भारताचे अकरावे राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने सारा देश शोकाकुल झाला आहे. सारे आयुष्य विद्येची उपासना केलेल्या या ग्रंथकर्त्या ज्ञानर्षींना शिलाँग येथे विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शनपर भाषण करताना मृत्यू यावा याएवढा भाग्यशाली दैवदुर्विलास दुसरा नसावा. लहानपणी शिक्षण घेणे अवघड झालेल्या कलामांनी कधी मित्रांच्या मदतीने तर कधी वृत्तपत्रे विकून आपले आरंभीचे शिक्षण पूर्ण केले ही बाब कुणाला खरी वाटू नये एवढी विलक्षण आणि प्रेरणादायी आहे. रामेश्वरच्या परिसरात असे वाढलेले कलाम पुढे देशाचे ‘मिसाईल मॅन’ व्हावे, अणुशक्तीचे संवर्धक व्हावे आणि अखेर देशाचे राष्ट्रपती व्हावे ही वाटचाल कुणालाही थक्क करणारी आहे. अशी पदे भूषविताना आणि विज्ञानाच्या केंद्रात काम करीत असताना त्यांची नजर सामान्य माणसाचे कल्याण यावर राहिली. ज्ञान आणि विज्ञान ही माणुसकीच्या समृद्धीची साधने आहेत, तिच्यावर स्वार होणारी आयुधे नाहीत ही त्यांची नम्र श्रद्धा होती. राष्ट्रपतिपदावरून पायउतार झाल्यानंतरही देशाचे कृषी क्षेत्र कसे बहरेल याची चिंता व त्याविषयीचे संशोधन यात ते गढले होते. धर्म, जात वा व्यक्तिगत हित याहून राष्ट्राचे कल्याण अधिक महत्त्वाचे मानणाऱ्या कलामांनी, ते धर्माने मुसलमान असूनही, एका कमालीच्या धर्मनिरपेक्ष वृत्तीची जोपासना केली. त्याचमुळे अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी कलामांना राष्ट्रपतिपद देण्याचा निर्णय घेतला व देशातील सर्व पक्षांनी त्याला एकमुखी पाठिंबा दिला. त्यांच्या विज्ञाननिष्ठेविषयीची एक बाब येथे नोंदविण्याजोगी आहे. राष्ट्रपतिपदाचा उमेदवारी अर्ज ते कोणत्या मुहूर्तावर भरू इच्छितात हे विचारायला तेव्हाचे मंत्री प्रमोद महाजन गेले असता ते म्हणाले, ‘जोवर पृथ्वी तिच्या आसाभोवती आणि त्याचवेळी सूर्याभोवती फिरते तोवर उगवणारा प्रत्येकच दिवस हा भाग्यशाली मानायचा असतो.’ याचमुळे कलामांना सर्व राज्यांत, धर्मांत, वर्गांत आणि वयोगटात त्यांचे चाहते निर्माण करता आले. वैज्ञानिकांपासून प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत कोणाशीही ते जिव्हाळ्याचा संवाद साधू शकत आणि त्यांच्याशी बोलायला आबालवृद्धांनाही तेवढेच आवडे. राष्ट्रपतिपदावर असताना रशियाच्या पुतीनपासून अमेरिकेच्या बुशपर्यंतच्या साऱ्यांशी बरोबरीने बोलणारे कलाम त्याचमुळे पुढे शाळकरी मुलांशी, महाविद्यालयीन युवक-युवतींशी आणि प्रौढ व वृद्धांशी त्यांच्या सुखदु:खांविषयी व प्रश्नांविषयी बोलू शकत. एखादा माणूस किती स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिक आणि विश्वासू असावा याचा आदर्शच आपल्या ८३ वर्षांच्या समृद्ध पण गतिमान आयुष्यात त्यांनी उभा केला. या माणसाने देशाला त्याचे पहिले क्षेपणास्त्र दिले व अवकाशात झेप घेण्याची संधी उपलब्ध करून दिली, याच माणसाने देशाला पहिला व प्रगत अणुबॉम्ब देऊन त्याला जगातील अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या श्रेणीत आणून बसविले आणि राष्ट्रपती असताना याच माणसाने जगाला भारतातील खऱ्या धर्मनिरपेक्ष वृत्तीची ओळख करून दिली. ते राष्ट्रपतिपदावर असतानाच डॉ. मनमोहनसिंग हे पंतप्रधानपदावर आले. त्या काळात वाजपेयींशी आत्मीयतेचे संबंध राखणाऱ्या कलामांना मनमोहन सिंगांशीही तेवढ्याच जिव्हाळ्याने वागता आले. राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्यात मतभेद झाल्याच्या अनेक घटनांची नोंद इतिहासात आहे. मात्र आपल्या पदाचे संवैधानिक स्वरूप नीट समजून घेणाऱ्या कलामांच्या कारकिर्दीत अशा मतभेदाचा एकही प्रसंग आला नाही. कलामांच्या व्यक्तिमत्त्वातील या ऋजुत्वाचा अनुभव घेतलेली अनेक माणसे देशात आहेत. ते इस्रोचे प्रमुख असताना त्यांच्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याने त्यांच्याजवळ कामाच्या ताणाची तक्रार करताना ‘आपण घरच्या मुलांना साधे बागेत फिरायला नेऊ शकत नाही’ असे म्हटले. दुसऱ्या दिवशी हा सहकारी सायंकाळी त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या मुलांना बागेत फिरायला न्यायला स्वत: कलामच घेऊन गेल्याचे त्याच्या पत्नीने त्याला सांगितले. आपल्या सहकाऱ्यांची मने अशी जपणारा अधिकारी कोणाला आवडणार नाही? मतभेद बाजूला सारायचे आणि समन्वयावर भर द्यायचा, कटुता टाळायची आणि स्नेहाची उपासना करायची व दुरावे घालवत माणसांच्या जवळ येत राहायचे ही किमया फक्त स्वार्थाच्या वर उठलेल्या व्यक्तीलाच जमते. कलाम हे अशा दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने सारा देशच अचंबित होऊन थांबला व आपले कृतज्ञतेचे अश्रू ढाळू लागला याचे कारण डॉ.कलाम हे त्यांच्या परिचितांएवढेच अपरिचितांनाही त्यांच्या सौजन्यशील प्रतिमेमुळे आपले वाटत राहिले. डॉ. राजेंद्रप्रसादांपासून आताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापर्यंत देशात १३ राष्ट्रपती झाले. कलामांचे नाव या साऱ्यांच्या यादीत अजरामर राहणारे आहे. राजेंद्रबाबूंनंतर या पदावर आलेला श्रेष्ठ देशभक्त, राधाकृष्णन यांच्यानंतर आलेला मोठा ज्ञानवंत, झाकिर हुसेन यांच्या पश्चात आलेला वरिष्ठ शिक्षण तज्ज्ञ, डॉ. गिरी यांच्यानंतर गरिबांशी जुळलेला लोकसंग्रही आणि प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांच्या अगोदर त्यांच्याएवढाच तळहातासारखा देश जाणणारा द्रष्टा अशी कलामांची ओळख देशाच्या इतिहासात यापुढे राहणार आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन
No comments:
Post a Comment