Total Pageviews

Thursday, 16 September 2021

हैद्राबादची निजामशाही - हैद्राबाद मुक्तिसंग्राम - प्रा. डॉ. सतीश कदम, उस्मानाबाद, ९४२२६५००४४-WHATS APP FORWARD

 

17 सप्टेंबर म्हटले की, आपण लगेच नाव उच्चारतो “ मराठवाडा मुक्तिसंग्राम” ! आपल्या अज्ञानाची सुरुवातच मुळी याठिकाणाहून होते. कारण तो मराठवाडा मुक्तिसंग्राम नसून हैद्राबाद मुक्तिसंग्राम आहे. 1724 ते 1948 अशी सलग 224 वर्षे आपल्या भागावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. मग हा निजाम म्हणजे कोण ? हेही माहीत असले पाहिजे. त्यानुसार निजाम हे काही कुठल्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. दिल्लीच्या मोगल बादशाहने आपला दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन खानाला निजाम उल मुल्क ही पदवी दिली होती. त्यामुळे त्याला निजाम म्हटले गेले. वास्तविक पाहता 200 वर्षात एकूण सात जणांनी निजामशाहिचा कारभार केला. आणि त्या प्रत्येकाने स्वत:ला निजाम ही पदवी लावली. त्यामुळे निजाम हे कोण्या एका व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. निजाम या शब्दाचा अर्थ होतो व्यवस्थापक ! मुल्क म्हणजे जमीन किंवा परिसर. आणि त्यानुसार परिसराची व्यवस्था पाहणारा म्हणजेच निजाम. त्यानुसार दिल्लीच्या मोगल बादशहाचा दक्षिणेतील एक महसुली अधिकारी म्हणजेच निजाम. 1724 ला मोगलांचा सुभेदार म्हणून काम करताना पहिला निजाम मीर कमरुद्दीन खानाने औरंगाबाद याठिकाणी स्वत:ची स्वतंत्र गादी निर्माण केली. 1767 नंतर निजामाने आपला कारभार हैद्राबाद येथून चालवायला सुरुवात केली. निजाम हा धर्माने मुस्लीम असलातरी त्याच्याकडे अनेक नामांकित हिंदू सरदारांनी शेवटपर्यन्त चाकरी केलेली आहे. त्यात छत्रपती संभाजीच्या बहीणीचे नातू रावरंभा निंबाळकर, सेनापती धनाजी जाधवाचे पुत्र चंद्रसेन जाधव, फलटणच्या निंबाळकरांचे वारसदार सुलतानजी निंबाळकर, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणार्या हिम्मतबहाददूर विठोजी चव्हाणांचे चिरंजीव उदाजी चव्हाण यासारख्या दिग्गजांचा समावेश होतो. 15 ऑगस्ट 1947 म्हणजेच स्वातंत्र्यापर्यन्त भारतात निजामासारखी जवळपास 565 संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर बहुतेकांनी स्वत:ला भारतात विलीन करून घेतले. एक वर्ष उजाडलेतरी हैदराबादचा निजाम काही भारतात सामील व्हायला तयार नव्हता. त्यामुळे निजाम संस्थांनातील जनतेने निजामाविरोधात जो लढा दिला त्यालाच “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 1948 ला हैद्राबादच्या निजामाचे शासन हे देशातील सर्वात श्रीमंत संस्थान होते. 1941 च्या जनगणनेनुसार निजाम राज्याचे एकूण क्षेत्रफळ 82 हजार 694 चौरस मैल इतके होते. जे इंग्लंड आणि स्कॉटलंड देशाच्या दुप्पट भरते. या निजाम राजवटीत संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा आणि दक्षिण कर्नाटकातील तीन जिल्हे मिळून एकूण 16 जिल्ह्याचा समावेश होता. 22 हजार 360 खेड्यात मिळून या संस्थानची लोकसंख्या 1 कोटी, 63 लाख, 38 हजार, 534 एवढी होती. त्यात 85 % हिंदू तर 12 % मुस्लीम होते. त्यामुळे उर्दू भाषिकांची संख्या ही फक्त 10% असलीतरी राज्यकारभाराची भाषा उर्दूच होती. यावेळी मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यातील लोकसंख्या 52 लाख 19 हजार 528 होती. एकूण क्षेत्रफळाच्या 42 % भाग हा जमीनदाराच्याच मालकीचा होता. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद, परंडा आणि कळंब हे तालुके निजामाचे सर्फेखास म्हणजे वैयक्तिक उत्पन्नाचे तालुके होते. तर या सोबतच गुंजोटी आणि लोहारा हे तालुके निजामाच्या पायग्याचे म्हणजे खाजगी संरक्षक पथकाच्या जहागिरीचे तालुके होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे निजामाची खाजगी जहागीर होती. अशाप्रकारच्या जहागिरीतून निजामाला दरवर्षी 15 कोटीचे उत्पन्न मिळत होते. हैद्राबाद संस्थानचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, 1883 पासून हे संस्थान इंग्रजांच्या धर्तीवर राज्यकारभार करणारे शासन असून मीर महेबूबअली पाशा हा मोठा सुधारणावादी धोरणाचा होता. त्यामुळे महसूल, अबकारी, अर्थ,कस्टम, स्टॅम्प, न्यायदान, तुरुंग, पोलिस, टपाल, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, रेल्वे याप्रमाणे 21 विभाग काढून त्याद्वारे गावपातळीपर्यंत प्रशासन व्यवस्था राबविली. त्यामुळे 1910 पर्यंत निजामाकडे जमा होणारा महसूल हा 2 कोटी 89 लाख 43 हजार इतका होता. अगदी 2 आण्याचे नाणेही चांदीचे असून त्याचे वजन 1.39 ग्रॅम होते. त्यावर M आणि K अशी अक्षरे कोरलेली होती. M म्हणजे महबूब अली आणि K म्हणजे मुल्क. याशिवाय निजामाच्या काळात 16 आण्याचा 1 रुपया होता. त्यामुळेच त्याकाळी सोळा आणे काम झाले, अशाप्रकारची म्हण रूढ झाली. सहावा निजाम मीर महबूबअली हा येवढा शक्तीशाली होता की, इटली, फ्रांस, ओष्ट्रीया, इंग्लंड यासारख्या देशाचे राजपुत्र हे त्याचे खाजगी मित्र होते. 1910 पर्यंत गादीवर असणारा सहावा निजाम हा कपडे लत्ता आणि शिकारीचा शौकीन असून त्याने त्याकाळी एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा कधी वापरला नाही. याचवेळी वारंवार पडणार्या दुष्काळामुळे सर्वसामान्य जनता ही अन्नावाचून तडफडून मरत होती. प्रशासन व्यवस्था ही आजच्याप्रमाणेच असून त्याकाळी जिल्हा अधिकार्याला तालुकदार म्हणत असत. गावचा कारभार हा पाटील आणि पटवारी यांच्या हातात होता. पोलिस, लष्कर, रेल्वे, टपाल वगैरे यंत्रणेमुळे निजामाचे शासन हे अगदी एखाद्या देशाच्या तोडीचे होते. म्हणूनच देशातील 565 संस्थानात 21 तोफाच्या सलामीचा मान हा म्हैसूर, बडोदा आणि हैदराबादच्या निजामाला होता. 1800 साली इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार केल्याने निजमावर पुर्णपणे इंग्रजांचे वर्चस्व असलेतरी निजामाने इंग्रजालाही झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधून घेतला. संरक्षणाची जबाबदारी ही इंग्रजाकडे दिल्याने इंग्रजांनी हैद्राबादजवळ सैन्याची स्वतंत्र छावणी निर्माण केली. निजामाच्या मुलाच्या नावाने त्या भागाला सिंकंदराबाद हे नाव पडले. निजाम संस्थानचा कारभार हा एखाद्या देशाच्या कारभाराप्रमाणे असून 1870 साली आपल्या ताब्यातील प्रत्येक गावात निजामाने पिण्याच्या पाण्याकरिता अतिशय मजबूत अशा आडाची निर्मिती केली. ते आड आजही मराठवाड्यातील प्रत्येक गावात पहायला मिळतात. तर दुष्काळग्रस्त भागाकडेही त्यांचे लक्ष असून 1905 साली पडलेल्या दुष्काळात निजामाने 28000 रुपये खर्च करून तुळजापूरच्या घाटाचे काम पूर्ण केले. अशाप्रकारची अनेक कामे त्यांनी समाजासाठी पूर्णत्वास नेली. 1911 ते 1948 ला हैदराबादच्या गादीवर सातवा निजाम मिर उस्मानअली गादीवर असून तो जगातल्या 10 श्रीमंतापैकी एक होता. त्याच्याही कालखंडात हैद्राबाद संस्थानात अनेक सुधारणा होऊन छोट्या मोठ्या गावात शिक्षणाची सोय झाली. हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती झाल्याने संस्थांनातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंजोटीचे श्री कृष्ण विद्यालय 1921 सालचे आहे. निजाम राजवटीत विज्ञान आणि गणितबरोबरच अखलियात नावाचा विषय शिकणे अनिवार्य होते. ज्यात नीतीमत्तेचे धडे गिरवले जायचे, यातनापास झालातर त्याला नाकाम अखलियात म्हटले जायचे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे निजाम राजवटीतील प्राथमिक शिक्षण हे निशुल्क होते. शाळेतील प्रार्थना मात्र निजामाला दुवा मागण्याची असायची.खिचर की उम्र हो तुझकोआना बख्त सिंकदर हो |याचा अर्थ होतो “ दीर्घायु होऊ दे निजाम प्रभूला, हीच मागणी माझी ईश्वराला.” राज्यकर्ते मुस्लिम असलेतरी गावपातळीवर सर्वकाही व्यवस्थित होते. न्याय निवाडा निस्पक्क्षपाती होता. गावचा पाटील गावात न्याय द्यायचा. सरकारी कार्यालयाचा तसा संबंध यायचा नाही. परंतु आलाच तर तातडीने काम व्हायचे. रस्ते, रेल्वे यासारख्या सोयी झाल्याने माणसाचा संपर्क वाढला होता. निजामाची प्रशासनावरील पकड मजबूत असल्याने इथं चले जाव, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो ही गांधीजीची आंदोलने झाली नाहीत. दुसर्या महायुद्धांनंतर संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या विरोधात पेटलेला असताना निजाम राजवटमात्र अगदी स्थिर होती. 1946 पर्यन्त सारकाही व्यवस्थित चालू होतं. मध्येच रझाकार नावाच्या संघटनेचा उदय झाला आणि निजाम संस्थांनातील वातावरण पार बदलून गेले. निजाम राजवट बरी म्हणणारे लोकही आता रझाकारांचे बळी चालले. पाहता पाहता रझाकारांनी संपूर्ण हैद्राबाद संस्थान आपल्या हातात घेतले. 1946 ते 1948 अशी दोन वर्षे संपूर्ण जनता यांच्या अत्याचाराला बळी पडली. गावोगाव अन्याय अत्याचार याला सीमा राहिली नाही. एका बाजूला सारा हिंदुस्तान स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतोय तर त्याचवेळी निजाम राजवटीतला माणूस जगण्यासाठी धडपडतोय अशा वातावरणात गावातील सर्वसामान्य माणूस जागा व्हायला लागला. आणि त्यातूनच भारतातील एक्या अदभूतपुर्व अशा लढ्याला सुरुवात झाली. त्याला “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संस्थानात उठावाला सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढ्याची सुरुवात झाली असलीतरी शेवटची 18 महिने ते तुरुंगातच होते. त्यामुळे निजामाच्या