पण सध्याच्या सरकारने केवळ मागच्या सरकारशी स्पर्धा न करता सुधारणांचा वेग आणखी वाढविला पाहिजे.
अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक
चीन आणि भारताचा तुलनात्मक अभ्यास केला असता चीन आपल्या पुढेच आहे. चीनमधील साक्षरतेचे प्रमाण ८१.५ टक्के आहे; तर भारताचे ५२.१. चीनचे सकल देशांतर्गत उत्पन्न ७.६ आहे. भारताचे ५ टक्के आहे. तेथील दरडोई उत्पन्न ३६५0 डॉलर्स आहे; तर भारताचे १६८0 डॉलर्स आहे. ही आकडेवारी पाहिल्यास भारताने अर्थव्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे.
आपल्यासाठी चांगली बाब
चीन हा देश कच्चा माल पुरवठादार देशांचा नेता आहे.चीनने भारताच्या सीमेपर्यंत रस्ते, रेल्वेचे जाळे उभे केले आहे. भारताची रेल्वे मात्र आसामच्या पुढे गेली नाही. पर्यावरणाचे कारण देत आपलेच सरकार आपल्याच देशात रस्ते आणि रेल्वे उभारणीला विरोध करत होते. मोदी सरकारने मात्र सीमेवरील विकासकामांना पर्यावरण नियमांच्या चौकटीतून बाहेर काढले आहे. भारताची अर्थव्यवस्था जोपर्यंत मजबूत होत नाही, तोपर्यंत चीनचा प्रश्न सुटणार नाही कारण सैन्याला देण्यासाठी भारताकडे पुरेसा पैसा नाही. भारतीय सीमेचा प्रदेश डोंगराळ असल्यामुळे चीन अत्याधुनिक अवजारे आणू शकत नाही, ही बाब आपल्यासाठी चांगली आहे.
चार प्रकारचे शत्रू
आर्य चाणक्यांनी दोन हजार वर्षांपूर्वी देशाला चार प्रकारचे शत्रू असल्याचे सांगितल्याचा उल्लेख ब्रिगेडियर महाजन यांनी केला. एक – बाहेरचा शत्रू आणि देशांतर्गत लोकांकडून मदत. दोन – देशांतर्गत शत्रू आणि त्याला देशबाह्य शक्तींकडून मदत. तीन – देशांतर्गत शत्रू आणि त्याला देशातील काही लोकांची मदत. आणि चार – देशाबाहेरील शत्रू आणि देशाबाहेरील शत्रूंचीच त्यांना मदत. या चारही प्रकारात देशांतर्गत शत्रू हा सर्वाधिक घातक असतो. आधी त्याला नष्ट केले पाहीजे, असे महाजन म्हणाले.

No comments:

Post a Comment