Pages

Wednesday, 20 April 2011

आत्महत्या हा काही पर्याय नाही: देशभरात रोज ३५० ते ४०० जण आत्महत्या करतात.

आत्महत्या हा काही पर्याय नाही: देशभरात रोज ३५० ते ४०० जण आत्महत्या करतात. शनिवार, १६ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पश्‍चिम उपनगरातील दहिसर-पूर्व रावळपाडा येथील अलकनंदा या सात मजली इमारतीच्या गच्चीवरून दीप्ती चौव्हाण या ३१ वर्षीय महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलासह उडी मारून आत्महत्या केली. दीप्तीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला तिच्या सासरच्या मंडळींकडून मानसिक शारीरिक त्रास दिला जात होता. अखेर जीवनाला कंटाळून तिने स्वत:चे आपल्या लहानग्या मुलाचेही आयुष्य संपविले. ज्या दिवशी दीप्तीने आत्महत्या केली त्याच दिवशी तिच्या सासू, सासरा, पती, दीर नणंदेला दहिसर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केले या आरोपावरून अटक केली आणि दीप्ती आत्महत्या प्रकरणाला मूठमाती दिली. काळजाचा थरकाप उडविणारी दीप्तीची ही आत्महत्या आहे. स्वत: बरोबर तिने तिच्या चिमुरड्यालाही मारले. इतकी क्रूरता दीप्तीकडे का आली? तिच्या मुलाचा काय दोष होता? सारेच कोडे आहे.आपल्या देशात आत्महत्या करण्याचे स्त्रीपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. आपल्या चिमुरड्या मुलांना सोबत घेऊन आत्महत्या करण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. . त्यात तरुणांचा गृहिणींचा भरणा अधिक आहे. जगभरातील आत्महत्यांची आकडेवारी पाहिली तर आपल्या देशातील लोकांची अत्यंत वेगाने आत्महत्येच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सर्वात जास्त आत्महत्या आपल्याच देशात सुरू आहेत. पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामीळनाडू त्यानंतर महाराष्ट्र आत्महत्येच्या प्रकारात आघाडीवर आहेत. तुम्ही कुठेही असला तरी आज तणावाचे वातावरण आहे. मग घर असो की कार्यालय असो. राजकारण असो की समाजकारण असो सर्व अनुकूल प्रतिकूल वातावरणाला तुम्हाला सामोरे जावे लागते. त्यातूनच कधी कधी न्यूनगंड तयार होतो आणि टोकाची भूमिका घेतली जाते. आजकाल दहा-बारा वर्षांचे विद्यार्थीही परीक्षेत नापास झाल्यावर आईवडिलांकडून, शिक्षकांकडून बोलणी खावी लागल्यामुळे आत्महत्या करू लागले आहेत. गेल्या वर्षी तर मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे डझनभर अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. गृहिणी अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या तर चटका लावून जात आहेत. मालाडची निधी दहिसरची दीप्ती या गृहिणींनी आपल्या लहान मुलांसह उडी मारून केलेल्या आत्महत्या पाहून आज प्रत्येक घराघरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अशा प्रकाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून देवाकडे असंख्य गृहिणी साकडे घालत आहेत. आधुनिक स्त्री कितीतरी सुशिक्षित, मोठी असली तरी तिलाही भावना आहेत. पत्नी, आई, सून, वहिनी, बहीण अशा अनेक भूमिका तिला पार पाडाव्या लागतात. घरची धुणीभांडी, जेवण करणे, मुलांना शाळेत सोडणे-आणणे आदी कामे गृहिणीला करावंी लागतात. नोकरी करणार्‍या महिलेलाही अशी कामे चुकलेली नाहीत. नात्यांच्या बंधनात अडकलेल्या अशा महिलांपैकी बर्‍याच महिलांचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक मानसिक छळ केला जातो. मग त्या स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतात. आपल्या मागे आपल्या लहान मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून मग त्या महिला त्यांनाही सोबत घेऊन जातात. आपली मुलं मरावीत, मारावीत असा त्यांचा निश्‍चय नसतो. अशा तणावाखाली असणार्‍या महिलांवर वेळीच मानसिक उपचार झाल्यास त्यांच्या स्वभावात, वागण्यात बदल होऊ शकतात आणि संभाव्य धोके टळू शकतात. नियमितपणे हसत-खेळत असणारी व्यक्ती शांत एकलकोंडी, निरस झाल्यावर त्यांच्या सानिध्यात असणार्‍या नॉर्मल व्यक्तींनी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. परंतु आज ऍबनॉर्मल व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोण कुणाला समजून घेत नाही. आपले तेच खरे, मी म्हणतो तेच योग्य. मार्ग काढायचा नाही, एक दुसर्‍याला दूषणे देत राहायचे. मग त्यातूनच स्फोट होऊन कुणीतरी दुबळी व्यक्ती संयम तुटल्याने आत्महत्या करते. यात ती व्यक्ती म्हणजे एक गृहिणीच असते. आज बहुसंख्य घरांत अशा दुबळ्या महिला आहेत. त्यांनी संयम दाखवायची गरज आहे. दीप्ती, निधीची पुनरावृत्ती करू नये. हेही दिवस जातील आणि सुखाचे दिवस येतील या प्रतीक्षेत राहावे. आत्महत्या हा काही पर्याय नाही हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवले पाहिजेदेशभरात रोज ३५० ते ४०० जण आत्महत्या करतात

No comments:

Post a Comment