Total Pageviews

Thursday 9 June 2011

COUNTRY VS CLUB

कंट्री सोडलेल्यांचा क्लब!सिद्धार्थ खांडेकरदेशापेक्षा जास्त पैसा आणि प्रसिद्धीही क्लबांतर्फे खासगी संघांतर्फे खेळणा-यांना मिळू लागल्याचं अगदी ताजं- भारतातलं सर्वात जवळचं- गौतम गंभीरचा वेस्ट इंडिज दौरा आयपीएलपायी रहित झाल्याचं उदाहरण तरी काय सांगतं? ‘खेळायचं देशासाठी की पैशासाठी’ या वादात देशप्रेमी कितीही नेहमीचे युक्तिवाद करोत; ते ऐकतंय कोण? कंट्री सोडलेल्यांचा क्लब तर वाढतच जातोय.. किस्सा
गौतम गंभीरचा. वर्ल्डकपमध्ये तो बरा खेळला आणि फायनलमध्ये तर उत्तम खेळला. आयपीएअलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा कप्तान होता. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग ढोणी, वीरेंदर सेहवाग, युवराज सिंग या भारतीय क्रिकेटमधल्या आयकॉन कप्तानांच्या उपस्थितीतही गंभीरचं नेतृत्व उठून दिसलं होतं. तोच ढोणीचा भावी वारसदार ठरू लागला होता. पण.. त्याच्या खांद्याची दुखापत आड आली. दोन मोठय़ा स्पर्धा खेळून खांद्याचा पार चोथा झाला. पण स्कँडल ते नव्हतं. खांद्याचे बारा वाजणार असा अहवाल नाइट रायडर्सच्या डॉक्टरनी आयपीएल सुरू होण्यापूर्वीच दिलेला होता. उपाय काय? तर आयपीएलनंतरच्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये गंभीर खेळावा असं वाटत असेल, तर त्याला आयपीएलमधून विश्रांती द्यावी, हा! शाहरुखच्या टीमचा कॅप्टन, ज्याच्यासाठी 24 लाख डॉलर मोजले, अशा महागडय़ाग्लॅडिएटर’ला विश्रांती? अहवालाबद्दल धन्यवाद. तूर्तास तो कपाटात ठेवूया, अशी भूमिका नाइट रायडर्स व्यवस्थापनानं घेतली! आयपीएल संपेपर्यंत गंभीरची दुखापत गंभीर बनली. वेस्ट इंडिज दौरा रद्द. गंभीरनं कंट्री सोडून क्लबला प्राधान्य दिलं, अशी बोंब. हे विधान पॉप्युलिस्ट असेल, पण तर्कसंगत नाही. कारणकंट्री’ला सर्वाधिक भूषणावह ठरलेल्या वर्ल्डकप अजिंक्यपदात गंभीरचा वाटा होता. महत्त्वाचं म्हणजे, त्याही स्पर्धेत तो दुखरा खांदा घेऊनच उतरला होता! फायनलमध्ये सेहवाग-सचिन बाद झाल्यानंतर गंभीरच खंबीरपणे उभा राहिला आणि त्याच्या पायाभरणीवर महेंद्रसिंग ढोणीनं कळस चढवला. या वर्ल्डकपपेक्षा कितीतरी कमी महत्त्वाच्या वेस्ट इंडिज दौ-यात तो दिसणार नाही. पण असे दिसणारे त्याच्यासारखेच आणखीही आहेत, जे आयपीएलमध्ये खेळलेत. महेंद्रसिंग ढोणी, युवराज सिंग, झहीर खान, वीरेंदर सेहवाग. आणि सचिन तेंडुलकर!? थोडक्यात, क्लब विरुद्ध कंट्री वादात देशप्रेमींनी गंभीरलाकेसपेपर’ केलं खरं, पण मुद्दय़ांमध्ये काही दम नव्हता. अर्थात एक केसपेपर कमकुवत ठरल्यानंतर संपूर्ण मुद्दाच खोडून निघतो, असंही नाही.क्रिकेटमध्ये शिखर संघटना आयसीसी आणि सदस्य बोर्डामध्ये असा संवादच नाही. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होतेच, शिवाय क्रिकेटपटूंना खलनायक ठरवलं जातं नि क्रिकेट प्रशासक मात्र नामानिराळे होतात. या सगळ्या क्लब विरुद्ध कंट्री वादाच्या केंद्रस्थानी आहे अर्थातच आयपीएल. आयपीएलमध्ये खेळण्याला क्रिकेट जगतातील 40 टक्के क्रिकेटपटूंची पसंती असते, असं नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या संघटनेनं सादर केलेला एक अहवाल सांगतो. 19 टक्के क्रिकेटपटू प्रसंगी आपलं आंतरराष्ट्रीय करियर गुंडाळून आयपीएलमध्ये झोकून द्यायला तयार आहेत. ही काही देशद्रोह्यांची टक्केवारी नाही. भारतात राहून याचं गांभीर्य कदाचित उमगणारही नाही. वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान या देशांच्या क्रिकेट बोर्डाचं उत्पन्न आणि त्यातून करारबद्ध क्रिकेपटूंना दिली जाणारी तनखा यांच्यातली तफावत भयानक आहे. त्यामुळेच ख्रिस गेल किंवा किरॉन पोलार्ड किंवा ड्वेन ब्राव्हो अशा वेस्ट इंडियन क्रिकेटपटूंना त्यांच्या देशसमूहाकडून किंवा बोर्डाकडून खेळण्यापेक्षा आयपीएलमधल्या एखाद्या फ्रँचायझीकडून खेळणं अधिक फायदेशीर ठरतं. बोर्डाकडून उधळपट्टी होत असेल, पगारही वेळेवर दिले जात नसतील आणि पदाधिका-यांच्याच तुंबडय़ा भरून त्यांचेच उत्थान होणार असेल, तर अशा बोर्डाना लाथ मारण्याचा क्रिकेटपटूंना हक्क आहे. मागे इंडियन क्रिकेट लीग किंवा आयसीएल ही प्रोफेशनल लीग सुरू झाली, त्यावेळी तिच्यासाठी प्रसंगी स्वत:ची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ओवाळून टकणारे अनेक क्रिकेटपटू न्यूझीलंड आणि पाकिस्तानचेही होते. यासाठी सध्या आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रम यांचेसेपरेशन’ आवश्यक आहे. आयपीएलमध्ये खेळून जितके क्रिकेटपटू जायबंदी होतात, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक क्रिकेटपटू आयसीसी आणि बोर्डाकडून आखण्यात आलेल्या बिनडोक कार्यक्रमपत्रिकेमुळे जायबंदी होतात! काही वेळा अर्थातच फिटनेस ट्रेनरांचा अभाव किंवा फिटनेसकडे संबंधित क्रिकेटपटूचं झालेलं दुर्लक्षही कारणीभूत असतं. भारताकडे तरीही आयपीएलमध्ये चमकणारे रोहित शर्मासारखे गुणवान क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये निस्तेज ठरतात, त्यावेळी फारसं नुकसान होत नाही. कारण क्रिकेटपटूंची खाण या देशात निर्माण झालेली आहे. बाकीच्या देशांमध्ये हापुल’ छोटा असतो, हा दोष भारताचा किंवा आयपीएलचा नाही. त्यामुळेच अर्जुना रणतुंगासारखे प्रतिभावान क्रिकेटपटू आयपीएलला क्रिकेटचा आणि राष्ट्रभावनेचा शत्रू ठरवतात, तेव्हा तो आरोप हास्यास्पद ठरतो. या फ्रँचायझींची क्रिकेटची समज किती, कोणत्या निकषांवर अनाम क्रिकेटपटूंवरही पैशांच्या राशी ओतल्या जातात, क्रिकेट आणि क्रिकेटपटूंनाग्लॅडिएटर’ किंवा झुंजणा-या कोंबडय़ांसारखं समजलं-वागवलं जातं का, सामन्यांनंतरच्या पाटर्य़ाची सक्ती का केली जाते वगैरे मुद्दय़ांवर स्वतंत्र वाद-प्रतिवाद होत राहतील. पण आयपीएल किंवा तत्सम लीगमध्ये एखाद्या क्लबसाठी खेळाडूंनी सर्वस्व झोकून खेळणं, हा त्याच्या प्रोफेशनलिझमचा भाग आहे. तो देशासाठी खेळत नसेल किंवा पराक्रम गाजवत नसेल, तर फार त्याला उत्कृष्ट क्लब खेळाडू संबोधलं जावं. त्याच्या राष्ट्रनिष्ठेविषयी शंका घेण्यात काहीच मतलब नाही.  

No comments:

Post a Comment