तसा आबांचा माझा फार उशिरा संबंध आला. म्हणजे आबांचाच सकाळी सकाळी दूरभाष आला. पूर्वी सोलापूरला पोलिस अधीक्षक असणारे पद्मनाभन् यांनी मला दूरभाष करून विचारलं की, ‘‘आबा... आर. आर. पाटील, गृहमंत्री आपल्याशी बोलू इच्छितात...’’
क्षणभर मनात अनेक प्रश्नांचं काहूर उठलं. ‘‘गुरुजी... खूप दिवसांपासून आपल्याला भेटायची इच्छा होती. मुंबईत याल का? भटके-विमुक्तांच्या, विशेषत: पारधी समाजाच्या प्रश्नावर बोलूयात...’’
मग लगेच दुसर्या दिवशीच त्यांनी बोलावलं ‘रामटेक’वर. एक अत्यंत विनम्र, ऋजू स्वभावाचं व्यक्तिमत्त्व. ते मला घ्यायला बाहेर आले. जराही कुठं अहंकाराचा, पदाचा बोलण्या-चालण्यात वास नाही. त्याच वेळी त्यांचे एक बंधू- मावस की चुलत, आले. संन्यासी. इस्कॉनचे एका केंद्राचे प्रमुख. त्यांना ते सांगू लागले भरभरून. अशाप्रकारे स्तुती ऐकायची सवय नसलेला मी गोंधळून गेलो. संघात, परिवारात असं व्यक्तीविषयी बोललं जात नाही. कामाविषयी, समस्येविषयी बोललं जातं. मोजक्या शब्दांत आशयघन बोलणं. इथं व्यक्तीविषयी अधिक बोललं जातं. बोलणारे आबाच असल्यामुळे त्यात अकृत्रिम भाव होता. ते मनापासून बोलत होते.
‘‘मला यांचं ‘पारधी’ पुस्तक प्रमोद महाजनांनी दिलं होतं. मी ते पूर्ण वाचलं. आणि बरं का गुरुजी, त्याच्या पाचशे प्रती मी महाराष्ट्रातल्या प्रमुख पोलिस अधिकार्यांना वाचायला लावल्या.’’
याविषयी एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते वसंत वाणी मला म्हणाले होते, ‘‘प्रभुणे, आबांनी तुमचा दोन-चार वेळा उल्लेख केला पक्षाच्या बैठकीत!’’
तर असे आबा. एखाद्या शिक्षकासारखे म्हणजे ‘गुर्जी’सारखे. साधे, सरळ. जवळच्या मित्रासारखे. खूप जुना परिचय असल्यासारखे ते माझ्याशी वागत होते. सर्व घर आतून िंहडून दाखवलं. देवघर दाखवलं. ‘‘गावी असलो की आंघोळ झाल्यावर गावातल्या सर्व देवतांचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. इथं देवघरात बसलं की मन आपोआपच शांत, स्वच्छ बनतं...’’
त्या दिवशी त्यांनी दोन तास गप्पा मारल्या. पारधी समाज, त्याच्या जगण्याच्या समस्या, त्यांची कौटुंबिक स्थिती, भांडणं-मारामार्या, पोलिस खातं गाफील... आणि पारध्यांमुळे सडला जाणारा समाज... समाजाचा रोष, संताप यांना बळी पडणारा समाज.
‘‘पारधी समाजाच्या विकासाचा एक आराखडा तयार करू या आपण. सर्वांगीण विकासाचा. तुम्ही जे प्रयत्न केलेत त्याच्या आधारे असा आराखडा तयार करता येईल. माझं, सरकारचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य राहील.’’
आबा दर दिवाळीला त्यांच्या परिसरातील पारधी कुटुंबांना नवे कपडे घेऊन देत. ‘‘कितीही दिलं तरी पुरं पडत नाही.’’
त्यांनी आमच्या गप्पा शब्दबद्ध करायला दोन कार्यकर्ते बसवले होते. त्याचं एक टिपण त्यांनी मला बनवून दिलं.
त्यांच्याशी बोलत असतानाच कुर्डुवाडीवरून एक दूरध्वनी आला.
पोलिसांच्या हल्ल्याचा. वस्तीला कसं घेरून टाकलंय् आणि मारझोड सुरू आहे. याचं जिवंत चित्रण कृष्णाच ऐकवत होता. माझ्याकडून मोबाईल घेत त्यांनी ते सर्व ऐकलं आणि लगेच तिथल्या जिल्हाधिकार्याला फोन लावला आणि लगेचच एक बैठक घेऊन तोडगा काढायला सांगितला.
त्यानंतर आमच्या एक-दोन बैठका झाल्या. एका बैठकीत ते म्हणाले, ‘‘गुरुजी... आता तेवढा वेळ नाही. आपण गेली दोन वर्षे जे बोललो, ठरवलं ते होईल तेव्हा होईल. आता पाच-सहा महिन्यांत निवडणुका येतील. आम्ही असू याची शक्यता कमीच आहे. तुमचेच लोक येतील. पण, माझी एक विनंती आहे. तुम्ही तुमच्या िंचचवडच्या शाळेला गुरुकुलाची मान्यता घ्या. मला माहीत आहे, तुम्हां लोकांना शासनाच्या सहकार्याविना सर्व करायचं असतं. पण, याला शासनाचं सहकार्य घेतलंत तर प्रशासनाचं या कामाकडे लक्ष जाईल आणि सरकारचा पैसा हा अखेरीस लोकांचाच असतो. तो तुमच्यासारख्यांच्या कामास आला पाहिजे. इथं वर्षभर लूट सुरू असते. माझी विनंती आहे. तुम्हाला मी आमच्या सचिवांकडे पाठवितो.’
त्यांनी लगेच दोघांना दूरभाष केले. एक होता- आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांना. ते त्या वेळी सातारच्या दौर्यावर होते. त्यांनी माहिती दिली. पारधी समाजासाठी दोन आश्रमशाळा करायचे ठरवले आहे. त्यातली एक त्यांनी आम्हाला द्यायची ठरवले. लगेचच आदिवासी सचिवांना दूरभाष करून मला त्यांच्याकडे जायला सांगितले. लगेचच. माझ्याबरोबर नेहमीसारखेच कार्यकर्ते होते- अॅड. सतीश गोरडे, पूनम गुजर, सूरज भिसे, अख्तर िंपजारी, सतीश अवचार, पोतदार सर. आबांनी एक अधिकारी आमच्याबरोबर दिला. आम्ही सचिवांच्या केबिनजवळ गेलो, तर प्रधान सचिव आमच्या स्वागताला बाहेर आले! प्रवीणिंसह परदेशी. ते आदिवासी विभागाचे प्रधान सचिव होते.
‘‘प्रभुणे, आपल्याला माझ्याकडे यायला मंत्र्यांच्या शिफारशीची गरज नाही. पण, आबांनी फुल्ल सपोर्ट करने को कहा है...’’ परदेशीसाहेबांनी उपसंचालकांना बोलावलं आणि आश्रमशाळेचा एक अर्ज द्यायला सांगितला.
‘‘असा अर्ज नाही देता येणार. जाहिरात देतो आपण आणि शासनाचं धोरण आहे आता नव्या आश्रम शाळांना परवानगी द्यायची नाही...’’
उपसंचालकांनी आपलं पठडीबंद उत्तर दिलं. प्रवीणिंसहांनी त्यांना सौम्य शब्दांत समज दिली. ‘‘गृहमंत्र्यांनी यांना पूर्ण सहकार्य करायला सांगितलंय्. त्यांना अर्ज द्या... आणि ही आश्रमशाळा यांना द्यायचीय्. तसा अहवाल मला द्यायला सांगितलंय्.’’
प्रवीणिंसह िंपपरी-िंचचवडचे आयुक्त असताना क्रांतिवीर चाफेकरबंधूंच्या वाड्याचं स्मारकात रूपांतर करण्यातल्या सर्व अडचणी त्यांनी दूर करून कामाला मंजुरी दिली होती. त्यामुळे परिचय होताच. आणि ते उपसंचालक होते कैलास भंडलकर. त्यांच्या केबिनकडे जाता जाता त्यांनी विचारलं, ‘‘आपलं नाव...?’’ मी नाव सांगताच ते थबकले. म्हणाले, ‘‘अरे, तुम्ही आमच्या गस्ती साहेबांचे मित्र! डॉक्टरसाहेब नेहमी नाव काढतात.’’ डॉ. भीमराव गस्तींची ओळख निघताच पुढची कामं सोपी झाली. आम्ही अर्ज घेऊन परत आबांच्या भेटीला आलो. त्यांनी टंकलिखित पत्र तयार ठेवलंच होतं.
या त्यांच्या पत्राचा पुढे खूपच उपयोग झाला. घोडेगाव पुणे जिल्हा अंतर्गत असल्यामुळे सर्वत्र पैसे द्यावे लागतात, असा अनुभव सांगितला जायचा. पण, आबांच्या पत्राने ही फाईल विनासायास मंत्रालयात गेली. आबांचा परत फोन आला. ‘‘गुरुजी, थोडेच दिवस राहिलेत. येऊन जा.’’
आम्ही लगेच गेलो. त्यांनी अधिकार्यांना तर बोलावलेच, पण काही सहकारी मंत्र्यांना बोलावून माझा सर्वांशी परिचय करून दिला. ‘‘आपण सत्तेत राहून जे करू शकलो नाही, ते यांनी सत्तेपासून दूर राहून केलंय्. यांच्याप्रमाणे कार्यकर्ते घडवायला हवेत.’’ आबांच्या बोलण्यातून संघावरचा विश्वास डोकावत होता. यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन यायला सांगितलं होतं. गुरुकुलम्मधील काही आणि कुर्डुवाडी-सोलापूर भागातील कार्यकर्ते. यांना त्यांनी कळकळीने मार्गदर्शन केलं. मुलांना शाळेत पाठविण्याची विनंती केली. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली. आम्ही मंत्रालयात असतानाच आचारसंहिता सुरू झाली. त्यांनी अधिकार्यांना आम्हाला सहकार्य करायच्या सूचना केल्या.
आबांनी गुरुकुलम् मान्यतेचा आग्रह धरला. माझ्याकडून त्याची फाईल बनवून घेतली. खालून मंत्रालयात फाईल येणं ही क्रिया करवून घेतली. दोन-तीन वर्षे अत्यंत तळमळीने परिश्रमपूर्वक सर्व सहकार्य केलं. यात त्यांचा हेतू काय होता? ना आम्ही त्यांच्या पक्षाचे-विचाराचे, ना नात्यातले. तरी समाजाच्या प्रेमाखातर एका सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून त्यांनी सहकार्य केलं. त्यांना खंत होती, आचारसंहिता लागायच्या आधी हातात मान्यतेचं पत्र द्यायचं राहून गेलं. त्यांचं अपूर्ण काम पुढे मित्रवर्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पूर्ण केलं.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पण, त्यासाठीची लागणारी तरतूद आबांच्या काळातच करण्यात आली होती. दैवगतीच विचित्र होती. मान्यता मिळण्यासाठी घाई करणारे आबा अचानक इहलोक सोडून गेले. एक, संघात कधीही न आलेला, शाखेत न आलेला संघ स्वयंसेवक म्हणजे आबा!
आबांनी शेवटच्या भेटीत सहकारी मंत्र्यांना ओळख करून देतानाचे शब्द मनात रुंजी घालताहेत-
‘‘हे संघाचे कार्यकर्ते कसं काम करतात याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. मागची लोकसभेची निवडणूक. साहेब माढा मतदारसंघातून उभे होते. त्याच्या आधी दोन-तीन वर्षे सर्व सोलापूर जिल्हा िंपजून काढला होता. पारधी मेळावे घेतले आपण. सर्व केलं. माढ्याला एक सभा होती. सर्वांची भाषणे झाली. खास पारधी समाजाची सभा होती ती. सर्वांची बोलणी झाल्यावर मी विचारलं, ‘‘मग आता मतदानाच्या वेळी काय लक्षात ठेवणार? कशाचं बटन दाबणार?’’ ‘‘कमळाचं...!’’ सर्वांनी एकच उत्तर दिलं. आम्ही चक्रावून गेलो. गेली चार-पाच वर्षे इतकं करूनही हे पारधी म्हणताहेत कमळाचं बटन दाबणार! आम्ही सारेच नाराज झालो.
‘‘का रे... घड्याळावर मतदान का करणार नाही?’’
‘‘तुम्ही आज आलात. उद्या जाल. नंतर कोण?’’
आबा म्हणाले, ‘‘मी चौकशी केली. आणि संघाचं काम किती खोलवर रुजलंय् हे लक्षात आलं. यांनी ते कार्यकर्ते उभे केले. घरचं खाऊन आज समाजाचं काम कोण करतंय्... हे संघाचे लोक...’’
अत्यंत निगर्वी. सरळ मनाचे. राजकारणात, तेही कॉंग्रेसच्या संस्कृतीत न शोभणारे आबा आश्वासन देऊन गेले होते.
‘‘प्रभुणे, मी नक्की येणार. घरच्यांना घेऊन येतो तुमचा प्रकल्प पाहायला...’’ हे आश्वासन मात्र आबांना पाळता आलं नाही. आबांनी आपणहून बोलावून घेऊन हे काम माझ्याकडून करवून घेतलं. गुरुकुल शिक्षण, त्याला मान्यतेसाठी ते खूपच आग्रही होते. पहिल्यापासूनच ते म्हणत- थोडेच दिवस राहिलेत...
खरंच आबांनी आग्रह धरला नसता तर...? हे काम झालं असतं...? मन अस्वस्थ करणारा प्रश्न.
9766325082(लेखक सामाजिक कार्यकर्ते वयमगरवाडी प्रकल्पाचे जनक आहेत)
No comments:
Post a Comment