BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY

SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.

Pages

▼

Sunday, 28 April 2019

इलेक्शन टुरिझम-LOKMAT- सुकृत करंदीकर

भारतातल्या निवडणुका अत्यंत जिवंत असतात. एखाद्या प्रचंड लोकप्रिय हिंदी सिनेमात जे जे असतं  ते सगळं काही निवडणुकीत असतं. जबरदस्त डायलॉग्ज असतात.  चुरस, वैफल्य, खुन्नस, ईर्षा, राग, लोभ  अशा सगळ्या भावनांचा निचोड असतो निवडणुकीत.  पराकोटीचं शत्रुत्व असतं. मैत्री निभावली जाते. नातेसंबंध तुटतात. घराणेशाही भक्कम होते किंवा मोडते.  राजेशाहीवरचाही आदर असतो. क्वचित देशाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात हिंसा-रक्तपात घडतो.  पैशांचा खेळ रंगतो. नाचगाणी होतात. दारूची नशा असते. गर्दीचा गोंधळ असतो. शक्तिप्रदर्शनाची धामधूम असते. या सगळ्या महाभारतानंतर ‘एण्ड’ला काय होणार,  याची उत्सुकता टिकून असते.  हा थरार राज्याराज्यात असतो; आणि महत्त्वाचं म्हणजे तो थरार प्रत्यक्ष अनुभवायला आता परदेशी पर्यटक वाट वाकडी करून भारतात येतात आणि कडाक्याच्या उन्हात घाम गाळत देशभर भटकतात !

भलेही भारताने अवकाशात उपग्रहांची माळ लावली असेल, भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरांच्या गर्दीनं भलेही सिलिकॉन व्हॅली भरून गेली असेल, जगातली सर्वात मोठी अर्थसत्ता बनण्याकडे भारताची दमदार वाटचाल सुरू असेल, विज्ञान-तंत्रज्ञान-उद्योग- व्यापार-शेती यांसारख्या अनेक क्षेत्रात जगातल्या अनेक देशांना मागे टाकणारी कामगिरी भारताने जरूर केली असेल; पण अजूनही पाश्चात्त्य देशांना विशेषत: युरोपीय आणि अमेरिकी मंडळींच्या दृष्टीनं भारत अजूनही असंस्कृत आणि मागास असणारा देश आहे. ‘भारतात लोक हत्तीवर बसून फिरतात. पुंगीने साप-नाग खेळवतात. भारतीय अर्धनग्न, अशिक्षित आणि असंस्कृत आहेत,’ वगैरे ब्रिटिशांनी निर्माण करून ठेवलेली भारतीयांची प्रतिमा अजूनही कित्येक परकीयांच्या मनात गडद आहे.

भारताला जेव्हा स्वातंत्र्य देण्याची वेळ आली तेव्हा विन्स्टन चर्चिल या ब्रिटिश मुत्सद्याचा भारताबद्दलचा फणकारा आणि तिटकारा अत्यंत तिरस्कारयुक्त शब्दात व्यक्त झाला होता. खरं म्हणजे ब्रिटिशांसाठी सोन्याचं अंडं देणारी वैभवी कोंबडी हातातून निसटत असल्याचाच तो त्रागा होता.

काय म्हणाले होते चर्चिल महाशय?

- ‘‘या हरामखोर, असभ्य, लुटारुंच्या हाती सत्ता जाणार तर. भारतीय नेते कुचकामी आणि निव्वळ पेंढापुरुष आहेत. त्यांची वाणी गोड असेल; पण हृदयं मूर्ख आहेत. सत्तेसाठी हे नेते आपसातच भांडत बसतील आणि राजकीय घोडेबाजारात हरवून जातील. भारतात असाही दिवस उगवेल ज्या दिवशी हवा आणि पाण्यावरही कर लावला जाईल,’’ 

- ही विधानं आहेत चर्चिल यांची. थोडक्यात काय तर लोकशाही मार्गाने वाटचाल करण्याइतकी सभ्यता, सुसंस्कृतपणा आणि एकी भारतीयांमध्ये नाही, असं त्या महान ब्रिटिश नेत्याला म्हणायचं होतं. 

अर्थात एकट्या चर्चिललाच का नावं ठेवा? जात-पात, धर्म, पंथ, भाषा, अन्न, संस्कृती, प्रथा-परंपरा आणि अगदी हवामान, भूगोलही; अशा शेकडो भिन्नतांना सामावून घेणार्‍या खंडप्राय भारताकडं दुरून पाहणार्‍या कोणीही कदाचित चर्चिलसारखंच मत व्यक्त केलं असतं.

चर्चिल असो किंवा त्याच्यासारखा विचार करणारे कोणीही पाश्चात्त्य धुरीण, या सर्वांचा भारतीय लोकशाहीनं सपशेल पराभव केल्याचं आज पाहायला मिळतं. लोकसंख्येच्या दृष्टीनं जगात दुसर्‍या क्रमांकाच्या आणि आकारमानाच्या बाबतीत जगातला सातव्या क्रमांकाच्या भारताचे नागरिक त्यांचं सरकार मतदान यंत्रातून निवडतात. ‘राजकीय सत्ता बंदुकीच्या नळीतून येते,’ हा हिंसक विचार देणारा लाल साम्यवादी चिनी शेजार असताना, धर्माच्या आधारावर उभ्या असलेल्या देशाचा शेजार असताना भारतानं लोकशाही जिवंत ठेवावी, ही बाब कौतुकाची आहे. जगातल्या लोकांना त्याचं अप्रूप वाटतं. 

सुमारे एकशेतीस कोटी इतक्या अगडबंब लोकसंख्येचा दुसरा देश जगात नाही. भारतातल्या मतदारांची संख्या 90 कोटी. म्हणजे 90 कोटी मतं. जगातल्या दोनशेपेक्षा जास्त देशांची तर एवढी एकूण लोकसंख्यादेखील नाही. 

सन 1947 मध्ये ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्यापासून भारतात लोकशाही नांदते आहे. आधुनिक जगातली सर्वात जुनी लोकशाही म्हणून अमेरिकेचा गौरव केला जातो. त्या तुलनेत भारताची लोकशाही अगदीच कोवळी आहे. अजून पंचाहत्तरीही न गाठलेली. अमेरिकेची लोकशाही 231 वर्षांची. पण म्हणून ती संपूर्ण दोषरहीत झाल्याचा दावा आजही करता येत नाही. अतिप्रगत आणि चकचकीत अमेरिकेत ‘वर्ण’ आणि ‘वंश’ हेच मुद्दे आजही मतदारांची भूमिका निश्चित करण्यावर निर्णायक प्रभाव टाकतात. इंग्लंड, फ्रान्स, र्जमनी या जगाला लोकशाही शिकवणार्‍या देशांमध्येही लोकशाहीला घातक ठरणारी तत्त्वं आज प्रबळ ठरताना दिसतात. लोकशाही प्रक्रिया प्रवाही आणि निरंतर सुधारणा होत जाणारी आहे. पण 90 कोटी लोक मतदानावर विश्वास ठेवून (क्षुल्लक अपवादवगळता) पाच वर्षांचं सरकार शांततेत निवडून देतात, हा चमत्कार जगात कुठंही घडत नाही. भारतीय लोक लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहेत, याचा याहून मोठा पुरावा कोणता असू शकतो?

म्हणूनच जगाला या भारताचं आकर्षण वाटतं. दर पाच वर्षांनी येणारा लोकसभा निवडणुकीचा उत्सव काय असतो, हे पाहण्याची उत्सुकता जगाला असते. सतरावी लोकसभा निवडून देणारी यंदाची निवडणूक देशात सात टप्प्यांमध्ये होत आहे. एकूण 543 खासदार निवडून दिले जाणार आहेत. एव्हाना तीन टप्पे संपले आहेत. हा सगळा अवाढव्य कार्यक्रम कसा चालतो, लोक त्यांचा नेता, प्रतिनिधी निवडून देताना काय विचार करतात, राजकीय पक्ष, नेतेमंडळी मतदारांपर्यंत कशी पोहोचतात या सगळ्यांबद्दलचं कुतूहल परदेशी मंडळींना वाटणं स्वाभाविक आहे. लोकशाही प्रक्रिया, मतदान हे मुद्दे मुळातच व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. राजेशाही, हुकूमशाही, साम्यवादाच्या नावाखाली चालवली जाणारी एकाधिकारशाही या सगळ्यांपेक्षा मुक्त आणि प्रत्येक मताला किंमत देणारी लोकशाही प्रक्रिया हा अनेक देशांमधल्या नागरिकांसाठी असूयेचाही विषय ठरू शकतो. हेही स्वाभाविकच म्हणायला हवं. भारतातली राष्ट्रीय निवडणूक अनुभवण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे ती यामुळेच.

ही संकल्पना जन्माला मात्र आली ती दक्षिण अमेरिकेत. मेक्सिकोत. पर्यटकांच्या दृष्टीने दक्षिण अमेरिकेतला दुसर्‍या क्रमांकाच्या पसंतीचा देश आहे मेक्सिको. चौदा वर्षांपूर्वी मेक्सिकोतल्या निवडणुका पाहण्यासाठी चला, अशी एक टूम निघाली आणि अमेरिकी पर्यटकांनी त्यात उत्साहाने भाग घेतला. निवडणुकांच्या वातावरणात मेक्सिकोचं निसर्गसौंदर्य, मेक्सिकन वारुणी आणि तरुणी यांची धुंद संगत, समुद्रस्नान, मेक्सिकन फूड वगैरे आरामदायी ‘पॅकेज’च आखलं होतं पर्यटन कंपन्यांनी. पैसे खर्च करू पाहणार्‍यांना जुन्याचा कंटाळा आलेला असतो आणि नावीन्याचा प्रचंड सोस असतो. त्यामुळं ‘जे नवं ते हवं’, अशी भूक असणार्‍यांची संख्या देशोदेशी कमी नाही. दक्षिण अमेरिकेनं अल्पावधीत उचलून धरलेली निवडणूक पर्यटनाची संकल्पना जगाच्या ‘टुरिझम इंडस्ट्री’त पोचली. जगात कुठं होत नाहीत, अशा निवडणुका ज्या भारतात होतात, तिथं ही संकल्पना पोहचणार नाही, असं कसं होईल?

‘निवडणूक पर्यटन’ ही नवी संकल्पनाच अलीकडच्या दशकात भारतात मूळ धरू पाहते आहे. तिला पहिल्यांदा व्यावसायिक रूप देण्याचं र्शेय जातं ते (अर्थातच) गुजरातेतल्या मनीष शर्मा या पर्यटन व्यावसायिकाकडे. 

भारतातल्या निवडणुका अत्यंत जिवंत असतात यात शंकाच नाही. एखाद्या प्रचंड लोकप्रिय हिंदी सिनेमात जे जे असतं ते सगळं काही निवडणुकीत असतं. जबरदस्त डायलॉग्ज असतात. चुरस, वैफल्य, खुन्नस, ईर्षा, राग, लोभ अशा सगळ्या भावनांचा निचोड असतो निवडणुकीत. पराकोटीचं शत्रुत्व असतं. मैत्री निभावली जाते. नातेसंबंध तुटतात. घराणेशाही भक्कम होते किंवा मोडते. राजेशाहीवरचाही आदर असतो. क्वचित देशाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात हिंसा-रक्तपात घडतो. पैशांचा खेळ रंगतो. नाचगाणी होतात. दारूची नशा असते. गर्दीचा गोंधळ असतो. शक्तिप्रदर्शनाची धामधूम असते. या सगळ्या राजकीय वातावरणाला वेगच इतका असतो, की कंटाळा येण्याची कुठे संधीच नसते. या सगळ्या महाभारतानंतर ‘एण्ड’ला काय होणार, याची उत्सुकता टिकून असते. हा थरार राज्याराज्यात असतो; पण तो थरार पाहायला परदेशी पर्यटकांना भारतात बोलवावं हे पहिल्यांदा सुचलं मनीष शर्मा यांना आणि त्यांची ही व्यावसायिक कल्पना उचलून धरली ती नरेंद्र भाई यांनी. 

तसं पाहिलं तर भारताचं आकर्षण अवघ्या जगाला पूर्वापार आहे. अलीकडच्या काळात ते वाढलं अशातला भाग नाही. झालंच असेल तर प्रवासाच्या सोयीसुविधा वाढल्या. सुरक्षिततेची हमी वाढली. त्यामुळं परदेशी पर्यटकांचा ओघ भारताकडे वर्षभर असतोच. पण निवडणुकीच्या आकर्षणाची जोड देऊन कडक उन्हाळ्यातसुद्धा पर्यटक भारतात खेचून आणणं, हे मनीष शर्मांचं यश म्हणावं लागेल.

त्यांच्याव्यतिरिक्त अनेक परदेशी पत्रकार, अभ्यासक स्वत:च दौरा आखून भारतातली निवडणूक पाहण्यास येतात. परदेशी वृत्तवाहिन्यांची मोठी पथकं निवडणुकीच्या काळात भारतात मुक्काम ठोकून असतात. ‘ग्रेट इंडियन डेमॉक्रसी’ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असतो. अन्न-वस्र-निवारा या मूलभूत गरजा भागवताना गांजलेला सर्वसामान्य भारतीय मतदार निवडणुकीत मतदान करतो ते कोणत्या भूमिकेतून हे त्यांना जाणायचं असतं. एखादी नोट, एखादी बाटली, एखाद्या वेळचं जेवण एवढीच मताची किंमत त्याच्या लेखी असते की आणखी काही, हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

‘वल्र्ड मार्केट’लाही भारताच्या निवडणुकीत प्रचंड रस असतो. तब्बल 130 कोटी लोकांच्या बाजारपेठेवर कोणत्या विचारधारेची सत्ता येणार, त्यातून कोणते निर्णय घेतले जाऊ शकतात, सामान्य नागरिकांना काय हवं आहे, याचा अंदाज घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शेअर बाजारातल्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली यावर अवलंबून असतात. त्या दृष्टीने निकाल काय असेल, याचा आगावू अंदाज अनेक जागतिक कंपन्या आणि व्यापार वाहिन्यांसाठी महत्त्वाचा असतो. तो जाणून घेण्यासाठी या लोकांनी भारतातल्या निवडणूक तज्ज्ञ, राज्यशास्राचे अभ्यासक आणि सर्वेक्षण तज्ज्ञांशी मोठय़ा रकमांचे करारदेखील केलेले आहेत.

राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या एका तज्ज्ञांनी त्यांचं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर या संदर्भातली माहिती दिली. व्यापारविषयक वार्तांकन करणार्‍या युरोपातल्या व्यापार वाहिनीशी त्यांनी करार केला आहे. त्यांनी सांगितलं, की या वाहिनीनं त्यांचं स्वतंत्र पथक युरोपातून पाठवलं आहे. या पथकाला निवडणुकीदरम्यान कोणत्या राज्यांमध्ये कधी जायचं, कोणाला भेटायचं याचं मार्गदर्शन मी करतो. शिवाय काही दौर्‍यांमध्ये मी स्वत: सहभागी होऊन निवडणूकपूर्व अंदाज आणि निवडणुकोत्तर अंदाज यांचंही स्वतंत्र विश्लेषण माझ्याकडून त्यांना अपेक्षित आहे.’’ 

लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाची तारीख जुळवून मायदेशी येणार्‍या भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. केवळ मतदानासाठी येणार्‍यांमध्ये आखाती देश आणि ईशान्य आशियातल्या मूळ भारतीयांची संख्या मोठी आहे. 

पण खास भारताची निवडणूक पाहण्यासाठी येणार्‍यांमध्ये काही नेते आणि विशिष्ट मतदारसंघांबद्दलचे औत्सुक्य जास्त आहे. या बाबतीत नरेंद्र मोदी यांचं एक र्शेय मान्य करावं लागेल, की गेल्या पाच वर्षात त्यांनी जगभर जे दौरे केले त्यातून भारताबद्दलचं आकर्षण काहीसं वाढलं आहे. याचा दुसरा अर्थ इतकाच, की पर्यटनासाठी भारताला प्राधान्य देणार्‍यांची संख्या वाढते आहे. 

निवडणूक पर्यटनासाठी परदेशी लोकांची पसंती अहमदाबाद, गांधीनगर, बडोदा, मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, लखनौ, वाराणसी, अमेठी, रायबरेली या शहरांना प्रामुख्यानं आहे. कारण उघड आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, सोनिया गांधी, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, अरविंद केजरीवाल या सातत्यानं चर्चेत राहणार्‍या नेत्यांबद्दल जाणून घेण्याची इच्छा परदेशी पर्यटकांना आहे. त्यांचा निवडणुकीतला वावर, प्रचारसभा, भाषणं त्यांना ऐकायची असतात. पाहायची असतात. भाषेची समस्या प्रचंड मोठी आहे. पण वातावरणातला थरार, उत्साह त्यांना टिपायचा असतो. इंग्रजी वर्तमानपत्रं आणि स्थानिक नागरिकांशी मध्यस्थांच्या माध्यमातून झालेला संवाद यातून परदेशी पर्यटक माहिती गोळा करतात. फोटो, व्हिडीओ हे तर आलंच ! खास निवडणूक पर्यटनासाठी भारतात येणार्‍यांमध्ये 85 टक्के नागरिक परदेशी असतात तर 15 टक्के लोक मूळचे भारतीयच असतात. 

निवडणूक पाहण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांची संख्या यंदा पंधरा हजारांच्या पुढे गेली आहे, असे पर्यटन तज्ज्ञ सांगतात. स्वतंत्रपणे आलेल्यांची संख्याही दहा हजाराच्या घरात असेल, असा त्यांचा अंदाज आहे. निवडणूक प्रचारात सहभागी झालेल्या परदेशी लोकांवर भारतीय मतदार फुलं उधळतात, त्यांना हार घातले जातात, प्रेमानं खिलवलं जातं, या सगळ्या खास भारतीय आपलेपणाचं परदेशी लोकांना अप्रूप वाटतं. 

गुजरातेतल्या अक्षर टुर्सचे संचालक मनीष शर्मा सांगत होते, ‘‘सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथून दोनशे लोक आले होते आताच्या निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी. लाखा-लाखांच्या सभा पाहून ते भारावूनच गेले. टुर संपल्यानंतरही त्यांनी भारतातला मुक्काम वाढवला. भारतीय निवडणुकीचं व्यवस्थापन याच्यावर त्यांनी एक प्रबंधच लिहून काढला. आमच्या संकल्पनेचं हे मोठं यश वाटतं मला.’’ 

सध्या प्रियांका गांधी या परदेशी पर्यटकांसाठी फार आकर्षणाचा विषय आहेत, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. वाराणसी आणि अमेठी या दोन मतदारसंघांमध्ये बहुतांश पर्यटकांना जायचं असतं. नरेंद्र मोदी आणि गांधी घराण्यातील प्रियांका या दोन नेत्यांना भेटण्याची इच्छा सर्वाधिक पर्यटकांना आहे. भारतातली प्रचंड गर्दी, राजकीय नेत्यांना मिळणारं ‘फॅन फॉलोइंग’ याचं अप्रूप परदेशी लोकांना असतं, यात नवल नाही. पण मूळच्या भारतीयांनापण गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात स्थिरावलेल्या लोकांनाही या सगळ्याचा पुनरानंद घ्यायचा असतो. 

एकुणात काय तर निवडणूक विकण्याचं पर्यटन कंपन्यांचं कौशल्य फळाला येतं आहे. राज्या-राज्यांमधल्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. याचा फायदा स्थानिक अर्थकारणाला होणार, हे वेगळं सांगायला नको. भारताबद्दलची सकारात्मक प्रतिमा घेऊन परदेशी मंडळी त्यांच्या मायदेशी परत जातील, हे त्याहून महत्त्वाचं. भारत हा फक्त साप-गारुड्यांचा देश नाही. 130 कोटींच्या जगातल्या या सर्वात मोठय़ा लोकशाही देशातली जनता राजकीयदृष्ट्या सजग आहे; म्हणूनच कमालीचं वैविध्य असूनही हा देश एकसंध आहे, हेही त्यांना उमगेल. 

परदेशी लोकांचं सोडा. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला दक्षिण आफ्रिकेतून मोहनदास करमचंद गांधी हा तेव्हाचा अनिवासी भारतीय बॅरिस्टर भारतात आला. त्याला राजकीय क्षेत्रात काम करायचं होतं. तो गोपाळकृष्ण गोखले यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी गेला. गोखलेंनी सल्ला दिला,

 ‘‘तुम्ही आधी रेल्वेच्या थर्ड क्लासमधून भारतभ्रमण करा आणि भारत समजून घ्या. मगच राजकीय क्षेत्रात काय ते करा.’’

-  मोहनदास गांधींनी तो मानला आणि त्यानंतर ते ‘महात्मा’ झाले. 

आपलं मतदान झालं असेल तर आपणही एखाद्या राज्यातली निवडणूक अनुभवण्यास निघावं. काय हरकत आहे? आपल्याला तरी आपला देश कुठं समजलाय अजून

BRIG HEMANT MAHAJAN at 00:58
Share

No comments:

Post a Comment

‹
›
Home
View web version

About Me

My photo
BRIG HEMANT MAHAJAN
I TALK ON VARIOUS ISSUES OF NATIONAL SECURITY
View my complete profile
Powered by Blogger.