Total Pageviews

Friday 10 June 2011

FAKE MEDICAL EQUIPMENT

आता वैद्यकीय उपकरणेही बनावट
ऐक्य समूह
Thursday, June 09, 2011 AT 11:52 PM (IST)
सध्याच्या भेसळीच्या आणि बनावट वस्तूंच्या व्यापाराच्या दुनियेत कोणत्याही वस्तूच्या अस्सलपणाची खात्री बाळगणे कठीण ठरत आहे. अशा व्यापारातून इतरांच्या जीवाशी खेळ करून स्वत: भरमसाठ नफा मिळवणारी मंडळी राजरोस कारभार करतात. अलीकडे बनावट वैद्यकीय उपकरणांचा असाच व्यापार सुरू आहे. या संदर्भात पुरेसे कायदे असूनही त्याच्या अंमलबजावणीअभावी अशी उपकरणे रुग्णांसाठी सर्रास वापरली जात आहेत.
सध्याचा जमाना भेसळीचा आहे असे म्हणतात, त्यात काही चूक नाही. कारण कोणत्याही वस्तूत बेमालूम भेसळ करुन ती ग्राहकांच्या माथी मारण्याचे उद्योग बिनभोबाटपणे सुरू आहेत.  आता त्यात बनावट वैद्यकीय उपकरणांची भर पडली आहे. अवयवांच्या प्रत्यारोपण प्रक्रियेत किंवा वेगवेगळ्या शस्त्रक्रियांमध्ये मानवी शरीरात काही वैद्यकीय उपकरणे बसवली जातात. त्यांच्या दर्जाबाबत सरकारने नियमावली बनवली आहे. मात्र, त्याचे उल्लंघन करून अलीकडे निकृष्ट दर्जाच्या वैद्यकीय उपकरणांचा बाजारच मांडण्यात आला आहे. स्वस्तात उपचार देण्याच्या नावाखाली रूग्णालयातूनही अशा दुय्यम दर्जाच्या उपकरणांचा वापर होत असल्याने त्यातून रूग्णांच्या जिवाशी  खेळ खेळला जात आहे. अलीकडे प्रत्येक क्षेत्रात झालेल्या बाजारीकरणाचा फटका वैद्यकीय क्षेत्रालाही बसू लागला आहे. या क्षेत्रात मध्यस्थांनी, व्यापारी वृत्तींच्या लोकांनी प्रवेश केला असून मानवी शरीरामध्ये बसवल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपरकणांचाही बाजार मांडला आहे. "शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्‌' असे संस्कृत वचन आहे. अर्थात कोणतेही काम यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी उत्तम शरीरसंपदा हे महत्त्वाचे माध्यम आहे.
रुग्णांच्या जीवाशी खेळ
शरीर निरोगी असेल तर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणे अशक्य नाही. मानवी शरीरामध्ये पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश अशा पंचमहाभूतांचे अस्तित्त्व असते असे सांगितले जाते. निसर्गातील ही पंचतत्त्वे मानवी शरीरामध्ये असल्यामुळेच निसर्ग आणि मानवी शरीर यांचा संबंध फार निकटचा आहे. उत्तम शरीरसंपदेच्या माध्यमातून निसर्गाने मानवाला दिलेली ही अनमोल देणगी तेवढ्याच दक्षतेने जोपासणे, तिचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तथापि अलीकडच्या काळात धावपळीच्या युगात अनेकदा याकडे दुर्लक्ष होते. त्याचे परिणाम शरीराला भोगावे लागतात. अनेक कारणांनी शरीराची कार्यक्षमता कमी होते किंवा एखाद्या वेळी नष्टही होते. त्यातच छोट्या-मोठ्या अपघातामध्ये शरीराचा एखादा अवयव निकामी झाला तर आयुष्यच नकोसे होते. त्यातून मनावर नैराश्येचे मळभ येते.
या पार्श्वभूमीवर अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानाने प्रत्येक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा प्रसंगांमध्ये शरीराचा निकामी झालेला अवयव बदलून त्या ठिकाणी कृत्रिम अवयव बसवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. वेगवेगळ्या शस्त्रक्रियांमध्ये, प्रत्यारोपणामध्ये अशा कृत्रिम अवयवांचा, वैद्यकीय उपकरणांचा वापर केला जातो. अशी उपकरणे वापरताना ती कोणत्या दर्जाची असावीत, याचे काही नियम तयार करण्यात आले आहेत. पण ते सरसकट पायदळी तुडवून रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार सातत्याने घडत असल्याचे दिसते. प्रत्येक क्षेत्रात झालेल्या बाजारीकरणाचा फटका वैद्यकीय क्षेत्रालाही कसा बसतो, याचे अनेक नमुने पहायला मिळतात. या क्षेत्रातही मध्यस्थांनी, व्यापारी वृत्तीच्या लोकांनी प्रवेश केला आहे. दुर्दैवाने काही डॉक्टर मंडळीही या साखळीत असल्याने ते रूग्णांच्या जिवाशी खेळ खेळत असतात. अशा मंडळींनी स्वस्तात मिळणारी पण निकृष्ट दर्जाची वैद्यकीय उपकरणे बाजारात आणली. विविध शास्त्रक्रियांमध्ये त्याचा सर्रास वापर होऊ लागला आणि त्याचबरोबर रूग्णांच्या जिवाशी खेळही !
उपकरण नियमावली
या गोष्टींवर निर्बंध आणण्यासाठी सरकारने पावले उचलली आणि मानवी शरीरात वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणांबाबत 2005 मध्ये काही नियमावली बनवली. त्यानुसार काडींएक स्टेन्टस्‌, ड्रग इल्युथींग स्टेंटस्‌, कॅथेटर्स, इन्ट्रा ऑक्यूलर लेन्सेस, आय. व्ही. बोन सिमेंट्‌स, हार्ट व्हॉल्व्हस्‌, स्कूँप व्हेन सेट, ऑर्थोपेडिक इम्पलांटस्‌, इंटर्नल प्रोस्टेथिर रिप्लेसमेंट्‌स अशा दहा उपकरणांबाबत प्रामुख्याने नियमावली बनवण्यात आली. मात्र, त्याचे सरसकट उल्लंघन होत असल्याचे आढळते. केवळ खासगी रूग्णालयांमध्येच नाही तर सरकारी दवाखान्यांमधूनही सरकारनेच आखून दिलेल्या या नियमांचे पालन होत नाही, असे दिसून आले आहे. अशा निकृष्ट दर्जाच्या उपकरणांमुळे रूग्णाला घातक परिणामांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: हृदयावरील शस्त्रक्रिया, अर्थ्रायट्रीस किंवा अन्य प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांमध्ये त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झाल्यानंतर लागणारी प्लेट्‌स, स्क्रू, आणि नेल्स अशी उपकरणे वापरतानाही रूग्णांच्या जिवाशी खेळ होत आहे. केवळ प्रत्यारोपणासारख्या मोठ्या शस्त्रक्रियांमध्येच नाही तर अगदी किरकोळ वाटणाऱ्या सर्जरीमध्येही अशी उपकरणी वापरली जातात. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णाच्या जिवाशी खेळ होत आहे. बहुतेक वेळा अशी उपकरणे त्या व्यक्तीच्या शरीरात कायमस्वरूपी राहतात. त्यामुळे ती दर्जेदार असणे अत्यंत आवश्यक ठरते. या पार्श्वभूमीवर अशा उपकरणांबाबत सरकारने नियमावली बनवली. त्यावेळी त्याचे स्वागत करण्यात आले. या निर्णयाला आता तीन वर्षे उलटून गेली. तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते.
रूग्णांवर स्वस्तात उपचार करण्याच्या प्रलोभनाखाली अशा उपकरणांचा वापर केला जातो. एकीकडे प्रत्यारोपणासाठी योग्य वैद्यकीय उपकरणांचा वापर करून शस्त्रक्रियेद्वारे लवकरात लवकर पुन्हा नवे जीवन मिळवण्याचा मार्ग उपलब्ध असताना कमी दर्जाच्या उपकरणांचा वापर दुधारी तलवारीसारखा होत असल्याचे आढळते. यामुळे दीर्घकाळ आजारपण, कायम अपंगत्व किंवा एखाद्या वेळी मृत्यूलाही सामोरे जाण्याची वेळ रूग्णावर येते. रूग्णांच्या जिवाशी होणारा हा अघोरी खेळ थांबवण्यासाठी सरकारने केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मात्र, तशी ती होताना दिसत नाही. काही मोजक्या कंपन्या सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचा अवलंब करत अशा वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करतात. तथापि हे नियम झुगारून, कमी दर्जाची, स्वस्तात मिळू शकणारी उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांचेच पेव फुटल्याचे दिसते. वैद्यकीय व्यवसायात आज अशा अनेक उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर ऑर्थोपेडिक इम्पलांटस (हाडांचे प्रत्यारोपण) साठी उपकरणे बनवण्याचा परवाना भारतातील केवळ दोनच कंपन्यांना आहे. मात्र, सध्या अशी उपकरणे बनवणाऱ्या 200 हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. यावरून बिनापरवाना निष्कृष्ट उपकरणे बनवण्याचा व्यापार कसा तेजीत आहे, ते स्पष्ट होईल.
कारवाई हवी
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही वस्तुस्थिती समोर दिसत असतानाही आजवर त्याविरूद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या उपकरणांबाबतची नियमावली सरकारनेच बनवली असल्याने किमान सरकारी रूग्णालयांमध्ये अधिकृत उपकरणांचाच वापर होत असेल असा कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. सरकारी रूग्णालयांतूनही सर्रास अशा अवैध, निकृष्ट दर्जाच्या, स्वस्तात मिळणाऱ्या उपकरणांचाच वापर होतो. सरकारी नियमांचे उल्लंघन सरकारच्या ताब्यातील रूग्णालयातून व्हावे, ही खेदजनक बाब आहे. आणखी खेदाची बाब म्हणजे अशा उत्पादकांकडून टेंडर मागवून ही उपकरणे सरकारी दवाखान्यात येतात.
एखाद्याच्या शरीरातील कोणताही अवयव बदलून त्या जागी कृत्रिम अवयव, हाड किंवा वैद्यकीय उपकरण बसवताना त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झालेला असणे अपेक्षित आहे. हा जीवन-मरणाचा प्रश्न असल्यामुळे त्याबाबत योग्य काळजी घेणे आवश्यक असत. मात्र, दुर्दैवाने याबाबत अत्यंत निष्काळजीपणा, बेफिकिरी आणि केवळ व्यावसायिक वृत्ती फोफावलेली आढळते. या संदर्भात अमेरिका आणि युरोपमध्ये कडक कायदे करण्यात आले आहेत. हे लक्षात घेता भारताच्या आरोग्य मंत्रालयाने आणि अन्न-औषध नियंत्रण प्रशासनाने या बाबत ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास बनावट उपकरणांच्या या व्यापाराला आपोआप आळा बसेल आणि रुग्णांनाही दिलासा मिळेल

No comments:

Post a Comment