प्रेमभंग झाला म्हणून…
May 29, 2017016
Share on Facebook Tweet on Twitter
वेध
आम्हाला लहानपणापासून सतत सांगण्यात आले आहे की, रक्तारक्तात फरक नसतो. सर्व मानवांच्या रक्ताचा रंग लालच असतो. बरोबर आहे. मग काश्मिरातील तरुणांचेच रक्त का उसळते? प्रेमभंग झाला की हो दहशतवादी. नोकरी मिळाली नाही की हो दहशतवादी. हा काय प्रकार आहे? जर रक्त सारखे आहे, तर मग ही अशी अनाठायी, आत्मघाती, देशद्रोही उसळी का म्हणून? याचीही शहानिशा व्हायला हवी. मागील आठवड्यात आपल्या देशातील वाह्यात राजकारणी मणिशंकर अय्यर फुटीरतावाद्यांशी चर्चा करायला श्रीनगरला जाऊन आले. त्यांनी काय सांगावे?- मोदी सरकारने काश्मिरातील रोजगार बुडविला! इकडे पुरोगामी शिरोमणी शरद पवार म्हणतात की, काश्मिरातील तरुणांना समजावून सांगायला पाहिजे. पवारांना पाठवायचे का तिकडे? बुरहान वाणीला, सबझर भट इत्यादींना काय समजावून सांगायचे? उद्या नक्षल्यांनाही समजावून सांगायला सांगतील हे लोक! स्वत: सत्तेत असताना, वरवर मलमपट्ट्या करायच्या, काश्मिरी गालिच्याखाली भारतविरोधी कृत्ये लपवून ठेवायची, भारतीय नागरिकांच्या करातून लाखो कोटी रुपये निधी म्हणून काश्मीरला पाठवायचा (त्यातला अर्धाधिक लुबाडायचा) आणि मग जगाला सांगायचे की, बघा! काश्मिरात कशी शांतता नांदत आहे. तिथला पर्यटन व्यवसाय किती बहरत आहे. हे असलेच धोरण आतापर्यंत राबविण्यात आले. काय फायदा झाला, हे आपण बघतच आहोत. दहशतवाद वज्रमुठीनेच हाताळावा लागतो, असे स्व. केपीएस गिल म्हणत असत. त्यांचे म्हणणे आधीच ऐकले असते, तर आज ही पाळीच आली नसती! ती चूक आता मोदी सरकार दुरुस्त करीत आहे, तर उगाच पोटशूळ कशापायी? हा जो भट मारला गेला, त्याचा ठावठिकाणा स्थानिकांनीच दिला होता, अशी माहिती समोर येत आहे. असे असेल, तर तो एक शुभसंकेत मानावा लागेल. स्थानिक जनताच हा दहशतवाद संपवू शकते. पंजाबात तसेच घडले होते, हे विसरू नये.
No comments:
Post a Comment